१ नोव्हेंबरला भाऊबीजेची ओवाळणी…! 

IMG_9690.JPG– राज चिंचणकर 
       दीपावलीच्या सणाने अंतिम चरण गाठला असला, तरी मराठी पडद्यावरची दिवाळी पुढेही सुरु राहणार आहे; कारण १ नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर भाऊबीजेची ओवाळणी केली जाणार आहे. हे कसे काय शक्य आहे, हे अनुभवण्यासाठी मात्र या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. लहानग्या भाऊ-बहिणीचे विश्व या चित्रपटात उलगडले गेले असून, त्यांच्या नात्यातल्या गोडव्याची पखरण या चित्रपटात दिसणार आहे.
       अवघ्या पाच वर्षांची गोंडस मुलगी आणि तिचा आठ वर्षांचा भाऊ, यांची कहाणी या चित्रपटात दिसणार आहे. वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम ही लहानगी जोडगोळी या चित्रपटात चमकत आहे.  त्यांच्यासह सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या  बच्चेमंडळीच्या सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. आता या चित्रपटाला ‘खारी बिस्कीट’ असे शीर्षक का दिले असावे, हे मात्र गुलदस्त्यात आहे. ‘झी स्टुडिओज’ आणि ‘ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन’ यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

अभिनयातले त्रिकूट एकत्र येतेय…! 

 

– राज चिंचणकर
       अनेकविध भूमिकांमध्ये रंगणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह, अभिनेता भरत जाधव आणि सुबोध भावे आता पडद्यावर एकत्र चमकणार आहेत. ‘आप्पा आणि बाप्पा’ असे या चित्रपटाचे शीर्षक असून, ११ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने अभिनयातले हे त्रिकूट प्रथमच एकत्र दिसणार आहे. या त्रिकूटातल्या जोड्या मिळून त्यांनी यापूर्वी एकत्र काम केले असले, तरी या तिघांची मोट आता एकाच चित्रपटात बांधली गेल्याचे या चित्रपटात प्रथमच दिसून येईल. या तिघांच्या जोडीला अभिनेत्री संपदा कुलकर्णी सुद्धा यात भूमिका साकारत आहे.
AB
       चित्रपटाच्या शीर्षकानुसार यात ‘बाप्पा’, म्हणजेच सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे दर्शन होणार आहे आणि यातल्या कलाकारांवर गणरायाची कृपादृष्टी झालेली या निमित्ताने पाहायला मिळणार आहे. आता एकंदर या हटके बाजामुळे या चित्रपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे. यात ‘बाप्पा’ कोण हे समजले असले, तरी यातला ‘आप्पा’ कोण आणि त्याच्यावर नक्की कोणता प्रसंग येऊन ठेपला आहे, याचे उत्तर मिळण्यासाठी अर्थातच ११ ऑक्टोबरची वाट पाहावी लागणार आहे.

भाऊ कदम म्हणतात,  “गावच्या मातीतली कला जगायला आवडते…” 

 
– राज चिंचणकर 
 
       विनोदाच्या विविध अंगांना स्पर्श करत स्वतःची खास ओळख कायम केलेले अभिनेते भालचंद्र (भाऊ) कदम यांचा ‘व्हीआयपी गाढव’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ‘कल्पराज क्रिएशन्स’ प्रस्तुत, संजय पाटील दिग्दर्शित या चित्रपटात भाऊ कदम हटके भूमिकेत दिसणार आहेत. १३ सप्टेंबर रोजी पदड्यावर येत असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने भाऊ कदम यांच्याशी साधलेला विशेष संवाद…
V2
दादा कोंडके पॅटर्नचा चित्रपट तुम्ही करत आहात आणि यातल्या तुमच्या व्यक्तिरेखेचे नावही ‘गंगाराम’ असे आहे; हा योगायोग आहे का?
– गंगाराम म्हटले की दादा कोंडके आठवतातच. पण यातली माझी भूमिका दादा कोंडके यांची नाही. हा चित्रपट बघून, विशेषतः यातले माझे गाणे बघितल्यावर तुम्हाला दादा कोंडके यांची आठवण मात्र नक्की होईल. गावरान, ठसकेबाज असे हे कथानक आहे. यात व्हीआयपी कल्चर आहे. आता व्हीआयपी कल्चर म्हणजे काय, असा प्रश्न मलाही पडला होता. यात काम करून मी तो प्रश्न सोडवला. तुम्हाला मात्र चित्रपट पाहून तो सोडवायचा आहे.

विनोदी भूमिकाच करायची असे ठरवले होते का?
– हो. कारण माझी ओळख विनोदी कलाकार म्ह्णूनच आहे. चित्रपटात भाऊ आले की धमाल असणार, अशी लोकांची खात्री असतेच. त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. विनोदाने ठासून भरलेला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा चित्रपट आहे. सर्वजण हा चित्रपट नक्कीच एन्जॉय करतील.
V1
तुम्ही आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. पण यात ग्रामीण बाजाची भूमिका रंगवताना विशेष काही केले का?
– गावरान पद्धतीच्या कथेवर माझे मनापासून प्रेम आहे. अशा कथा मला खूप आवडतात. मला गावच्या मातीतली कला जगायला आवडते. त्यामुळे अशा कथेची मी वाट पाहातच होतो. गावरान बाज हा माझ्या आवडीचा विषय आहे. यातली भाषाही छान आहे आणि ती अगदी घरातली वाटते.

या चित्रपटाचे शूटिंग करताना तुम्ही अनेक रात्री झोपला नाहीत. काय किस्सा आहे हा?
– माझ्या हातात उपलब्ध असणारे दिवस सांभाळत आणि या दिवसांची कसरत करत मला हे शूटिंग करायचे होते. टीव्ही आणि माझे सुरु असलेले नाटक, यातून मार्ग काढत मी हे शूटिंग केले आहे. रात्री उशिरापर्यंत मी यासाठी काम केले. कमी दिवसांत जास्त काम करायचे होते. त्यामुळे रात्रीसुद्धा मी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो.

नाटक जास्त आवडते की चित्रपट?
– खरं सांगायचं तर, नाटक प्रथम आवडते; मग चित्रपट!  नाटकामुळे रियाझ होतो. नाटकामुळे आपण ‘तयार’ होतो. त्यामुळे नाटक खरंच ग्रेट आहे.

मराठी चित्रपट परीक्षण  – ‘लालबत्ती’  – खाकी वर्दीतली संवेदनशील माणूसकी…! 

 
* * १/२  (अडीच स्टार)  
 
 
– राज चिंचणकर 
 
       ‘लालबत्ती’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून काही अंदाज नक्कीच बांधता येतात. पण बांधलेल्या अंदाजांची दिशा चुकते, तेव्हा चित्रपटाचे वेगळेपण ठसते. आडाखे अगदी अचूक ठरले, तर त्यात उत्सुकता ती काय राहणार? वास्तविक, ‘लालबत्ती’ या शब्दावरून काही गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र हा चित्रपट त्याही पलीकडे जाऊन या ‘लालबत्ती’चा अनोखा संदर्भ स्पष्ट करतो.
L1
       पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित कथानक हा या चित्रपटाचा गाभा आहे. क्यू.आर.टी. अर्थात शीघ्र कृती दलाच्या कमांडोंवर ही कथा बेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी एस.बी.पवार यांच्या नेतृत्वाखाली ही टीम कार्यरत आहे. या दलात अशी एक घटना घडते, की त्यावरून एस.बी.पवार यांना पोलिसांमधल्या संवेदनांची जाणीव होते. त्यातच या दलात घुम्यासारख्या वावरणाऱ्या गणेश या कमांडोच्या पार्श्वभूमीची भर पडते आणि एस.बी.पवार काही ठोस निर्णय घेतात. त्याबरहुकूम होणारी कार्यवाही म्हणजे ही ‘लालबत्ती’ आहे.
       करड्या शिस्तीतल्या या खाकी वर्दीच्या आत एक माणूस सुद्धा असतो, याची जाणीव करून देणारी ही कथा व पटकथा अभय दखणे यांनी बांधली आहे. मराठी चित्रपटविश्वात चाकोरीबाहेरची कथा मांडण्याचे काम त्यांनी या निमित्ताने केले आहे आणि त्यादृष्टीने हा चित्रपट वेगळा ठरतो. मात्र ही पटकथा काही ठिकाणी विस्कळीत झाल्यासारखी वाटते. मुळात यातले कमांडो ज्या ‘मिशन’साठी एकत्र येऊन लढायचे ठरवतात; ते उद्दिष्ट तकलादू आहे. हे लक्ष्य अधिक ठोस असते, तर या कमांडोंचे श्रम खऱ्या अर्थाने सार्थकी लागले असते. पोलिसांतल्या संवेदनशीलतेचा तपास अजून खोलवर जाऊन करता येणेही शक्य होते. काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात. अरविंद जगताप यांच्या संवादांत मात्र ‘जान’ आहे आणि त्यामुळे चित्रपटाची ही भट्टी बऱ्यापैकी सुसह्य झाली आहे.
L2
       दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी उपलब्ध सामग्रीवर खाकी वर्दीतले हे माणूसपण उभे केले आहे. यातल्या व्यक्तिरेखांना ‘कडक’ साच्यात मांडण्याचे त्यांचे कसब यातून दिसून येते. कृष्णा सोरेन यांचा कॅमेरा यात उत्तम फिरला असून, त्यांचे छायांकन ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. नीलेश गावंड यांचे संकलन आणि अविनाश-विश्वजीत यांचे संगीत ठीक आहे.
       यातल्या कलावंतांनी हा चित्रपट सक्षम खांद्यांवर तोलून धरला आहे. मंगेश देसाई याने त्याच्या ओंजळीत येणारी प्रत्येक भूमिका ही कायम लक्षात राहण्याजोगीच असावी, असा पणच केला असावा. कारण तसे वाटण्याइतका यातला एस.बी.पवार हा पोलीस अधिकारी त्याने कडक रंगवला आहे. या हरहुन्नरी नटाने पोलीस डिपार्टमेंटच्या कडक शिस्तीपासून, संवेदनशीलच्या सीमेपर्यंत त्याच्या अभिनयाची रेंज दाखवून दिली आहे. रमेश वाणी यांनी इन्स्पेक्टर चव्हाण या व्यक्तिरेखेत दमदार रंगकाम करत ही भूमिका लक्षवेधी केली आहे. कमांडो गणेशची भूमिका तेजस या अभिनेत्याने आश्वासकरित्या उभी केली आहे. भार्गवी चिरमुले, मनोज जोशी, विजय निकम, छाया कदम, मीरा जोशी, अनिल गवस आदी कलावंतांची साथ या चित्रपटाला लाभली आहे. चित्रपटाचा शेवटही बरेचकाही सांगून जातो आणि हा ‘दि एन्ड’ सुन्न करणारा आहे.

चित्रपट परीक्षण – ‘स्माईल प्लीज’ – थबकलेल्या प्रवासाचा आश्वासक वेध…! 

 
* * *  (तीन स्टार) 
 
– राज चिंचणकर 
 
       लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयासह चित्रपटाचे एकूणच क्राफ्टिंग उत्तम जुळून आले की संबंधितांना ‘स्माईल प्लीज’ असे वेगळे उद्देशून सांगावे लागत नाही. आपोआपच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुलते आणि कामाचे चीज झाल्याचे समाधान त्यांना मिळते. आशयघनता हे मराठी चित्रपटांचे वैशिष्ट्य आहेच आणि ‘स्माईल प्लीज’ हा चित्रपट या आशयाची घनता अजूनच वाढवतो. एका महत्त्वाच्या विषयाला घातलेला हात, त्यायोगे समाजात जाणारा सकारात्मक संदेश आणि हे सर्व मांडताना कुठेही काही ‘ग्रेट’ वगैरे करत असल्याचा न आणलेला आव; यामुळे हा चित्रपट दखल घेण्याजोगा ठरतो.
SP1
       नंदिनी, शिशिर व त्यांची मुलगी नुपूर या तिघांची ही गोष्ट असली, तरी त्यात इतर अनेक घटक महत्त्व राखून आहेत. नंदिनी ही उत्तम फोटोग्राफर आहे. काही कारणामुळे नंदिनी व शिशिर विभक्त झाले आहेत. नंदिनी तिच्या वडिलांकडे राहते; तर नुपूर शिशिरकडे राहते. अचानक नंदिनीच्या आयुष्यात असे काही वळण येते की त्याची पडछाया तिचे संपूर्ण व्यक्तिमत्त्व व्यापून टाकते. तिच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या या स्थितीला सामोरे जाण्याची वेळ तिच्या कुटुंबियांवर येते. एकीकडे नंदिनीचा एकूणच प्रवास थबकल्यासारखा वाटत असतानाच, तिच्या भावविश्वात एक पाहुणा अनाहूतपणे टपकतो आणि हे ‘स्माईल प्लीज’ खऱ्या अर्थाने चेहरा खुलवते.
       दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी चाकोरीबाहेरचा विषय हाताळत एक चांगला चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे आणि तो सफल झाला आहे. विक्रम फडणीस व इरावती कर्णिक या दोघांनी मिळून बांधलेली पटकथा उत्तम आहे आणि इरावतीचे संवाद त्यात चपखल बसले आहेत. मुळात, दिग्दर्शक म्हणून विक्रम फडणीस यांनी या कथानकातल्या भावभावनांचे तरंग ज्या तऱ्हेने विविध फ्रेम्समध्ये पकडले आहेत; त्याला दाद द्यावी लागेल. उगाच कसलाही आवेश वगैरे न आणता, थेट विषयाच्या गाभ्याला भिडण्याचे त्यांचे कसब यातून दिसून येते. अर्थात, यात काही डावे-उजवे नक्कीच आहे; परंतु चित्रपटाला दिलेली एकंदर ‘ट्रीटमेंट’ पाहता त्यात ते सहज विरघळून गेले आहे.
SP3
       नंदिनी ही या चित्रपटातली मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे आणि मुक्ता बर्वे हिने ही नंदिनी ठोस उभी केली आहे. या व्यक्तिरेखेच्या थेट अंतरंगात डोकावत आणि या व्यक्तिरेखेच्या आत्म्याशी एकरूप होत तिने साकारलेली ही नंदिनी लक्षात राहण्याजोगी आहे. महत्त्वाचे म्हणजे, अलीकडे, पडद्यावर लग्नसोहळ्यांत अडकलेल्या मुक्ताने या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने मुक्त श्वास घेतला आहे. प्रसाद ओक याचा शिशिरही छाप पाडून जातो. त्याच्या हटके स्टाईलने त्याने हा शिशिर रंगवला आहे आणि या कथानकात तो फिट्ट बसला आहे. चित्रपटांत भावखाऊ भूमिका सहज ज्याच्या वाट्याला येतात, त्या ललीत प्रभाकर याच्यासाठी हा चित्रपटही अपवाद ठरलेला नाही. ज्याच्याविषयी ‘सॉफ्ट कॉर्नर’ निर्माण होईल असा यातला विराज त्याने सहजरित्या रंगवला आहे. नुपूरच्या भूमिकेत वेदश्री महाजन हिने आश्वासक कामगिरी बजावली आहे.
       एखाद्या कलाकाराची अचूक निवड म्हणजे काय, हे या चित्रपटातल्या अप्पांची भूमिका रंगवणाऱ्या सतीश आळेकर यांच्या निमित्ताने ठोस अधोरेखित होते. तसे पाहायला गेल्यास, ही व्यक्तिरेखा कथानकाच्या मुख्य प्रवाहापासून थोडी बाजूला असली, तरी सतीश आळेकर यांनी या अप्पांचे विश्व ताकदीने गडद केले आहे. तृप्ती खामकर यासुद्धा त्यांचे अस्तित्त्व ठाशीवपणे दाखवून देतात. अदिती गोवित्रीकर यांना यात फारसा वाव मिळालेला नाही. मिलिंद जोग यांचे कॅमेरावर्क, मंदार चोळकर याची गीतरचना व रोहन-रोहन यांचे संगीत; या टीमवर्कने या चित्रपटाचा आलेख उंचावला आहे. मेंदूच्या अकार्यक्षमतेमुळे निर्माण होणाऱ्या आजाराने त्रस्त असलेल्यांना समर्पित केलेले यातले गाणे आणि त्यादृष्टीने केलेले समाज प्रबोधनही महत्त्वाचे आहे. चाकोरीबाहेच्या विषयाला घातलेला हात आणि त्यायोगे एकूणच नात्यांची केली गेलेली उकल, हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

‘मेक-अप’ची किमया लई भारी…! 

 
– राज चिंचणकर 
 
       चित्रपट, नाटक, मालिका क्षेत्रांत कलावंतांसाठी ‘मेक-अप’ हा महत्त्वाचा भाग असतो. या ‘मेक-अप’मुळे चेहऱ्यात आमूलाग्र बदल सहज घडवता येऊ शकतो. अनेक कलाकारांच्या बाबतीत या ‘मेक-अप’ची ही किमया रसिकांना आतापर्यंत विविध भूमिकांद्वारे पाहायला मिळाली आहे. अशीच एक न्यारी किमया ‘वन्स मोअर’ या मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, हा प्रयोग ज्यांच्यावर केला आहे, त्या कलावंताला रसिक अजिबात ओळखू शकणार नाहीत; इतका हा ‘मेक-अप’ आणि एकूणच ‘गेट-अप’ उत्कृष्ट वठला आहे. आता हा कलावंत कोण आहे, हे ओळखण्याची जबाबदारी रसिकांची आहे.
IMG-20190627-WA0014
       ‘वन्स मोअर’ या चित्रपटात एक विचित्र व्यक्तिरेखा आहे. त्यानुसार एका स्त्रीला, पुरुष बनवायचा होता. ती व्यक्तिरेखाच पुरुषाची होती. हे प्रचंड मोठे आव्हान होते आणि ते पेलण्यासाठी तितक्याच ताकदीची अभिनेत्री हवी होती. विचाराअंती ‘वन्स मोअर’च्या टीमकडून एका अभिनेत्रीचे नाव पक्के केले गेले. कोण असेल ही अभिनेत्री…?
       १ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या ‘वन्स मोअर’ या मराठी चित्रपटासाठी या अभिनेत्रीने आजोबांचे पुरुषी रूप धारण केले आहे. या भूमिकेसाठी ‘त्या’ अभिनेत्रीने किती श्रम घेतले असतील, याचा अंदाज सोबतच्या छायाचित्रातून सहज येतो. या चित्रपटाच्या कथानकाची गरज म्हणून एकाचवेळी स्त्री व पुरुष अशी दुहेरी भूमिका साकारणाऱ्या सशक्त कलावंताची आवश्यकता होती. या भूमिकेला ही अभिनेत्री नक्की न्याय देऊ शकेल, अशी खात्री बाळगत दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी ‘त्या’ अभिनेत्रीला या भूमिकेची गरज समजावून सांगितली. भूमिकेचे आव्हान व त्यातले वेगळेपण लक्षात घेत ‘त्या’ अभिनेत्रीने या भूमिकेला होकार दिला.
       कमल हसन यांना बऱ्याच सिनेमांमध्ये ‘गेट-अप’ करणारे बॉलिवूडचे प्रसिद्ध मेक-अप आर्टिस्ट रमेश मोहंती, कमलेश आणि श्रीनिवास मेनगु यांनी हा मेक-अप केला आहे. रमेश आणि कमलेश यांनी प्रॉस्थेटिक मेक-अपच्या सहाय्याने या अभिनेत्रीला आजोबांचे रूप बहाल केले आहे. तिला आजोबांचे हे रूप मिळवून देण्यात कॉस्च्युम्सचाही मोठा वाटा आहे. अनेक चित्रपट व नाटकांसाठी वेशभूषा साकारणाऱ्या चैत्राली डोंगरे यांनी हा अफलातून कॉस्च्युम या व्यक्तिरेखेसाठी तयार केला आहे. आता, या सर्व आर्टिस्ट्सना सहकार्य करणारी ‘ती’ अभिनेत्री सुद्धा तेवढ्याच ताकदीची व हिंमतीची असली पाहिजे, हे ओघाने आलेच.
       सोबतचा फोटो नीट निरखून पाहिला, तरीही तिची ओळख काही पटत नाही ना? साहजिकच, याचा पोलखोल करणे आवश्यक ठरते. तर…….. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून, त्या आहेत; आतापर्यंत विविध भूमिकांची सशक्त छाप रसिकांवर पाडणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी!  धक्का बसला ना…? तो तसाच कायम राहू द्या. कारण १ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर, पडद्यावर त्यांचा हा एकूणच ‘गेट-अप’ प्रत्यक्ष बघून अजून धक्के बसणार हे निश्चित आहे.

व्हॉट्सअप लव’मधून संगीताची बरसात…! 

'Whatsapp Love' Music
 
– राज चिंचणकर

 

       ‘कॉन्सर्ट किंग’ म्हणून हेमंतकुमार महाले यांची संगीतक्षेत्रात ओळख आहे; परंतु आता त्यांनी एका वेगळ्याच दिशेचा प्रवास सुरु केला आहे. सध्या त्यांनी एका मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. पण एवढे करूनच ते थांबलेले नाहीत; तर या चित्रपटाची कथा व दिग्दर्शनही त्यांचेच आहे. ‘व्हॉट्सअप लव’ या चित्रपटासाठी त्यांनी ही जबाबदारी उचलली आहे. येत्या १२ जुलै रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून, ऐन पावसाळ्यात या चित्रपटाच्या माध्यमातून संगीताची बरसात होणार आहे.
       या चित्रपटाची तशी अनेक वैशिष्टये आहेत. यात एकूण ५ गाणी आहेत. अर्थात, ‘कॉन्सर्ट किंग’ असलेल्या व्यक्तीच्या चित्रपटात गाण्यांचा तडका नसता तर ते नवल ठरले असते. तर, यात असलेल्या ५ गाण्यांना ज्यांनी स्वर दिला आहे; त्यात चक्क ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचा समावेश आहे. आशा भोसले यांनी या चित्रपटासाठी गाणे गात या चित्रपटाला चार चाँद लावले आहेत. त्यांच्यासह जावेद अली, श्रेया घोषाल, पायल देव आणि सुफी गायक शबाब साबरी यांनीही यातली गाणी गायली आहेत. नितीन शंकर यांनी ही सर्व गाणी संगीतबद्ध केली आहेत. अलीकडेच, या चित्रपटाच्या संगीताचे अनावरण करण्यात आले.
       राकेश बापट व अनुजा साठे ही जोडी चित्रपटात प्रमुख भूमिका साकारत आहे. त्यांच्यासह इराणी अभिनेत्री सारेह फर हिची भूमिका हे या चित्रपटाचे आगळे वैशिष्ट्य आहे. अनुराधा राजाध्यक्ष, पल्लवी शेट्टी, अनुप चौधरी आदी कलावंतही या चित्रपटात आहेत. अजिता काळे यांनी या चित्रपटासाठी पटकथा व संवादलेखन केले आहे. ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर सुवर्णा सुरेश यांच्या कॅमेऱ्याची कमाल या चित्रपटात पाहता येणार आहे. मांडू गडावर चित्रीत झालेले एक गाणे हा या चित्रपटातला आकर्षणाचा भाग आहे.
       सध्याच्या काळात ‘व्हॉट्सअप’ हा सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे. त्यामुळे आता ‘व्हॉट्सअप लव’ असेच शीर्षक असलेल्या या चित्रपटातून नक्की काय पाहायला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. या सगळ्याचा उलगडा १२ जुलै रोजी आता थेट पडद्यावरच होणार आहे.

‘जजमेंट’  – कौटुंबिकतेकडून सामाजिकतेचा प्रवास…!  * *  १/२  (अडीच स्टार) 

 
– राज चिंचणकर 
       मंगेश देसाई या नटाच्या ओंजळीत आतापर्यंत ज्या भूमिका आल्या; त्या भूमिका तो समरसून जगला आहे आणि ‘जजमेंट’ चित्रपटामधली त्याची भूमिकाही या मांदियाळीत चपखल बसणारी आहे. इथे त्याने ज्या पद्धतीने ही व्यक्तिरेखा उभी केली आहे; त्याने या चित्रपटाचा एकूणच आलेख उंचावला आहे. विशेष म्हणजे, त्याची ही व्यक्तिरेखा खलनायकी आणि विक्षिप्त स्वभावाची असली, तरी ती मनात ठसते व चित्रपटभर तिचे अस्तित्त्व दाखवत राहते. वास्तविक, चित्रपटाचा विषय सामाजिकतेला स्पर्श करत गांभीर्याची बैठक घेणारा आहे आणि त्यायोगे, चित्रपटाने समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्नही केला आहे.
JUDGEMENT .
       हा चित्रपट कौटुंबिकतेकडून सामाजिकतेकडे वाटचाल करतो आणि पटकथाकार, संवादलेखक व दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी हा विषय मनात रुतेल अशा पद्धतीने मांडला आहे. नीला सत्यनारायणन यांच्या ‘ऋण’ या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. एका व्यक्तीच्या विक्षिप्तपणामुळे त्याच्या कुटुंबाची होणारी वाताहात, त्याच्या मुलींना त्याच्याबद्दल वाटणारी घृणा, न्याय मिळवण्यासाठी त्यांनी दिलेला लढा हे सर्व या कथानकात येते. चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट योग्य आहे; मात्र काही गोष्टी सहज पचनी पडत नाहीत. ‘मुलगी नको, मुलगा हवा’ या सूत्राला धरून एखादी व्यक्ती विक्षिप्तपणाचे इतके मोठे टोक गाठू शकेल, हे पटत नाही. यातल्या कोर्टरूमच्या प्रसंगातले गांभीर्यही कमी झाले आहे. नायिका आणि खलनायक यांच्यातल्या अपेक्षित जुगलबंदीलाही हा चित्रपट मुकला आहे. कथानकाच्या माध्यमातून जे काही सांगायचे आहे, ते पोचवण्यासाठी योग्य मार्ग निवडला गेला असला तरी काहीतरी राहून गेल्याचे जाणवत राहते.
       या चित्रपटातली अग्निवेशची खलनायकी व्यक्तिरेखा मंगेश देसाई याने विशिष्ट ‘बेअरिंग’ घेत भन्नाट उभी केली आहे. ऋतुजाच्या भूमिकेत तेजश्री प्रधानला मुक्त वाव मिळाला आहे. मात्र ही व्यक्तिरेखा लेखनातच अजून सशक्त व्हायला हवी होती, असे वाटते. पण तेजश्रीने तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत योग्य रंग भरण्याचे काम नीट केले आहे. आजोबांच्या भूमिकेत माधव अभ्यंकर यांनी दमदार कामगिरी बजावली आहे. श्वेता पगार हिला यात फार मोठी संधी मिळाली नसली, तरी तिने तिचे अस्तित्व व्यवस्थित दाखवून दिले आहे. शलाका आपटे, प्रतीक देशमुख, सतीश सलागरे, महेंद्र तेरेदेसाई यांच्या भूमिका लक्षात राहतात. चित्रपटाच्या तांत्रिक बाजू ठीक आहेत. थोडक्यात, एक चांगला विषय मांडण्याचा केलेला समाधानकारक प्रयत्न, असे या चित्रपटाबद्दल म्हणता येईल.

१७ मे रोजी रवी जाधवचा ‘रंपाट’ पडद्यावर…! 

 
– राज चिंचणकर
       मराठी चित्रपटसृष्टीत दर शुक्रवारी विविध मराठी चित्रपट प्रदर्शित होत असले, तरी हटके चित्रपट देण्याची परंपरा राखणाऱ्या रवी जाधव यांचा चित्रपट कधी येतोय याची उत्सुकता रसिकांना कायम असते. रसिकांची ही प्रतीक्षा आता संपुष्टात येणार असून, १७ मे रोजी रवी जाधव यांचा ‘रंपाट’ हा अनोखा चित्रपट पडद्यावर येण्यास सज्ज झाला आहे. अंबर हडप, गणेश पंडित, रवी जाधव यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या या ‘रंपाट’चे दिग्दर्शन अर्थातच रवी जाधव यांचे आहे.
Rampaat Music Launch 1
       शीर्षकापासूनच उत्कंठा वाढवणारा हा चित्रपट असल्याने यात नक्की काय आहे, हा प्रश्न पडणे साहजिकच आहे. थोडक्यात सांगायचे, तर हल्लीच्या तरुण पिढीला झपाटून टाकणाऱ्या ‘स्टारडम’वर यात फोकस टाकण्यात आला आहे. ‘स्टारडम’ मिळवण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून युवावर्ग मुंबईच्या दिशेने धाव घेत असतो. ‘रंपाट’मधले मिथुन आणि मुन्नी हे सुद्धा याच वाटेवर चालणारे आहेत. त्यांचा हा प्रवास नक्की कसा आहे, याचा उलगडा १७ मे रोजी होणार आहे. मिथुन आणि मुन्नी यांच्या भूमिकेत अभिनेता अभिनय बेर्डे आणि कश्मिरा परदेशी ही जोडी चमकत आहे.
       ‘झी स्टुडिओज्’चे मंगेश कुलकर्णी व ‘अथांश कम्युनिकेशन’च्या मेघना जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. अभिनय बेर्डे व कश्मिरा परदेशी यांच्यासह या चित्रपटात प्रिया बेर्डे, अभिजीत चव्हाण आणि कुशल बद्रिके यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. वैभव मांगले, आनंद इंगळे, चंद्रकांत कुलकर्णी, अंकुश चौधरी आणि अमृता खानविलकर यांनी पाहुणे कलाकार म्हणून यात काम केले आहे.
       ‘रंपाटचे  संकलन अभिजित देशपांडे यांनी केले असून, वेशभूषा मेघना जाधव यांची आहे. वासुदेव राणे यांचे छायाचित्रण व संतोष फुटाणे यांचे कला दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आहे; तर पार्श्वसंगीत सौरभ भालेराव यांचे आहे. या चित्रपटात चिनार-महेश यांनी संगीत दिलेली चार गाणी आहेत. ही गाणी गुरु ठाकूर, मंगेश कांगणे, ए- जीत, जे. सुबोध, जॅझी नानू, एक्सबॉय आणि रवी जाधव यांनी लिहिली आहेत. बेला शेंडे, रोहित राऊत, हर्षवर्धन वावरे, ए- जीत, जे सुबोध, जॅझी नानू, एक्सबॉय आणि किलर रॉक्स (बिटबॉक्सर) यांच्या सोबतीने सौरभ साळुंखे यांनी ही गाणी गायली आहेत.

साड्या, ग्लिसरीन आणि बरेच काही…!

– राज चिंचणकर
       अलका कुबल-आठल्ये म्हणजे ‘माहेरची साडी’; हे समीकरण गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या मनात घट्ट रुजले आहे. त्याचबरोबर, त्यांचा चित्रपट म्हणजे डोळ्यांना रुमाल लावायला लागणार, असे चित्रही सर्वसाधारणपणे दिसून येते. पण आता त्यांचा येऊ घातलेला ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट मात्र या दोन्ही गोष्टींचे संदर्भ रसिकांना नव्याने पडताळून पाहायला लावणार आहे.
AK
       मराठी रुपेरी पडद्यावर अलका कुबल यांची थोड्याबहुत फरकाने असलेली ‘रडूबाई’ अशी इमेज पार बदलून टाकणारा हा चित्रपट आता त्यांच्या ओंजळीत आला आहे. या चित्रपटात भूमिका साकारताना, प्रथमच मला डोळ्यांत ‘ग्लिसरीन’ घालावे लागले नाही, असे त्या स्पष्ट करतात; तेव्हाच त्यांची ही भूमिका ‘हटके’ असणार यावर शिक्कामोर्तब होते. थोडक्यात, अलका कुबल यांचा चित्रपट असला, तरी तमाम रसिकांनी आपापले रुमाल घरी ठेवून चित्रपट पाहायला जायला हरकत नाही. डोळे ओलावण्याच्या प्रक्रियेपासून मराठी रसिकांची मुक्तता करणारा चित्रपट अखेर त्यांच्या वाट्याला आला, हेही नसे थोडके!
       दुसरे म्हणजे, ‘माहेरची साडी’ या चित्रपटातल्या साड्यांचा संदर्भही अलका कुबल यांच्या बाबतीत ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाच्या निमित्ताने बदलत आहे. यात त्यांना चित्रपटभर विविध प्रकारच्या साड्या नेसायला मिळाल्या आहेत. हसरा चेहरा आणि भरजरी साड्या, अशा थाटात महाराष्ट्राच्या या लाडक्या अभिनेत्रीला पाहणे, हा सुखावह धक्का ठरणार आहे. या चित्रपटाने ही भन्नाट किमया केली असून, येत्या १२ एप्रिल रोजी अलका कुबल यांचे आगळेवेगळे दर्शन ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर घडणार आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑