

It's all about enterntainment
‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनला मिळलेल्या उदंड प्रतिसादानंतर स्टार प्रवाह वाहिनी या कार्यक्रमाचा दुसरा सीझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खास बात म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव दुसऱ्या सीझनचं सूत्रसंचालन करत आहेत. अजिंक्य देव यांच्या खास शैलीनं या मालिकेतल्या कथांचं नाट्य अधिक खुलणार आहे. याचनिमित्ताने अजिंक्य देव यांच्याशी केलेली ही खास बातचित.
१. ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या दुसऱ्या सीझनचं तुम्ही सूत्रसंचालन करत आहात त्याविषयी…
या कार्यक्रमाचा मुळ उद्देश समाजात जागृकता वाढवणं आहे असं मला वाटतं. समाजात घडणाऱ्या असंख्य गुन्ह्यांच्या गोष्टी आपण ऐकतो, वाचतो. पण त्या प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं आणि अश्या गोष्टींपासून सावध राहण्याचं आवाहन ‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या माध्यमातून करण्यात येतंय. त्यामुळे हा कार्यक्रम माझ्यासाठी खास आहे.
२.खूप वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केलंय त्याविषयी काय वाटतं?
हो खरंय. हिंदी टेलिव्हिजनवर माझी नुकतीच एक सीरिज येऊन गेली. पण मराठी टेलिव्हिजनवर मी खूप दिवसांनंतर दिसणार आहे. मुळात एखादा शो मनापासून आवडला तरंच मी तो स्वीकारतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चं वेगळेपण मला भावलं. याआधी ‘स्टार प्रवाह’च्याच स्वप्नांच्या पलिकडलेमध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. स्टार प्रवाह वाहिनीसोबत असणारं नातं या कार्यक्रमाच्यानिमित्ताने आणखी घट्ट होतंय याचा विशेष आनंद आहे.
३. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चं वेगळेपण काय सांगाल?
सध्या मराठीमध्ये गुन्ह्यांवर आधारित एकही कार्यक्रम नाहीय. शिवाय प्रत्येक दिवशी नवी गोष्ट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. प्रत्येक एपिसोडला नवी गोष्ट आणि नवे कलाकार असल्यामुळेच प्रेक्षकांना सिनेमा पहात असल्याचा फील येईल. समाजात ज्या घटना घडतात त्याचंच प्रतिबिंब या कार्यक्रमामधून दाखवण्यात येतंय. माझ्यासाठी हा अनुभव समृद्ध करणारा आहे. मला महाराष्ट्रभरातून अभिनंदन करणारे बरेच फोन आले. ‘प्रेमा तुझा रंग कसा’चे एपिसोड्स मित्रमंडळी आणि प्रेक्षकांना आवडत असल्याच्या प्रतिक्रियाही मिळत आहेत.
नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी ‘ललित २०५’ ही मालिका स्टार प्रवाहवर सुरु झालीय. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित
⏺’ललित २०५’चं वेगळेपण काय सांगशील?
– इतर कौटुंबिक मालिकांपेक्षा ही नक्कीच एक वेगळी मालिका आहे. एकत्र कुटुंबाची गोष्ट यात पाहायला मिळणार आहे. आजी आणि नातवाचं वेगळं नातं या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येईल. या मालिकेत मी नातवाची भूमिका साकारतो आहे. आजवरच्या भूमिकांपेक्षा ही पूर्णपणे वेगळी भूमिका आहे. नीलची स्वत:ची अशी मतं आहेत. त्यामुळेच ‘ललित २०५’ही मालिका माझ्यासाठी स्पेशल आहे.
⏺‘ललित २०५’ मध्ये सुहास जोशींसोबतच अनेक अनुभवी कलाकार मंडळी आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे
– खुपच छान. मालिकेची टीम चांगली असली की त्याचं प्रतिबिंब आपसुकच मालिकेत दिसतं. पहिल्या दिवसापासूनच आमची छान गट्टी जमलीय. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आम्ही ठरवून एकत्र करतो. आम्हाला एकत्र ठेवण्यात सुहासताईंची महत्त्वाची भूमिका आहे. त्या आम्हा सर्वांचीच खूप काळजी घेतात. फावल्या वेळात आम्ही खूप गप्पाही मारतो. सीनमधल्या महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चाही करतो. त्यामुळे या मालिकेच्या निमित्ताने मला एक छान हसतं खेळतं कुटुंब लाभलंय असंच म्हणायला हवं. यासाठी मी स्टार प्रवाह आणि सोहम प्रोडक्शन्सचा कायम ऋणी राहीन.
⏺या मालिकेसाठी खास ठाण्यात सेट उभारण्यात आलाय त्याविषयी..
– ‘ललित २०५’चा सेट म्हणजे खऱ्या अर्थाने नंदनवन। आहे. बारीक-सारीक गोष्टींचा विचार करुन हा सेट उभारण्यात आलाय. राजाध्यक्ष फॅमिलीचा पैठणीचा व्यवसाय आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सेटसाठी पैठणीचा वापर करण्यात आलाय. घराचे पडदेही साडीपासून बनवण्यात आले आहेत. या वास्तूत प्रवेश करताच आपसुकच सकारात्मक ऊर्जा मिळते.
काही नाटकं, काही कलाकृती ज्या रंगभूमीला कायमस्वरुपी योगदान देतात. त्यातीलच एक म्हणजे ‘संगीत देवबाभळी’. आज रंगभूमीवर ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. आजवर अनेक पारितोषिकांवर या नाटकाने आपले नाव कोरले आहे.
राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार या नाटकानं पटकावला. सेलिब्रेटी कलाकारापेक्षाही संहिता, अभिनय आणि संगीत यादेखील जमेच्या बाजू आहेत, हे या नाटकाने सिद्ध केलेय. याच नाटकातील दोन माऊली रखुमाई – आवली अर्थात मानसी जोशी – शुभांगी सदावर्ते हिच्याशी मारलेल्या गप्पा..
मानसी, तुझी नाट्यसृष्टीत सुरुवात कशी झाली आणि संगीत नाटकांचा अनुभव काय होता
२००३ मध्ये मी अथर्व थिएटर्स चे ‘संगीत लग्नकल्लोळ’ हे नाटक केले. संगीत लग्नकल्लोळ हे देखील साधारण याच पठडीतले नाटक होते. आधीच्या नाटकांना छेद देण्यासाठी त्याने काहीतरी वेगळेपण म्हणून संगीत ठेवले. पण, संगीत देवबाभळी हे नाटक पूर्णपणे वेगळे आहे. या नाटकात गाणं किंवा संगीत नाटकाला पुढे घेऊन जाते. गाणं सुरु झाल्यावर संहिता कुठेही थांबत नाही. नाटकाचा वेग कुठेही थांबत नाही. हे या नाटकाचे वैशिष्ट्य आहे.
या भूमिकेबद्दल काय सांगशील?
मी यात रुक्मिणीची भूमिका करतेय. या भूमिकेला अनेक भावना आहेत, अनेक भावनांमधून ती जाते, राग,प्रेम, वेदना, कुतूहल, काळजी अशा वेगवेगळ्या भावनांचा आलेख आहे. या सगळ्याच भावना मला प्रेक्षकापर्यंत पोहोचावायाच्या आहेत. त्यामुळे मला हि भूमिका करताना आनंद होतो.
तुझे पुढील प्लान काय आहे?
मी सध्या एका नाटकावर काम करतेय. भारताच्या पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी या भूमिकेवर काम करतेय. हे साधारण दीड तासाचे एकपात्री आहे, जे गुजराती, हिंदी आणि मराठी अश्या भाषांमध्ये सादर होत आहे. याचे आम्ही प्रयोग करत आहोत.
शुभांगी, तुझा नाट्यप्रवेश कसा झाला?
संगीत देवबाभळी हि एकांकिका प्रचंड गाजली. याच पहिल्या एकांकिकेतून मी नाट्यसृष्टीत आले. एकांकिकेला स्पर्धामधून पारितोषिकेही मिळालीत. एकांकिकेत मी आवलीची भूमिका करत होते. हि एकांकिका प्रसाद दादाने पाहिली, त्याला एकांकिका आवडली, एक वेगळा विषय त्यातूनही संगीताचा बाज. त्यामुळे ती एकांकिका नाटकस्वरुपात आणावी असे त्याला वाटले आणि याला व्यावसायिक नाट्याचे रूप आले आणि आवलीची भूमिका व्यावसायिक रंगभूमीवर आली.
तू संगीत शिकली आहेस का?
सर्वात आधी मी गायिका आहे. मी संगीतात बी.ए. केले आहे. माझे गाण्याचे शिक्षण सुरु आहे. मला गाणं येतं पण अभिनय येत नव्हता. पण अभिनय करून घेता येऊ शकतो, पण गाणं म्हणणे कठीण आहे. या सगळ्यातून मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाली.
हो. बराच फरक आहे. एकांकिका करताना आवली च्या भूमिकेला ठळक दाखवण्यात आले होते. पण नाटकात मात्र, रुक्मिणी आणि आवली दोन्ही प्रकर्षाने प्रेक्षकांना दाखवण्यात आल्या आहेत. दोघींच्या मनातील विठ्ठलाप्रती असणाऱ्या भावना यात दाखवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुक्मिणी आणि आवली या दोन्ही भूमिका तितक्याच महत्वाच्या आहेत.
या भूमिकेसाठी तुझा वेगळा अभ्यास होता का
नाही. आवली हि भूमिका खूप सजीव आणि नैसर्गिक आहे. मुळात दिग्दर्शकाने सांगितले होते, कि यात तू आवली करता करता स्वतःसोबत आवालीला अनुभवायचे आहेस. त्यामुळे या भूमिकेसाठी मी वेगळा अभ्यास केला नाही. हि आवली साकारताना मला कठीण जात होतं तिचे आयुष्य जगायला. पण तितकेच समाधान हि होते गेले. मी स्वतःमध्ये आवलीला पाहिले.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या भूमिकेला प्रेक्षकांची कौतुकाची थाप मिळते हीच पोचपावती आहे.
श्रीकांत वावदे
‘ओवी’ या हॉरर नाटकाद्वारे गौरी इंगवले या अभिनेत्रीने व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. ‘ओवी’ चा लवकरच २५ वा प्रयोग होणार आहे. यानिमित्त ‘ओवी’तील गौरी इंगवले आणि हेमांगी कवीशी केलेली बातचीत…..
गौरी, तुझ्या पहिल्या नाटकाविषयी काय सांगशील?
ओवी हे माझे पहिले नाटक आहे. नाटकाविषयी मला इतके काही माहित नव्हते. तालीम करताना रंगमंचावरील ब्लाक आउटला मी एका ठिकाणी थांबले होते. मला या नाटकासाठी सर्वांनी खूप मदत केली. हेमांगी ताई प्रत्येक दृष्य स्वतः करून दाखवायची. सुरुवातीला मी नाटकातल्या त्या भूमिकेतील सीनमध्ये ओरडत नव्हते. पण आता मी ओरडते. म्युझिक , प्रकाश यांना प्रतिसाद देणे गरजेचे होते आणि त्यासाठी मला तितक्याच जोराने ओरडणे गरजेचे होते. सर्वच कलाकारांनी मला खूप मदत केली.
पदार्पणातच तुला हॉरर नाटकातील लीड रोल करायला मिळाला तर त्यासाठी तू हॉरर भूमिकेचा अभ्यास केलास का?
हॉरर सिनेमे मी पाहते. मला आवडतात. अशीच हॉरर भूमिका मला आलीय पण यात मला स्वतःला घाबरायचे आहे आणि इतरांनाही घाबरवायचे आहे. आणि यासाठी मी खूप सराव केला आहे.
या नाटकाबद्दल हेमांगी कवी बोलते, ओवी हि एकांकिका होती,. या एकांकिकेला मी एका ठिकाणी परीक्षक होते, त्यामुळे मला हि एकांकिका आवडली होती, या नाटकाबद्दल मला जेव्हा विचारण्यात आले तेव्हा मी होकार दिला कारण रंगभूमीवर एक वेगळा प्रयोग घडणार आहे. या नाटकात मी समिधा नावाची भूमिका करतेय. ती एका आश्रमशाळेतील संचालिका आहे. या नाटकातील मुख्य पात्र म्हणजे नेपथ्य, संगीत आणि प्रकाश. या नाटकात आम्ही यां तीन गोष्टीना प्रतिसाद देतो त्यामुळे हे नाटक करताना मज्जा येतेय. प्रत्येक प्रयोगाला आम्ही काहीतरी नवीन शिकतोय.