कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच या कार्यक्रमामध्ये कोण कोण असेल, कोण याचे सूत्रसंचालन करेल आणि मुख्य म्हणजे पहिल्या पर्वाचा विजेता कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीने बिग बॉस या कार्यक्रमाचे मराठमोळ रूपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, भरपूर प्रेमं दिले. कार्यक्रम सुरु होताच प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळविण्यास सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. आपल्या अस्सल मराठमोळ्या बिग बॉस पहिल्या सिझनमध्ये सदस्य १०० दिवसं अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच लोणावळा येथे पार पाडला. स्पर्धक आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होते विजेता कोणी एकच असणार आहे. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता, महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता मिळाला. मेघा धाडे ठरली बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती तर पुष्कर जोगने पटकावले दुसरे स्थान. मेघा धाडेला १८ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि खोपोली येथे Nirvana Leisure Realty सिटी ऑफ म्युझिक कडून एक घर.
बिग बॉस मराठीच्या घराने पहिल्या दिवसापासून अनेक नाती बनताना बघितली, तर जसे दिवस सरत गेले ती नाती बदलताना, बिघडताना,त्यांच्यामध्ये कटुता येताना बघितले. पण या प्रवासात खुर्ची सम्राट या टास्कमुळे घरामध्ये दोन ग्रुप झाले, त्यानंतर एक ग्रुप शेवट पर्यंत टिकला तर दुसऱ्या ग्रुपला गळती लागली. या घरामध्ये पुरूषांनी कधी दादागिरी केली पण या घरातल्या मुली सगळ्यांना पुरून उरल्या. बिग बॉस मराठीचे घर प्रत्येक सदस्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. या घराने आऊची माया अनुभवली,थत्तेची थत्तेगिरी प्रेक्षकांना खूप आवडली, सुशांतच रडण पाहिलं, मेघाच या घरावरच आणि कार्यक्रमावरच, किचनवरच प्रेम पाहिलं आणि तिची बडबड देखील ऐकली. तसेच राजेशचा अज्ञातव्यास पाहिला, जुईची चीडचीड आणि तक्रारी ऐकल्या, पुष्कर आणि सईची मैत्री पाहिली, पुष्करची टास्क दरम्यानची जिद्द बघितली आणि बघता बघता १८ सदस्यांचा प्रवास ६ जणांवर येऊन पोहचला.