‘लेखिका-दिग्दर्शिका’ मृण्मयी देशपांडे… 

– राज चिंचणकर 

       अभिनेत्री, नृत्यांगना, निर्माती या आणि अशा विविध रूपात मृण्मयी देशपांडे आतापर्यंत रसिकांच्या समोर आली आहे. पण आता तिच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला जात आहे. ‘मन फकीरा’ या रोमँटिक चित्रपटाच्या निमित्ताने तिने नवे आव्हान पेलले असून, या चित्रपटाद्वारे आता तिची ओळख ‘लेखिका-दिग्दर्शिका’ अशी कायम होणार आहे. 

Mann Fakira

       तिच्या या चित्रपटात सुव्रत जोशीसायली संजीवअंजली पाटील आणि अंकित मोहन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. नातेसंबंधांवर आधारित असा हा चित्रपट ६ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, गायन अशी जबाबदारी सिद्धार्थ महादेवनसौमिल शृंगारपुरे आणि यशिता शर्मा यांनी सांभाळली आहे. वैभव जोशी व क्षितिज पटवर्धन यांच्या लेखणीतून या चित्रपटातली गाणी उतरली आहेत. 

 

     या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन करणारी मृण्मयी तिच्या चित्रपटाबद्दल व यातल्या संगीताविषयी बोलताना म्हणते, आजच्या तरुण पिढीला आवडतील अशी गाणी मला चित्रपटात हवी होती. सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल यांनी अशाच पद्धतीची खूप उत्तम दर्जाची गाणी मन फकीरासाठी केली आहेत. या चित्रपटाच्या गाण्यांना सोशल मिडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि या चित्रपटालाही रसिक उत्तम प्रतिसाद देतील याची मला खात्री आहे. 

कोळीवाड्याला मिळाला ‘बोनस’… 

– राज चिंचणकर 

       सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘बोनस’ या चित्रपटाची चर्चा जोरात आहे. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे दोघे कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या चित्रपटाचे चित्रीकरण चक्क कोळीवाड्यात झाले आहे.
Bonus
       या चित्रीकरणाच्या निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम कोळीवाड्यात अवतरली होती. साहजिकच, या चित्रपटाच्या माध्यमातून या कोळीवाड्याला आगळा ‘बोनस’ मिळाला आहे. आता या चित्रपटात नक्की काय आहे आणि त्याचा कोळीवाड्याशी नक्की काय संबंध आहे; ते २८ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेलच.
       गश्मीर आणि पूजा या जोडीसह या चित्रपटात जयवंत वाडकर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या विषयी बोलताना जयवंत वाडकर म्हणतात, माझ्या जडणघडणीत कोळीवाड्याचा मोठा वाटा आहे; त्यामुळे या चित्रपटाशी मी खूपच रिलेट झालो.
       हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिणारा सौरभ भावे याने ‘बोनस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता सौरभ भावेला हा चित्रपट ‘बोनस’ देणार का, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

मराठी चित्रपट परीक्षण  ‘चोरीचा मामला’ -पाठशिवणीच्या खेळात रंगलेले पडद्यावरचे नाट्य…! 

 
* * *   (३ स्टार)
 
– राज चिंचणकर 
 
       दोन घटका निव्वळ करमणूक किंवा डोके बाजूला ठेवून बघण्याची गोष्ट, या व्याख्येत ‘चोरीचा मामला’ हा चित्रपट फिट्ट बसतो. या चित्रपटाला एक विशिष्ट कथानक नक्कीच आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन प्रासंगिक विनोद आणि चटपटीत संवादशैलीतून निर्माण होणाऱ्या हास्यस्फोटकाने हा चित्रपट सजला आहे. कलाकारांची उत्तम साथ या चित्रपटाला लाभल्याने, या चित्रपटातला विनोद अधिकच खुलून आला आहे. जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अमृता खानविलकर, क्षिती जोग या प्रमुख चौकडीने या चित्रपटात हास्यकल्लोळाची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या जोडीला अनिकेत विश्वासराव, कीर्ती पेंढारकर, रमेश वाणी आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत आणि त्यांनी या चौकडीला धमाल साथ दिली आहे. डोक्याला अजिबात त्रास होऊ न देता निव्वळ मनोरंजन करण्याची जबाबदारी या चित्रपटाने घेतल्याचे दिसून येते.
3
       या चित्रपटाची गोष्ट एका रात्रीत घडते. नंदन नामक चोर, अमरजीत या राजकारणी व्यक्तीच्या फार्महाऊसवर चोरी करण्यासाठी जातो. श्रद्धा या गायिकेवर भाळलेला अमरजीत, तिला घेऊन त्याचवेळी या फार्महाऊसवर येतो. त्यानंतर सुरू होतो लपाछपी आणि उंदीर-मांजराचा खेळ; ज्यातून प्रसंगनिष्ठ अशा विनोदाची पेरणी या चित्रपटात होत जाते.
       केवळ विनोदाचा हास्यकल्लोळ घडवायचा, या हेतूनेच प्रियदर्शन जाधव याने या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर कामगिरी बजावली आहे. विनोदी ढंगाच्या प्रसंगांची पेरणी या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येते. मात्र हा पाठशिवणीचा खेळ खेळत असताना यातला चोर, अमरजीत व श्रद्धाचे लक्ष वेधून घेण्याच्या (?) उद्देशाने जिन्यावरून मुद्दाम वर-खाली करत असतो; हे खटकते. एवढ्या मोठ्या फार्महाऊसवर त्याला लपायला सहज जागा उपलब्ध असतानाही तो इतरत्र कुठेही लपत नाही, हे सहज पचनी पडत नाही. मात्र असे असले, तरी एकंदर चित्रपटाला देण्यात आलेली ट्रीटमेंट पाहता अशा गोष्टींवर आपोआप पांघरूण घातले गेले आहे.
6
       या चित्रपटात नाटक अधिक दिसते; असे म्हणण्याचे कारण इतकेच की हे एका रात्रीत आणि एका स्थळावर घडणारे खरोखरच हे एक नाट्य आहे. काही ठिकाणी यातला विनोद अधिक ‘रंगात’ आल्यासारखा वाटतो; परंतु यातल्या कलावंतांनी या चित्रपटावर ठेवलेल्या पकडीत या ‘अधिकच्या’ काही गोष्टी सहज विरघळून गेल्या आहेत.
       जितेंद्र जोशी याने यात चोराची भूमिका रंगवताना कायिक आणि मुद्राभिनयाद्वारे प्रचंड भाव खाल्ला आहे. हेमंत ढोमे याने चेहऱ्यावर स्थितप्रज्ञतेचा भाव ठेवत वेगळीच मजा आणली आहे. अमृता खानविलकर हिने यातली श्रद्धा टेचात आणि लाडिक रंगवली आहे. क्षिती जोग आणि कीर्ती पेंढारकर यांनीही त्यांच्या भूमिका लक्षवेधी केल्या आहेत. अनिकेत विश्वासराव याने इन्स्पेक्टर साकारताना, आक्रस्ताळेपणातून आगाऊपणा मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
       या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यात असलेले आकर्षक गाणे आणि त्यातला रेट्रो लूक!  जुन्या गीताचा बाज असलेले हे मजेशीर गाणे लक्षात राहते. चिनार-महेश व प्रफुल्ल स्वप्नील यांचे संगीत उत्तम वाजले आहे. एकूणच, हा ‘चोरीचा मामला’ रंजकतेची पातळी सांभाळत धमाल घडवून आणतो, हे वेगळे सांगण्याची आवशक्यता नाही.

‘देव’गाण्याच्या आठवणींची ‘प्रशांत’ लय…! 

– राज चिंचणकर
       कोणत्या कलाकृतीची लय कुणाला कधी साधता येईल, हे सांगणे कठीणच! अशातच तो ‘रंगभूमीवरचा विक्रमादित्य’ असेल, तर त्याला अधिकच महत्त्व प्राप्त होते. रंगभूमीवर विविध विक्रम प्रस्थापित करणाऱ्या प्रशांत दामले यांच्या बाबतीत असेच काहीसे घडले. ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांच्या १० वर्षांपूर्वीच्या गाण्याची आठवण प्रशांत दामले यांना अचानक झाली आणि त्यांनी त्या गाण्याला नवे रूप देत थेट ‘प्रशांत’ लय साधली. या गाण्याच्या निमित्ताने कविवर्य मंगेश पाडगावकर यांची लेखणी आणि यशवंत देव यांचा स्वरसाज यांना सोशल मिडियावर एकत्रित ‘दामले टच’ लाभला आहे. ‘तू म्हणशील तसं!’ या नाटकाच्या निमित्ताने या योग जुळून आला आहे.
TM03
       प्रशांत दामले यांना १० वर्षांपूर्वी एकदा यशवंत देव यांचा फोन आला आणि त्यांनी दामलेंना भेटायला बोलावले. त्यादिवशीचा शिवाजी मंदिरचा प्रयोग रंगवून प्रशांत दामले यशवंत देवांच्या घरी पोहचले. दामलेंना देवांनी पाहिले आणि त्यांनी पेटी हाती घेऊन दामलेंना ‘आता गा’ अशी आज्ञा दिली. त्याबरहुकूम, दामलेंनी जुनी गाणी गायला सुरुवात केली. मध्येच देवांनी एक नवेकोरे चुरचुरीत गाणे घेतले आणि ते दामलेंना म्हणाले, हे गाणे पाडगावकरांनी लिहिले आहे आणि ते तुला गायचे आहे. वर, मला गाणे ‘म्हणणारा नकोय’ मला ‘गाणे बोलणारा हवा’ आहे, असे देव यांनी स्पष्ट केले. देवांनी दामलेंचा आत्मविश्वास वाढवला आणि मग त्या गाण्याच्या तालमी सुरु झाल्या.
Prashant Damle
       ही घटना सांगताना प्रशांत दामले म्हणतात, १०-१२ वर्षांपूर्वी मंगेश पाडगावकरांनी हे गाणे लिहिले असले, तरी त्यातला प्रत्येक शब्द त्यावेळीच नव्हे; तर आजही लागू होतो. साहजिकच या गाण्याची भुरळ माझ्यावर पडली आणि हे गाणे रेकॉर्ड करायचे मी ठरवले. वास्तविक, रेकॉर्डिंगच्या वेळी दामलेंना दडपण आले होते; कारण त्यावेळी पाडगावकर स्वतः हजर होते. मात्र दोन टेकमध्ये दामलेंकडून त्यांनी ते गाणे परिपूर्ण करून घेतले. रेकॉडिंग झाल्यावर यशवंत देव आणि मंगेश पाडगावकर यांच्या पसंतीस ते गाणे उतरले आणि त्यांनी दामलेंना शाबासकी दिली. प्रशांत दामले यांनी त्यांची निर्मिती असलेल्या ‘तू म्हणशील तसं!’ या नाटकात भूमिका करण्याचे मनावर घेतले नसले; तरी या नाटकाचे औचित्य साधून सोशल मिडियाच्या माध्यमातून, हे गाणे रसिकांच्या दरबारी रुजू करत त्यांनी या गाण्याला ‘दामले टच’ मिळवून दिला आहे.

वास्तव घटनांवर आधारित ‘अन्य’… 

– राज चिंचणकर 
       एका डॉक्युमेंट्रीच्या दृष्टिकोनातून समाजात घडणा-या वास्तववादी घटनांचा वेध घेत एक सत्य मांडण्याचा प्रयत्न ‘अन्य’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट निर्माण होत आहे. मार्च महिन्यात हा चित्रपट पडद्यावर येत आहे.
Annya
       सिम्मी जोसेफ हे दाक्षिणात्य दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे मराठीसह हिंदीमध्ये पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनासोबतच त्यांनी या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली आहे. अतुल कुलकर्णा, प्रथमेश परब, भूषण प्रधान, तेजश्री प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे या मराठमोळ्या कलाकारांसह हिंदी पडद्यावरील अभिनेत्री रायमा सेन या चित्रपटात भूमिका करत आहे. तसेच गोविंद नामदेव आणि यशपाल शर्मा हे विशेष भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

आलियाचा ‘गंगुबाई’ लूक!!!

सिनेक्षेत्रात वेगवेगळ्या भूमिकांना योग्य न्याय देणारी आलिया भट्ट आता अजून एका भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाचे पहिलं पोस्टर नुकतेच लाँच झाले. गंगुबाई काठीयावाडी या सिनेमात आलिया तीच्या अभिनयाची जादू चाहत्यांना लवकरच देणार आहे.IMG-20200115-WA0002

आयुष्यात मिळालेली दुसरी संधी ही अत्यंत महत्त्वाची – राहुल देशपांडे

स्टार प्रवाहवर १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता सुरु होणाऱ्या  ‘मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राहुल देशपांडेमृणाल कुलकर्णीआदर्श शिंदे या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत असून पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. याचनिमित्ताने सुप्रसिद्ध गायक आणि जज राहुल देशपांडे यांच्याशी साधलेला हा खास संवाद

Rahul

* ‘मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाचं वेगळेपण काय सांगाल?

मी होणार सुपरस्टार नावातच खूप सकारात्मकता आहे. स्टार प्रवाहसोबतचा हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. इतकी छान टीम आहे त्यामुळे काम करायलाही मज्जा येते. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या स्पर्धकांसाठी ‘मी होणार सुपरस्टार’चा मंच दुसरी संधी देणार आहे. महाराष्ट्रातून शोधलेल्या ३० स्पर्धकांपैकी कोणत्या स्पर्धकांची निवड करायची हा खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे मनावरती दगड ठेवून आम्ही १५ ऐवजी १६ स्पर्धकांची निवड केली आहे. १६ स्पर्धकांमधील प्रत्येकाच्या आवाजात वेगळेपण आहे. प्रत्येकाची गाण्याची स्टाईलही खूप वेगळी आहे. मला खात्री आहे हे आवाज महाराष्ट्राला आवडल्यावाचून रहाणार नाहीत.

* आयुष्यात दुसरी संधी किती महत्त्वाची आहे?

अत्यंत महत्त्वाची आहे. पण त्या संधीचा तुम्ही कसा उपयोग करता हे देखिल तितकंच महत्त्वाचं आहे. मला लहानपणापासून गाण्याची आवड होतीच. आणि घरात संगीताचा वारसा असल्यामुळे लहानपणापासूनच मला त्याचं बाळकडूही मिळालं आहे. संगीताची आवड जोपासताना मी सीएचं शिक्षणही घेत होतो. आपल्या सर्वाचे लाडके पु ल देशपांडे हे माझ्या आजोबांचे चांगले परिचयाचे होते. त्यामुळे त्यांच्या घरी येणं जाणं व्हायचं. माझी गाण्याची आवड पाहून त्यांनीच मला संपूर्णपणे गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. माझ्यामते हा विश्वास ही माझ्या आयुष्यातली दुसरी संधी होती असं मला वाटतं. त्यामुळे ‘मी होणार सुपरस्टार’च्या निमित्ताने स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीचं सोनं स्पर्धकांनी करायला हवं.

 

* या कार्यक्रमाच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. कार्यक्रमाच्या ग्रॅण्ड ओपनिंग विषयी काय सांगाल?

मी आजवर फक्त ग्रॅण्ड फिनाले पाहिला आहे. पण एखाद्या कार्यक्रमाची इतकी ग्रॅण्ड सुरुवात कधीच पाहिलेली नाही. त्यामुळे १२ जानेवारीचा दिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून मी होणार सुपरस्टारची ही रंगतदार मैफल सुरु होणार आहे. उदित नारायण, सुखविंदर सिंग, शान, मिका सिंग, शाल्मली खोलगडे, नकाश अझिझ असे दिग्गज गायक पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यांची गाणी ऐकणं हा सुखद अनुभव असेल.

* ‘मी होणार सुपरस्टारच्या सेटवरचं वातावरण कसं असतं?

मी, मृणाल कुलकर्णी, आदर्श शिंदे आणि पुष्कर श्रोत्री आम्हा चौघांचीही छान गट्टी जमून आलीय. आदर्श माझा पहिल्यापासून मित्र होताच. पुष्करच्या एनर्जीबद्दल तर मी काय बोलू…त्याची एनर्जी कधी संपतच नाही. त्यामुळे सलग शूट केल्यानंतरही आम्हाला कंटाळा येत नाही. त्याच्याकडे पाहून नवी स्फुर्ती मिळते. मृणालपण इतकी गोड आहे. तिचा प्रेझेन्स खूप छान आहे. ती प्रत्येकाशीच मायेने बोलते. ‘मी होणार सुपरस्टार’च्या निमित्ताने नवं कुटुंब मिळालं आहे असंच म्हणायला हवं.

* जजची भूमिका पार पाडणं अवघड आहे असं वाटतं का?

नक्कीच. मी सुद्धा आयुष्यात खूप स्ट्रगल करुन पुढे आलो आहे. त्यामुळे न दुखवता पण तितकंच खरेपणाने मी माझं मत सांगतो. स्पर्धकांचं टॅलेण्ट खरोखर थक्क करणारं आहे. त्यामुळे जज म्हणून आमचाही कस लागतोय.

अरुंधतीत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न -मधुराणी गोखले प्रभुलकर

आई कुठे काय करते या मालिकेविषयी काय सांगाल?

आई आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. आई या शब्दाभोवतीच इतक्या भावभावना जोडलेल्या असतात. अगदी कवितेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर मी म्हणेन, ‘तुझ्या पोटावरच्या माझ्या जन्मखुणा तू दाखवल्या नाहीस कधी मातृत्वाचे उपकार म्हणून, ठेवला नाहीस जमाखर्च पदारआडून दिलेल्या दानाचा आणि पदर मोडून दिलेल्या धनाचा, तुझ्या हातावर नाही आहेत आता खुणा मला न्हाऊ माखु घातल्याच्या, तुझ्या डोळ्यात नाही आहेत सुगावे माझ्या दुखण्या खुपण्यात रात्री जागल्याचे…इतकी कशी बेहिशेबी गं तू? मी मात्र तुला आणलेल्या औषधांचा हिशोब ठेवलाय काल डायरीत… सांग ना आई कसा उतराई होऊ सांगना आई तुझी आई कसा होऊ…’या ओळीच खरतर खूप काही सांगून जातात. आपल्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आणि तरीही कायम दुर्लिक्षित राहणाऱ्या आईची गोष्ट म्हणजे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका. या मालिकेचं वेगळेपण जसं नावात आहे तसंच सादरीकरणामध्येही आहे. प्रोमोपासून ते जपण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मालिका पहाताना हा वेगळेपणा तुम्हाला नक्कीच जाणवेल. अर्थातच याचं श्रेय जातं स्टार प्रवाह वाहिनी, निर्माते राजन शाही, दिग्दर्शक रवी करमरकर, आमची लेखिका रोहिणी निनावे आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला.

MADHURINI PIC 2

या मालिकेच्या निमित्ताने तुमचं मालिका विश्वात कमबॅक होत आहे त्याविषयी…

खरंय जवळपास १० वर्षांनंतर मी मालिका करते आहे. अर्थातच १० वर्षांचा हा गॅप आईपणासाठीच घेतला होता. मला सहा वर्षांची मुलगी आहे. तिच्या जन्मानंतर तिला वेळ द्यायचं हे मी ठरवलं होतं आणि तिच्या संगोपनासाठी पूर्णपणे स्वत:ला झोकून दिलं. आई कुठे काय करते मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी मला खूप आवडली आणि मालिका करण्याचा मी निर्णय घेतला.

मालिकेत तुम्ही साकारत असलेल्या भूमिकेविषयी काय सांगाल?

या मालिकेत मी अरुंधतीची भूमिका साकारते आहे. अरुंधती प्रचंड हळवी आहे. सर्वांवर भरभरुन प्रेम करणारी. माझा जन्म सर्वांना प्रेम देण्यासाठी झालाय, त्यामुळे मी चिडणार नाही कुणाच्याही बोलण्याचा त्रास करुन घेणार नाही असं तिने मनाशी पक्क ठरवलं आहे. तिचं समर्पण तिचा सोशिकपणा ही तिची शक्तीस्थानं आहेत. मनाने अतिशय निर्मळ आणि भाबडी असणाऱ्या या अरुंधतीत प्रत्येकजण आपली आई नक्कीच शोधेल. खास बात सांगायची म्हणजे मला आणि अरुंधतीला जोडणारा समान धागा म्हणजे गाण्याची आवड. मला गाण्याची आवड आहेच अरुंधतीलाही गाण्याची आवड आहे. त्यामुळे भूमिका साकारताना मी अरुंधतीत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करते.

तुमच्या आईविषयी…

माझी आई हा माझ्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. माझी आई शास्त्रीय संगीत गायिका आहे. पण आपल्या कलेला नेहमीच दुय्यम स्थान देऊन तिने आपलं मातृत्व आणि सर्व जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्या. घरसंसार सांभाळताना तिची आवड मागे पडली याची मला खंत आहे. आईचं समर्पण शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे घरासाठी, मुलांसाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलीचं महत्त्व पटवून देणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका म्हणूनच माझ्यासाठी खुप खास आहे.

‘एकदा काय झालं’ चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त संपन्न

संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांची गाणी कायम सदाबहार असतात. पण गाण्याच्या पलिकडे जाऊन सलील यांनी नुकतंच दिग्दर्शनात पदार्पण केलं ते वेडिंगचा शिनेमा’ या मराठी सिनेमातून. धमाकेदार मनोरंजनाचं पॅकेज असलेला सिनेमा दिल्यानंतर आता डॉ. सलील कुलकर्णी पुन्हा सज्ज झाले आहेत एक नवीन अनुभव देण्यासाठी. ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी यांच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाचं पहिलं-वहिलं पोस्टर सोशल मीडियावरुन लॉन्च केलं गेलं.

एकदा काय झालं या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त २६ डिसेंबर रोजी पुणे येथे सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपटात महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित पार पडला. यावेळी या चित्रपटातील कलाकार सुमित राघवनउर्मिला कोठारेडॉ. मोहन आगाशेसुहास जोशीपुष्कर श्रोत्रीराजेश भोसलेप्रतीक कोल्हेमुक्ता पुणतांबेकरआकांक्षा आठल्येरितेश ओहोळअर्जुन पुर्णपात्रेअद्वैत वाकचौPhoto-2डेअद्वैत धुळेकर आणि मेरवान काळे उपस्थित होते. २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

जेव्हा पत्रकारांच्या मातोश्रींचा सन्मान होतो…! 

– राज चिंचणकर

       मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या मातोश्रींच्या सन्मानाचा दुर्मिळ योग ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेच्या निमित्ताने जुळून आला आणि ‘आई’ नावाचा संवेदनशील कोपरा अधिकच हळवा झाला. आईपणाच्या भावविश्वाचा मागोवा घेणारी ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सुरु झाली आहे आणि या मालिकेच्या टीमने असा आगळावेगळा सन्मान करत अनोखा पायंडा पाडला.

Raj1

‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत आईची, अर्थात अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत आहे. मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले आदी कलाकारही या मालिकेत भूमिका रंगवत आहेत. या मालिकेच्या शुभारंभाच्या निमित्ताने, या टीमने थेट पत्रकारांच्या मातोश्रींनाच साद घालण्याची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षातही आणली.

त्याप्रमाणे, पत्रकारांच्या मातोश्रींचा सन्मान खुद्द त्या-त्या पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला आणि या सोहळ्यात आईपणाचा वेगळा पैलू उलगडला गेला. रोजच्या कामाच्या धावपळीत दुर्लक्ष होत असलेल्या आणि ‘आई कुठे काय करते?’ या संभ्रमात अडकलेल्यांच्या दृष्टीसमोरचा पडदा यावेळी आईच्या ममत्वात पार चिंब होऊन गेला. मालिकेतल्या मधुराणी गोखले-प्रभुलकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे या कलाकारांसह, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड सतीश राजवाडे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. या मंडळींनी सांगितलेल्या त्यांच्या ‘आई’बद्दलच्या आठवणींनी, या चमकत्या ताऱ्यांच्या आयुष्यातल्या सर्वसामान्यपणाचे प्रतिबिंबही या सोहळ्यात मुक्तपणे सांडत गेले.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑