सगळ्या नात्यासोबातच आई वडिलांसोबत असणाऱ्या नात्याचे समीकरण वेगळेच असते. त्यातूनही आईसोबत असलेले नाते हे सगळ्यांच्याच जवळचे असते. तिच्यासमोर आपण अगदी सहज व्यक्त होतो. मनात कोणतेही दडपण नसते. पण बाबासमोर वागताना मात्र, मनात आदरयुक्त भीती असते. बाबाशी मैत्री हा होण्यासाठी बराच वेळ जातो. त्यातूनही असेच बाबा आणि मी असे मैत्रीचे नाते सांगतात काही कलाकार.
बाबांना रडताना नाही पाहू शकत
माझे बाबा माझ्या फार जवळ आहेत. त्यांच्याशी मी सर्व गोष्टी शेअर करते. ते मला वडील म्हणून नव्हे तर एक मित्र म्हणून मार्गदर्शन करत असतात. अभिनय क्षेत्रात काम करण्याच्या माझ्या निर्णयावर बाबांनी मला खंबीरपणे साथ दिली. त्यांच्या सपोर्टमुळेच आज मी इथे आहे. ते खूप स्ट्राँग आहेत, आयुष्यात त्यांनी खूप संघर्ष अनुभवले, पण कधीच त्यांना रडताना मी पाहिले नाही. परंतु माझ्या लग्नात मला सासरी पाठवताना ते खुप रडले.
दीड वर्षापूर्वी पुण्यात माझे लग्न झाले, त्यावेळी मी काही रडणार नाही असे मनोमन ठरवले होते, पण माझी सासरी रवानगी करताना माझ्या बाबांना अश्रू अनावर झाले नाही, त्यांना असे रडताना पाहून मग मी अक्षरशः कोसळलेच. योगायोगाने ‘शुभ लग्न सावधान’ हा माझा आगामी सिनेमादेखील लग्नसंस्थेवर आधारित आहे. त्यामुळे माझ्या लग्नाचा दिवस मला आठवतो, आणि त्यासोबत माझे भावूक झालेले बाबा डोळ्यासमोर येतात. त्यांच्या डोळ्यात मी कधीच अश्रू पाहू शकत नाही. त्यांना रडताना पाहिल्यावर आजही मी खूप अस्वस्थ होते.
श्रुती मराठे, अभिनेत्री
*********************************************************
‘बाबा, मला तुमची सेवा करू द्या’
माझे बाबा पोलीस खात्यात असल्याकरणामुळे, मी देखील पोलीस खात्यात किंवा शासकीय विभागात काम करावे असे त्यांना वाटत होते, मात्र, माझा कल अभिनयावर जास्त असल्याकारणामुळे त्यांचा विरोध हा साहजिकच होता ! परंतु, नाटक आणि सिनेमात कालानुक्रमे माझी झालेली यशस्वी वाटचाल पाहिल्यावर त्यांचा विरोध मावळला. मी लहानपणापासून त्यांना कडक आणि शिस्तबद्ध असे पाहिले आहे, पण तितकेच ते हळवेदेखील आहेत.
मी कॉलेजमध्ये असताना गंभीररीत्या आजारी पडलो होतो, मला दवाखान्यात दाखल करावे लागले होते. त्यादरम्यान माझ्या हाताला लावलेली सलाईन निघाली होती. त्यावेळी माझा संपूर्ण हात आणि कपडे अक्षरशः रक्ताने माखले होते. तेव्हा माझ्या बाबांना पहिल्यांदाच मी हतबल झालेलं पाहिलं होतं. तो क्षण आजही आठवला कि माझे डोळे पाणावतात. फादर्स डे च्या निमित्ताने मी त्यांना इतकच सांगेन कि, सगळ्यांसाठी तुम्ही खूप केलंत , आता स्वतःसाठी वेळ काढा, मला तुमची सेवा करू द्या, आणि नेहमी आनंदी राहा. Happy Father’s डे…
हेमंत दयानंद ढोमे.
***************************************
बाबांनी दिलेला कानमंत्र नेहमीच पाळणार
भरपूर लोकांना असं वाटत असेल की, वामन केंद्रे आपल्या मुलाला घरी नाटकाचे धडे शिकवत असतील. पण खरं सांगू का, माझे बाबा एनएसडीचे अध्यक्ष झाल्यापासून गेली चार वर्ष ते दिल्लीमध्येच स्थायिक आहेत. तसेच, जेव्हा ते मुंबईत होते, तेव्हादेखील स्वत:च्या कामात इतके व्यस्त असायचे की, त्यांची आणि माझी भेट थेट रात्री व्हायची. इयत्ता पहिलीपासून ते आजवर बाबांच्या कामाचे केवळ निरीक्षण करतच मी मोठा झालो आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, नियोजन, घरी असताना त्यांनी लिहिलेली नाटकं मी जवळून पहिली आहेत. त्यांच्या काही नाटकांत मी कामदेखील केले असले तरी, त्यांच्याकडून जितके काही शिकता येईल तितके माझ्यासाठी कमीच आहे. बाबा दिल्लीत जरी असले तरी, माझ्या कामाबाबत ते सतत मला फोन करून मार्गदर्शन देत असतात. माझ्या अभिनयात मी कुठे कमी पडतो आहे, त्यासाठी मला काय करायला हवे, ते सांगतात. अभिनय क्षेत्रात उतरताना बाबांनी मला ‘काम करत असताना तुझ्या बद्दल कोण काय विचार करतय या कडे लक्ष देऊ नकोस ‘ असा कानमंत्र दिला होता.

‘ड्राय डे’ या मराठी सिनेमात माझा डेब्यू असून, बाबांचा कानमंत्र मी या सिनेमासाठी इमान- ए -इतबारे पाळला आहे.
ऋत्विक वामन केंद्रे, अभिनेता.
********************************************
शनिवार-रविवार आमच्या दोघांचा हक्काचा दिवस
बाबा आणि मला खूप कमी वेळ सोबत घालवायला मिळतो कारण माझ्याबरोबर नेहेमी माझी आईच असते. पण जेव्हा कधी बाबा ऑफिसवरून लवकर येतात तेव्हा तेच मला सेटवर घ्यायला सुद्धा येतात, शनिवार-रविवार हा फक्त माझा आणि माझ्या बाबांचाच असतो. त्या दिवसात बाबा मला माझ्या अभिनयामधील त्यांचे निरीक्षण सांगतात. मला जेव्हा “पिप्सी”साठी सर्वोत्कृष्ट बालकलाकारचा राज्य पुरस्कार मिळाला, तेव्हा सर्वात जास्त आनंद त्यांनाच झाला होता. माझे बाबा कामात खूप व्यस्त असले तरी, ते सतत माझा विचार करत असतात. मला आठवते की, ३-४ वर्षापूर्वी तू माझा सांगाती या मालिकेच्या ऑडीशनदरम्यान माझा पाय फ्रँक्चर झाला होता. बाबा कार रिव्हर्स घेत असताना तो अपघात झाला होता. त्यात दोन दिवसांवर ऑडीशन होते त्यामुळे बाबा खूप दुखावले होते. मग मीच त्यांना सांगितलं की मी अशीच आँडीशन देणार आहे. असे हे माझे बाबा जगातले बेस्ट बाबा असून, त्यांचा सपोर्ट मला नेहमीच असतो.
मैथिली केदार पटवर्धन, बालकलाकार
**********************************************
बाबा माझे प्रेरणास्थान
माझे बाबा पुरुषोत्तम विनायकराव जाधव माझे प्रेरणास्थान आहेत. मी आज जे काही आहे ते केवळ त्यांच्यामुळेच. ते मोठे सरकारी अधिकारी असल्यामुळे लहानपणी मी त्याचा खूप फायदा उचलायचो, पण जसे सज्ञान होत गेलो, तसे त्यांच्यावर असलेल्या कामाच्या आणि कार्याच्या जबाबदारीचे भान मला आले. ऑफिस आणि कुटुंब या दोघांमध्ये बेलेंस कसा साधायचा हे बाबांनीच शिकवलं. कॉलेज ड्राॅपर पासून रॅपर, चित्रपट निर्माता ते आता ‘मी पण सचिन’ या सिनेमाच्या दिग्दर्शनापर्यंतचा माझा हा प्रवास बाबांच्या मार्गदर्शनामुळेच सहजशक्य झाला. सिनेमाचा कॅप्टन ऑफ द शिप असणाऱ्या दिग्दर्शकाची जबाबदारी एका कुटुंबप्रमुखासारखीच असते. माझ्या बाबांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबप्रमुखाची ही जबाबदारी चोख पार पाडली आहे, त्यांचे हेच आदर्श आज मला चित्रपट दिग्दर्शनात कामी येत आहे. आगामी काळातही त्यांची वटवृक्षासारखी मोठी सावली माझ्यावर राहील, याची मला खात्री आहे.

श्रेयश पुरुषोत्तम जाधव, रॅपर, निर्माता, दिग्दर्शक.