
रंगभूमीच्या गालावर उमटणार गोड ‘खळी’…!

It's all about enterntainment
अभिनेता सुशांत शेलार आणि आस्ताद काळे यांची घनिष्ठ मैत्री ‘बिग बॉस’ कार्यक्रमात सगळ्यांनीच बघितली. आपल्या बेधडक व स्पष्ट वक्तेपणामुळे ‘बिग बॉस’ कार्यक्रम गाजवल्यानंतर हे दोघेजण पुन्हा एकत्र येत आपला नवा अंदाज प्रेक्षकांना दाखवायला सज्ज झाले आहेत. रंगनील निर्मित ‘MR & MRS लांडगे’ या आगामी नव्या नाटकातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शनिवारी १३ ऑक्टोबरला दुपारी ४.३० वा. या नाटकाचा शुभारंभ वाशीच्या विष्णुदास भावे सभागृहात होणार आहे.
आपल्या या नव्या नाट्यकृतीबद्दल बोलताना हे दोघं सांगतात की, ‘MR & MRS लांडगे’ या नाटकाच्या निमित्ताने आम्हाला पुन्हा एकत्र येण्याची संधी मिळाली. वयाचं भान विसरायला लावणारी ही बेभान कॉमेडी निखळ आनंदासोबतच आमच्या भन्नाटट्यूनिंगची ट्रीट ही प्रेक्षकांना देईल असा विश्वास हे दोघेजण व्यक्त करतात.
सुशांत आणि आस्ताद यांसोबत या नाटकात राजेश भोसले, परी तेलंग, मधुरा देशपांडे, रमा रानडे, अमर कुलकर्णी, अलका परब यांच्या भूमिका आहेत. कल्पना विलास कोठारी या नाटकाच्या निर्मात्या आहेत. लेखन सुरेश जयराम तर दिग्दर्शन विजय केंकरे यांचे आहे.
१३ ऑक्टोबरला हे नाटक रंगमंचावर येतेय.
रंगभूमी, रसिकांची आवडती, आपलासा वाटणारा रंगमंच, त्यावर रसिकांसाठी सादर केलेलं रसिकांना अर्पण केलेली कलाकृती, जिवंत नाट्यमयता आणि उर्जा देणारी कला, म्हणजे “ नाटक “ ह्या नाटकाच्या इतिहासात अनेक बदल झाले. प्रयोगाचे विविध रूपाने सादरीकरण केले गेले, संगीत आणि गद्य नाटके या रंगभूमीवर आली, त्यातील काही सुवर्ण कृतीने नटलेली पाने नाट्यसंपदा कलामंच या लोकप्रिय नाट्य संस्थेने चि सौ कां रंगभूमी या नाटकातून उलगडून दाखवलेली आहेत.
चि सौ कां रंगभूमी हिचे लग्न रसिकराज याच्याशी लागते आणि त्यांचा रंगभूमीवरील संसाराला सुरवात होते, रंगभूमी विविध रंगांची चैतन्य देणारी सात पावले चालून माप ओलांडून घरात येते आणि संगीत आणि गद्य रूपाने नाट्यमय प्रसंगाला सुरवात होते, नांदी ते भैरवी चा सुरमय तसेच विविध प्रसंगाने आणि भिन्न-भिन्न रसानी युक्त असलेला प्रवास अनुभवयाला मिळणार आहे. हे सारे रंगतदारपणे, अभ्यासपूर्ण रीतीने सर्वच कलाकारांनी सादर केला आहे. रंगभूमीचा इतिहास उलगडत जाताना रसिक त्यामध्ये रंगून जातो. संगीत नाटकात स्वयंवर, मानापमान, कुलवधू, शारदा, संशयकल्लोळ, जय जय गौरीशंकर, अश्या गाजलेल्या नाटकातील लोकप्रिय पदांचा खुबीने वापर करून ती विलक्षण उर्जेने सादर केली आहेत. ह्या नाट्य गीतांना संगीत साथ ऑर्गनवर केदार भागवत आणि तबल्यावर सुहास चितळे यांची उत्तम लाभली आहे. त्याच प्रमाणे एकच प्याला, तो मी नव्हेच, फुलराणी, नटसम्राट, हमीदाबाईची कोठी, अश्या नाटकामधील प्रवेशांचे रंगतदारपणे सादरीकरण केल आहे. एक प्रसन्न आनंददायी सोहळाच आपणासमोर साकारला आहे.
चि सौ कां रंगभूमी आणि रसिकराज यांच्या संसाराची मांडणी, त्यामधील असणारे रुसवे-फुगवे, सांभाळत जीवनातील गमतीजमतीची कोडी सोडवत सर्वकाही सुरेलपणे खुलवले आहे.
संपदा जोगळेकर कुलकर्णी यांनी रंगभूमी / फुलराणी ची भूमिका तसेच राहुल मेहेंदळे यांनी रसिकराज, लखोबा लोखंडे, नटसम्राट ची भूमिका योग्य ते बेअरिंग सांभाळून केली आहे. ह्या शिवाय नचिकेत लेले चा बालगंधर्व, केतकी चैतन्य ची कृतिका / सईदा , शमिका भिडे ची मैना, शर्वरी कुलकर्णी ची नवी रंगभूमी, अमोल कुलकर्णी चा तळीराम, अवधूत गांधी चा नारद, यांच्याही भूमिका त्यांनी मनापासून केल्या आहेत. तसेच सुयोग्य अश्या वेशभूषेची जबाबदारी नीता पणशीकर यांनी सांभाळलेली आहे. सचिन गावकर यांनी उभारलेल नेपथ्य हे सुद्धा एक भूमिकाच करीत आहे असे जाणवते, त्याला अनुसरून शीतल तळपदे यांनी प्रकाश योजना साकारलेली आहे ती सुद्धा परिणाम साधून जाते.
हा रंगभूमीचा प्रवास उलगडत असतांना काही सोनेरी पानांचे दर्शन संगीत आणि गद्य च्या रूपाने विलक्षण उर्जेने सादर केला आहे असे म्हणायला हवे. एक सुरेल संगीतमय नाटक पाहिल्याचे समाधान मिळेल.
दीनानाथ घारपुरे
मराठी रंगभूमीवर विनोदी नाटके सतत येत आहेत, विनोदी नाटकातून करमणूक करीत प्रबोधन सुद्धा केलं जाते हे आपणास नाकारता येत नाही, विनोदी नाटकामध्ये ” फार्स ” हा सर्वसाधारणपणे १९६० च्या सुमारास बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे यांनी रंगभूमीवर सादर केला, त्यावेळी बबन प्रभू लिखित ” झोपी गेलेला जागा झाला ” आणि ” दिनूच्या सासूबाई राधाबाई ” हे दोन फार्स सादर केले होते त्याकाळी ते खूप गाजले होते, आजच्या घडीला वेद प्रोडक्शन ने सादर केलेला आणि विश्वस्मे प्रोडक्शन ची निर्मिती असलेला ” दिनूच्या सासूबाई राधाबाई ” हे नाटक रंगमंचावर धमाल करीत आहे.
दिनू नाडकर्णी यांच्या घरात हि कथा घडते, दिनूची सासू राधाबाई हि एक इरसाल,भांडण करण्यात पटाईत अशी असून तिचे पती कनैह्या हे दोघे चार महिन्यासाठी दिनूच्या कडे राहायला आलेले असतात, दिनूच्या घरी त्याचा मेव्हणा रवी हा राहायला आलेला असतो, त्याची एक भानगड असते, त्याने हिरा नावाच्या मुलीबरोबर दोन वर्षांपूर्वी लग्न केलेलं असते त्याला एक बाळ सुद्धा असते, दिनूची बायको मीना हि सुस्वभावी पण तिची बहीण प्रीती हिला अभिनेत्री बनायचे असते त्यासाठी मेनकादेवी ह्या अभिनेत्री ला आमंत्रण दिलेले असते, त्यामध्ये रवी–हिरा ह्यांचे लग्न झालेलं आहे कोणालाच माहित नसल्याने घोटाळे, गैरसमज वाढत असतात, सासऱ्याने दिनूकडे आणलेला ऑर्गन दुरुस्ती करण्यासाठी दिनूच्या मित्राने डॉ नाय ने पुढाकार घेतलेला असतो, त्यातून अनेक गैरसमज वाढत जातात, हे नेमके काय काय घडत असते ते मी सांगणार नाही, तुम्हीच अनुभव घ्या.
सासू राधाबाई ची भूमिका नयना आपटे यांनी रंगतदार केली आहे, दिनूच्या भूमिकेत संतोष पवार आणि डॉ नाय च्या भूमिकेत विनय येडेकर मजा आणतात, त्यांना साथ इरावती लागू { मेनका देवी }, दीपश्री कवळे { हिरा }, रोनक शिंदे { रवी }, ऋतुंभरा माने { प्रीती }. वैभवी देऊलकर–धुरी { मीना } यांनी साथ दिली आहे. पळापळ, धावपळ, समज–गैरसमज ह्यातून हे नाटक फुलत असले तरी नाटकाचा पहिला अंक हा बराच लांबलेला जाणवतो, पण दुसरा अंक प्रेक्षकांची पकड घेतो, संतोष पवार यांनी आजच्या काळाला अनुसरून काही योग्य ते बदल करून नाटक दिगदर्शित केलं आहे, संतोष पवार / विनय येडेकर यांच्या अभिनयाच्या जुगलबंदी बरोबरच संपूर्ण नाटकात नयना आपटे यांनी रंगवलेली सासूबाई राधाबाई लक्षांत राहतात. पळापळ–धावपळ–समज–गैरसमज इत्यादींनी नाटक रंगतदार बनले आहे. पूर्वी बबन प्रभू / आत्माराम भेंडे यांचा विनोद वेगळ्या धाटणीचा होता, संवादफेक आणि विनोदाचे अचूक टायमिंग हि खास असायची, आता संतोष पवार / विनय येडेकर यांनी तो बाज आणण्याचा प्रयत्न चांगला केला आहे. नेपथ्य / प्रकाश योजना योग्य अशी असून संगीत सुद्धा चांगले आहे.
एकंदरीत दिनूची कमाल आणि सासूची धमाल असे हे नाटक आहे.
दीनानाथ घारपुरे
आनंद म्हसवेकर यांचे हे २२ वे व्यावसायिक नाटक आहे. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे, एक गंभीर विषय त्यांनी विनोदी पद्धतीने या नाटकात मांडला आहे. या नाटकाच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे पुन्हा एकदा रंगभूमीवर येत आहेत. अरुण नलावडे यांच्यासह माधवी दाभोळकर, संजय क्षेमकल्याणी, शर्वरी गायकवाड, मेघना साने, देवेश काळे व संजय देशपांडे हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत.
– राज चिंचणकर
मराठी रंगभूमीवर सातत्याने येणाऱ्या नाटकांतून कायम लक्षात राहू शकतील अशी नाटके मोजकी असतात. १९८५ मध्ये रंगभूमीवर आलेले ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक त्यातल्या आगळ्या विषयामुळे रसिकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. याच नाटकाचे आता माध्यमांतर होत असून, हे नाटक ३१ ऑगस्ट रोजी मोठया पडद्यावर येत आहे.
शेखर ताम्हाणे यांच्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाने त्यावेळी रंगभूमीवर राज्य केले होते. राजन ताम्हाणे आणि रीमा यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात होत्या. संहिता, अभिनय, दिग्दर्शन व पार्श्वसंगीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनाचा थरकाप उडवण्याचे काम या नाटकाने केले होते. हा सगळा अनुभव आजच्या पिढीला थेट मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, यासाठी कुणी मराठी व्यक्ती नव्हे; तर बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम पुढे सरसावला असून, त्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केले असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट आदी कलावंतांच्या यात भूमिका आहेत.
या नाटकाचे मूळ लेखक शेखर ताम्हाणे या माध्यमांतराविषयी म्हणतात, एखादा विषय मुळातून कळणे महत्त्वाचे असते. माझ्या या नाटकाच्या विषयावर एखादा चित्रपट होईल, इतकी त्याची खोली नक्कीच आहे. पण हा विषय मुळातून कळणे फार महत्त्वाचे आहे. असा विषय एखाद्या कलाकृतीत हाताळणे, ही तारेवरची कसरत असते. स्वप्ना वाघमारे-जोशी यांना मात्र हा विषय अचूक समजला आहे आणि तो त्यांनी या चित्रपटात व्यवस्थित मांडला असेल याची खात्री आहे.
‘फार्ससम्राट’ बबन प्रभू यांच्या रंगभूमीवर नव्याने आलेल्या ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या नाटकाने अल्पावधीतच २५ प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. गेली चार दशके रंगभूमीवर हे नाटक गाजत आहे. १९७३ मध्ये प्रथम हे नाटक रंगभूमीवर सादर झाले होते. नव्या संचात हे नाटक रंगभूमीवर सादर होत असून, विनोदाचा बादशहा संतोष पवार याने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.