कोळीवाड्याला मिळाला ‘बोनस’… 

– राज चिंचणकर 

       सध्या मराठी चित्रपटसृष्टीत ‘बोनस’ या चित्रपटाची चर्चा जोरात आहे. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत हे दोघे कलाकार या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या चित्रपटाचे चित्रीकरण चक्क कोळीवाड्यात झाले आहे.
Bonus
       या चित्रीकरणाच्या निमित्ताने या चित्रपटाची संपूर्ण टीम कोळीवाड्यात अवतरली होती. साहजिकच, या चित्रपटाच्या माध्यमातून या कोळीवाड्याला आगळा ‘बोनस’ मिळाला आहे. आता या चित्रपटात नक्की काय आहे आणि त्याचा कोळीवाड्याशी नक्की काय संबंध आहे; ते २८ फेब्रुवारी रोजी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर समजेलच.
       गश्मीर आणि पूजा या जोडीसह या चित्रपटात जयवंत वाडकर यांचीही महत्त्वाची भूमिका आहे. या विषयी बोलताना जयवंत वाडकर म्हणतात, माझ्या जडणघडणीत कोळीवाड्याचा मोठा वाटा आहे; त्यामुळे या चित्रपटाशी मी खूपच रिलेट झालो.
       हापूस, ताऱ्यांचे बेट, हृदयांतर, चुंबक अशा गाजलेल्या मराठी चित्रपटांच्या पटकथा लिहिणारा सौरभ भावे याने ‘बोनस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आता सौरभ भावेला हा चित्रपट ‘बोनस’ देणार का, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

चित्रपट परीक्षण – ‘म्होरक्या’ – संवाद माध्यमातून बोलणाऱ्या निःशब्द फ्रेम्स…! 

* * * १/२  (साडेतीन स्टार)  
 
 
 
– राज चिंचणकर 
 
       मराठी चित्रपट आशयघनतेच्या बाबतीत वरच्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे आणि त्यादृष्टीने मनाला भिडतील असे आशय व विचार मराठी चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. चित्रपट हे माध्यम मुख्यत्वेकरून कॅमेर्‍याचे आहे आणि त्याद्वारे कलाकृतीची उंची कमालीची वाढवण्याचे सामर्थ्य या तंत्रज्ञानात आहे. जरी एखादी साधी गोष्ट चित्रपटातून सांगण्यात येत असली, पण तिला उत्तम दृष्टिकोन व तंत्रज्ञानाची जोड मिळाली; तर काय घडू शकते याचे उदाहरण म्हणजे ‘म्होरक्या’ हा चित्रपट आहे.
MH2
       या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम न फ्रेम थेट संवाद साधत बोलत राहते. कलाकारांच्या तोंडी अतिशय कमी संवाद असूनही, या ‘फ्रेमिंग’च्या माध्यमातून चित्रपटाची कथा आणि आशय मनाला भिडतो. महत्त्वाचे म्हणजे, इतकी सफाई असणारा चित्रपट एक सरळमार्गी गोष्ट सांगत जातो. हा चित्रपट पूर्णतः ग्रामीण बाजाचा आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने बांधलेल्या या चित्रपटाला दिग्दर्शकीय दृष्टिकोनाद्वारे मिळालेली ही भेटच म्हणावी लागेल.
MH1
       अशोक उर्फ अश्या या शाळकरी मुलाची ही साधी-सरळ अशी कथा आहे. समाजाच्या तळागाळात वाढलेल्या अशोकचा दिवस, मेंढ्या हाकण्यात व्यतीत होतो. अभ्यासात त्याला अजिबात रस नाही; पण एक दिवस त्याचे मित्र त्याला शाळेची वारी घडवतात आणि तिथे सुरू असलेली मुलांची परेड, अर्थात संचलन अशोकला आकर्षून घेते. त्याला या परेडचे नेतृत्व करावेसे वाटते; मात्र या प्रकारात गावच्या पाटलाचा मुलगा त्याच्या आड येत राहतो. परिणामी, परेड शिकण्याचे अशोकचे प्रयत्न अर्धवटच राहतात. दुसरीकडे, गावात भटकणारा एक वेडसर माणूस आण्ण्या, याचे आकर्षण अशोकला वाटत असते. तो आण्ण्याचा पिच्छा पुरवतो, तेव्हा आण्ण्या हा एकेकाळी युद्धात लढलेला सैनिक आहे हे अशोकला समजते. आता आण्ण्या त्याला परेड शिकवेल, याची अशोकला खात्री वाटू लागते. पण स्क्रिझोफेनियाच्या चक्रात सापडलेला आण्ण्या हा गावातला हेटाळणीचा विषय झालेला असतो. पुढे अशोकच्या या परेड प्रकरणावर दृष्टिक्षेप टाकत ‘म्होरक्या’ हा चित्रपट बरेच काही सांगत जातो.
       लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या अमर देवकर यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे. महत्त्वाचे म्हणजे यातले त्यांचे दिग्दर्शकीय कसब वाखाणण्याजोगे आहे. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममधून हा दिग्दर्शक विनासंवाद बरेच काही बोलत राहतो. अनेकदा प्रतिकात्मक बाज पकडत त्यांनी या फ्रेम्स अधिकच बोलक्या केल्या आहेत. वेडसर झाक असलेली यातली आण्ण्याची भूमिकाही त्यांनी टेचात रंगवली आहे. ज्याच्यावर या चित्रपटाचा फोकस आहे, ती अशोक ही व्यक्तिरेखा रमण देवकर याने अचूक व्यवधान राखत उभी केली आहे. मुळात या चित्रपटातले कलावंत अभिनय करतच नाहीत असे वाटते; इतक्या त्यांच्या भूमिका वास्तवदर्शी झाल्या आहेत. ऐश्वर्या कांबळे (निकिता), रामचंद्र धुमाळ (गोमतर आबा), यशराज कऱ्हाडे (बाळ्या), अनिल कांबळे (शिक्षक) या सर्वांच्या व्यक्तिरेखा लक्षात राहतात. एवढेच नव्हे; तर सुरेखा गव्हाणे आणि इतर कलावंतांच्या छोट्या छोट्या भूमिकाही चित्रपटात भरीव रंगकाम करतात.
       या चित्रपटाचे कॅमेरावर्क, संकलन, कला दिग्दर्शन या बाजू नीट जमून आल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत या चित्रपटाने का झेप घेतली असावी, याचे उत्तर या चित्रपटाच्या सादरीकरणातच आहे आणि या संपूर्ण टीमने चाकोरीबाहेरचा असा एक अनुभव या ‘म्होरक्या’द्वारे दिला आहे.

चित्रपट परीक्षण – ‘वेगळी वाट’  – सकारात्मकतेची कास धरणारा मार्ग…! 

*** (३ स्टार)
सकारात्मकतेची कास धरणारा मार्ग…! 
 
 
 
– राज चिंचणकर 
       मराठी पडद्यावर काही चित्रपट आपली स्वतःची अशी वेगळी वाट निवडताना दिसतात. ‘वेगळी वाट’ असेच शीर्षक असलेल्या या चित्रपटानेही स्वतःचा एक अनोखा मार्ग निवडत साध्या, सोप्या, सरळ भाषेत एक प्रामाणिक कथा संवेदनशीलतेने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
       हा चित्रपट साध्या-सरळ वाटेवरून चालतो आणि त्यामुळेच तो त्याचे अस्तित्व कायम करतो.  ही गोष्ट एका वडील (राम) आणि त्यांची शाळकरी मुलगी (सोनू) यांची आहे. या दोघांचे भावबंध किती घट्ट आहेत, याचे टोकदार दर्शन हा चित्रपट घडवत जातो. चित्रपट ग्रामीण बाजाचा आहे. यात शेतकऱ्याची व्यथा तर मांडली आहेच; परंतु त्यासोबत पूरक व्यवसायाची सकारात्मक वाट निवडत त्या समस्येवर उत्तरही शोधले आहे. कर्जबाजारी शेतकरी, त्यांची अडवणूक करणारे सावकार ही काही नवीन बाब नव्हे; परंतु या पार्श्वभूमीवर ही कथा एक वेगळीच वाट निवडत चित्रपटाला ठोस शेवटाकडे घेऊन जाते.
VW1
       गावातल्या कोणत्याही घरात घडू शकेल अशी साधी कथा यात गुंफण्यात आली असली, तरी त्यावर संयत अभिनयाने चढवलेला कळस हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता किंवा आपले म्हणणे मुद्दाम ठासून सांगण्याचा हव्यास न बाळगता चित्रपट सरळ मार्गाने चालत राहतो आणि ही ‘वेगळी वाट’ सर्वांची होऊन जाते. यातला गरीब शेतकरी अशा एका वळणावर येऊन ठेपतो, की त्याला ठोस निर्णय घेणे अशक्य बनते. मात्र एका क्षणी तो एक निर्णय घेतोच; ज्याचे कारण चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेममध्ये उलगडते आणि ही ‘वेगळी वाट’ चित्रपटाचे शीर्षक सार्थ करते. फक्त यातले सोनूचे सर, सोनूच्या बाबतीत जे काही ठरवतात; ते शिक्षकी पेशा असलेल्या व्यक्तीकडून ठरवले जावे हे सहज पचनी पडत नाही. मात्र ही कथेची गरज असावी; अन्यथा चित्रपटाच्या सारांशाला धक्का पोहोचला असता, हे स्पष्ट आहे.
VW2
       चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अच्युत नारायण यांनी केले आहे आणि यातल्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचे छान प्रकटीकरण यात केले आहे. वडिलांच्या भूमिकेत असलेले शरद जाधव यांनी संपूर्ण चित्रपटभर त्यांची पकड कायम ठेवली आहे. संयत अभिनयाचे उत्तम उदाहरण त्यांनी यात ठासून घडवले आहे. अनया फाटक हिने सोनू रंगवताना, अल्लडपणा ते प्रगल्भतेचा प्रवास टेचात केला आहे. नीता दोंदे हिची यातली आई लक्षवेधी आहे. योगेश सोमण व गीतांजली कुलकर्णी या दोघांची योग्य साथ प्रमुख कलावंतांना मिळाली आहे. तंत्रज्ञानाच्या पातळीवर मात्र चित्रपट दोन पावले मागे चालतो. त्यादृष्टीने थोडे प्रयत्न करता आले असते; तर चित्रपटाचे ‘दिसणे’ अधिक ठसले असते. मात्र, एकूणच सकारात्मकतेची कास धरणारा हा चित्रपट आश्वासक वाटेवरून चालणारा आहे.

मराठी चित्रपट परीक्षण  ‘चोरीचा मामला’ -पाठशिवणीच्या खेळात रंगलेले पडद्यावरचे नाट्य…! 

 
* * *   (३ स्टार)
 
– राज चिंचणकर 
 
       दोन घटका निव्वळ करमणूक किंवा डोके बाजूला ठेवून बघण्याची गोष्ट, या व्याख्येत ‘चोरीचा मामला’ हा चित्रपट फिट्ट बसतो. या चित्रपटाला एक विशिष्ट कथानक नक्कीच आहे; परंतु त्यापलीकडे जाऊन प्रासंगिक विनोद आणि चटपटीत संवादशैलीतून निर्माण होणाऱ्या हास्यस्फोटकाने हा चित्रपट सजला आहे. कलाकारांची उत्तम साथ या चित्रपटाला लाभल्याने, या चित्रपटातला विनोद अधिकच खुलून आला आहे. जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, अमृता खानविलकर, क्षिती जोग या प्रमुख चौकडीने या चित्रपटात हास्यकल्लोळाची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या जोडीला अनिकेत विश्वासराव, कीर्ती पेंढारकर, रमेश वाणी आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत आणि त्यांनी या चौकडीला धमाल साथ दिली आहे. डोक्याला अजिबात त्रास होऊ न देता निव्वळ मनोरंजन करण्याची जबाबदारी या चित्रपटाने घेतल्याचे दिसून येते.
3
       या चित्रपटाची गोष्ट एका रात्रीत घडते. नंदन नामक चोर, अमरजीत या राजकारणी व्यक्तीच्या फार्महाऊसवर चोरी करण्यासाठी जातो. श्रद्धा या गायिकेवर भाळलेला अमरजीत, तिला घेऊन त्याचवेळी या फार्महाऊसवर येतो. त्यानंतर सुरू होतो लपाछपी आणि उंदीर-मांजराचा खेळ; ज्यातून प्रसंगनिष्ठ अशा विनोदाची पेरणी या चित्रपटात होत जाते.
       केवळ विनोदाचा हास्यकल्लोळ घडवायचा, या हेतूनेच प्रियदर्शन जाधव याने या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर कामगिरी बजावली आहे. विनोदी ढंगाच्या प्रसंगांची पेरणी या चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येते. मात्र हा पाठशिवणीचा खेळ खेळत असताना यातला चोर, अमरजीत व श्रद्धाचे लक्ष वेधून घेण्याच्या (?) उद्देशाने जिन्यावरून मुद्दाम वर-खाली करत असतो; हे खटकते. एवढ्या मोठ्या फार्महाऊसवर त्याला लपायला सहज जागा उपलब्ध असतानाही तो इतरत्र कुठेही लपत नाही, हे सहज पचनी पडत नाही. मात्र असे असले, तरी एकंदर चित्रपटाला देण्यात आलेली ट्रीटमेंट पाहता अशा गोष्टींवर आपोआप पांघरूण घातले गेले आहे.
6
       या चित्रपटात नाटक अधिक दिसते; असे म्हणण्याचे कारण इतकेच की हे एका रात्रीत आणि एका स्थळावर घडणारे खरोखरच हे एक नाट्य आहे. काही ठिकाणी यातला विनोद अधिक ‘रंगात’ आल्यासारखा वाटतो; परंतु यातल्या कलावंतांनी या चित्रपटावर ठेवलेल्या पकडीत या ‘अधिकच्या’ काही गोष्टी सहज विरघळून गेल्या आहेत.
       जितेंद्र जोशी याने यात चोराची भूमिका रंगवताना कायिक आणि मुद्राभिनयाद्वारे प्रचंड भाव खाल्ला आहे. हेमंत ढोमे याने चेहऱ्यावर स्थितप्रज्ञतेचा भाव ठेवत वेगळीच मजा आणली आहे. अमृता खानविलकर हिने यातली श्रद्धा टेचात आणि लाडिक रंगवली आहे. क्षिती जोग आणि कीर्ती पेंढारकर यांनीही त्यांच्या भूमिका लक्षवेधी केल्या आहेत. अनिकेत विश्वासराव याने इन्स्पेक्टर साकारताना, आक्रस्ताळेपणातून आगाऊपणा मांडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे.
       या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यात असलेले आकर्षक गाणे आणि त्यातला रेट्रो लूक!  जुन्या गीताचा बाज असलेले हे मजेशीर गाणे लक्षात राहते. चिनार-महेश व प्रफुल्ल स्वप्नील यांचे संगीत उत्तम वाजले आहे. एकूणच, हा ‘चोरीचा मामला’ रंजकतेची पातळी सांभाळत धमाल घडवून आणतो, हे वेगळे सांगण्याची आवशक्यता नाही.

वास्तव घटनांवर आधारित ‘अन्य’… 

– राज चिंचणकर 
       एका डॉक्युमेंट्रीच्या दृष्टिकोनातून समाजात घडणा-या वास्तववादी घटनांचा वेध घेत एक सत्य मांडण्याचा प्रयत्न ‘अन्य’ या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट निर्माण होत आहे. मार्च महिन्यात हा चित्रपट पडद्यावर येत आहे.
Annya
       सिम्मी जोसेफ हे दाक्षिणात्य दिग्दर्शक या चित्रपटाद्वारे मराठीसह हिंदीमध्ये पदार्पण करत आहेत. दिग्दर्शनासोबतच त्यांनी या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली आहे. अतुल कुलकर्णा, प्रथमेश परब, भूषण प्रधान, तेजश्री प्रधान, कृतिका देव, सुनील तावडे या मराठमोळ्या कलाकारांसह हिंदी पडद्यावरील अभिनेत्री रायमा सेन या चित्रपटात भूमिका करत आहे. तसेच गोविंद नामदेव आणि यशपाल शर्मा हे विशेष भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

आलियाचा ‘गंगुबाई’ लूक!!!

सिनेक्षेत्रात वेगवेगळ्या भूमिकांना योग्य न्याय देणारी आलिया भट्ट आता अजून एका भूमिकेत दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांची निर्मिती असलेला ‘गंगुबाई काठियावाडी’ या सिनेमाचे पहिलं पोस्टर नुकतेच लाँच झाले. गंगुबाई काठीयावाडी या सिनेमात आलिया तीच्या अभिनयाची जादू चाहत्यांना लवकरच देणार आहे.IMG-20200115-WA0002

‘एकदा काय झालं’ चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त संपन्न

संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांची गाणी कायम सदाबहार असतात. पण गाण्याच्या पलिकडे जाऊन सलील यांनी नुकतंच दिग्दर्शनात पदार्पण केलं ते वेडिंगचा शिनेमा’ या मराठी सिनेमातून. धमाकेदार मनोरंजनाचं पॅकेज असलेला सिनेमा दिल्यानंतर आता डॉ. सलील कुलकर्णी पुन्हा सज्ज झाले आहेत एक नवीन अनुभव देण्यासाठी. ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी यांच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाचं पहिलं-वहिलं पोस्टर सोशल मीडियावरुन लॉन्च केलं गेलं.

एकदा काय झालं या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त २६ डिसेंबर रोजी पुणे येथे सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपटात महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित पार पडला. यावेळी या चित्रपटातील कलाकार सुमित राघवनउर्मिला कोठारेडॉ. मोहन आगाशेसुहास जोशीपुष्कर श्रोत्रीराजेश भोसलेप्रतीक कोल्हेमुक्ता पुणतांबेकरआकांक्षा आठल्येरितेश ओहोळअर्जुन पुर्णपात्रेअद्वैत वाकचौPhoto-2डेअद्वैत धुळेकर आणि मेरवान काळे उपस्थित होते. २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप’ रुपेरी पडद्यावर…! 

– राज चिंचणकर
       मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांची महती सांगणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता ‘शिवप्रताप’ सांगण्यास सज्ज होत आहेत. यासाठी त्यांनी मोठा पडदा जवळ केला असून, ‘शिवप्रताप’ या चित्रपट मालिकेच्या माध्यमातून ते तीन चित्रपटांची निर्मिती करत आहेत. ‘वाघनखं’, ‘वचपा’ आणि ‘गरुडझेप’ अशी या चित्रपटांची शीर्षके आहेत. त्यांच्या ‘जगदंब क्रिएशन्स’तर्फे हे तिन्ही चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
AK
       अलीकडेच त्यांनी या चित्रपटांची जाहीर घोषणा करत त्यांची ही नवीन भूमिका समोर आणली. पण इतके करूनच डॉ. अमोल कोल्हे थांबलेले नाहीत; तर छत्रपती शिवरायांची महती महाराष्ट्राच्या बाहेरील अमराठी भाषिकांपर्यंत पोहोचावी म्हणून ते हे चित्रपट हिंदी भाषेतही निर्माण करणार आहेत.
       या तीन चित्रपटांपैकी ‘वाघनखं’ हा पहिला चित्रपट ६ नोव्हेंबर २०२० रोजी पडद्यावर येणार आहे. कार्तिक केंढे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून लेखन प्रताप गंगावणे यांचे आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह डॉ. घनश्याम राव व विलास सावंत हे या चित्रपटांचे निर्माते आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज ते समर्थ रामदास स्वामी…! 

– राज चिंचणकर 

 
       अभिनेता शंतनू मोघे याने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेतच; परंतु आता तो थेट समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत दर्शन देण्यास सज्ज झाला आहे.  II श्री राम समर्थ II या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून तो हे शिवधनुष्य पेलण्यास सिद्ध होत आहे. १ नोव्हेंबरपासून त्याचा हा आगळा अवतार पडद्यावर पाहता येणार आहे. या भूमिकेच्या निमिताने शंतनू मोघे याच्याशी साधलेला संवाद… 
 
Shantanu Mo.
 
समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारताना तुझ्या काय भावना आहेत? 
 
ही भूमिका करताना आनंद तर निश्चितच आहे; परंतु त्याचबरोबर अभिमान आणि स्वाभिमानही आहे. समर्थ रामदास स्वामींसारखी एक व्यक्तिरेखा मला साकारायला मिळतेय, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. 
 
छत्रपती शिवाजी महाराज ते समर्थ रामदास स्वामी हा प्रवास कसा होता? 
 
खूपच छान होता हा सगळा प्रवास!  या दोन्ही व्यक्तिमत्त्वांबद्दल म्हणायचे, तर त्यांच्यात एक समान धागा होता आणि तो म्हणजे देश व धर्म!  एक लढवय्या होता; तर एक प्रचारक व प्रसारक होता. त्यांचे विचार सारखेच होते; मात्र त्यांनी अवलंबलेले मार्ग वेगळे होते. धर्मरक्षणाचा विडाच त्यांनी उचलला होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांची वैचारिक बैठक पक्की होती. समर्थ रामदासांचे साहित्य असू दे, त्यांच्या आरत्या असू दे; या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार लोकांसमोर मांडले. असे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर घेऊन येताना खूप आनंद वाटत आहे.  
 
छत्रपतींची राजेशाही वस्त्रे ते स्वामींची भगवी कफनी, असा फरक असताना ही व्यक्तिमत्त्व तुझ्या अंगात किती भिनली? 
 
नक्कीच भिनली. महाराज स्वराज्याचे छत्रपती होते, पण रयतेचा सच्चा मावळा म्हणूनच त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. आऊसाहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी छत्रपतीपद स्वीकारले. तो एक प्रवासच वेगळा होता. रामदास स्वामी यांनी तर कुणाच्याही अध्यातमध्यात न जाता, मला माझा प्रसार, प्रचार करायचा आहे; याकडे लक्ष पुरवले. यासाठीच त्यांनी बहुधा हे रूप धारण केले असावे. 
Shantanu M.
ही भूमिका रंगवताना स्वामींचे ‘मनाचे श्लोक’ किती आचरणात आणलेस? 
 
स्वामींचे विचार नक्की काय आहेत, हे समजून घेण्यासाठी ‘मनाचे श्लोक’ वाचत गेलो, त्यांचे मनन करत गेलो. जी व्यक्तिरेखा आपण साकारणार आहोत; तिचे आचारविचार काय आहेत, हे कळले की ती व्यक्तिरेखा नीट उभी करता येते.  
 
रामदास स्वामींच्या भूमिकेनंतर पुढे काय ठरवले आहेस? 
 
खरं तर आतापर्यंत मी कधीच कुठली भूमिका ठरवून केलेली नाही. पण काही चित्रपटांची प्रोजेक्ट्स आता सुरु झाली आहेत आणि त्यात विविध प्रकारच्या भूमिका मी करत आहे. 

‘कॉपी’ करणार शिक्षण पद्धतीवर भाष्य…! 

– राज चिंचणकर
       दर आठवड्याला विविध मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतात; मात्र या मांदियाळीत एक आशयघन सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. एक वास्तववादी कथानक मांडणा-या या चित्रपटाचे शीर्षक ‘कॉपी’ असे आहे. देश-विदेशांमधील विविध नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये मराठी सिनेमाचा झेंडा या चित्रपटाने याआधीच मानाने फडकवला आहे आणि येत्या ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Copy 02
       आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे; तर मुलांनाही अनेक प्रकारच्या परीक्षांमधून स्वतःला सिद्ध करावे लागत आहे. या सगळ्या पैलूंवर ‘कॉपी’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटाने एशियन फिल्म फेस्टिव्हल, लॉस एंजेलिस फिल्म फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव, ५५ वा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा; तसेच इतर नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्त्व सिद्ध केले आहे. ‘श्री महालक्ष्मी क्रिएशन्स’च्या बॅनरखाली निर्माते गणेश रामचंद्र पाटील यांनी ‘कॉपी’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची संकल्पनाही गणेश पाटील यांचीच आहे. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे यांनी ‘कॉपी’चे दिग्दर्शन व पटकथालेखन केले आहे.
       या चित्रपटात मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे आणि जगन्नाथ निवंगुणे यांच्यासह कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, नीता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. संवादलेखन दयासागर वानखेडे यांनी केले असून, राहुल साळवे यांनी गीतलेखन केले आहे. नव्या दमाचे संगीतकार रोहन-रोहन यांच्यासह वसंत कडू यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिले आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑