अरुंधतीत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न -मधुराणी गोखले प्रभुलकर

आई कुठे काय करते या मालिकेविषयी काय सांगाल?

आई आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. आई या शब्दाभोवतीच इतक्या भावभावना जोडलेल्या असतात. अगदी कवितेच्या माध्यमातून सांगायचं झालं तर मी म्हणेन, ‘तुझ्या पोटावरच्या माझ्या जन्मखुणा तू दाखवल्या नाहीस कधी मातृत्वाचे उपकार म्हणून, ठेवला नाहीस जमाखर्च पदारआडून दिलेल्या दानाचा आणि पदर मोडून दिलेल्या धनाचा, तुझ्या हातावर नाही आहेत आता खुणा मला न्हाऊ माखु घातल्याच्या, तुझ्या डोळ्यात नाही आहेत सुगावे माझ्या दुखण्या खुपण्यात रात्री जागल्याचे…इतकी कशी बेहिशेबी गं तू? मी मात्र तुला आणलेल्या औषधांचा हिशोब ठेवलाय काल डायरीत… सांग ना आई कसा उतराई होऊ सांगना आई तुझी आई कसा होऊ…’या ओळीच खरतर खूप काही सांगून जातात. आपल्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या आणि तरीही कायम दुर्लिक्षित राहणाऱ्या आईची गोष्ट म्हणजे ‘आई कुठे काय करते’ ही मालिका. या मालिकेचं वेगळेपण जसं नावात आहे तसंच सादरीकरणामध्येही आहे. प्रोमोपासून ते जपण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. मालिका पहाताना हा वेगळेपणा तुम्हाला नक्कीच जाणवेल. अर्थातच याचं श्रेय जातं स्टार प्रवाह वाहिनी, निर्माते राजन शाही, दिग्दर्शक रवी करमरकर, आमची लेखिका रोहिणी निनावे आणि मालिकेच्या संपूर्ण टीमला.

MADHURINI PIC 2

या मालिकेच्या निमित्ताने तुमचं मालिका विश्वात कमबॅक होत आहे त्याविषयी…

खरंय जवळपास १० वर्षांनंतर मी मालिका करते आहे. अर्थातच १० वर्षांचा हा गॅप आईपणासाठीच घेतला होता. मला सहा वर्षांची मुलगी आहे. तिच्या जन्मानंतर तिला वेळ द्यायचं हे मी ठरवलं होतं आणि तिच्या संगोपनासाठी पूर्णपणे स्वत:ला झोकून दिलं. आई कुठे काय करते मालिकेचा विषय आणि त्याची मांडणी मला खूप आवडली आणि मालिका करण्याचा मी निर्णय घेतला.

मालिकेत तुम्ही साकारत असलेल्या भूमिकेविषयी काय सांगाल?

या मालिकेत मी अरुंधतीची भूमिका साकारते आहे. अरुंधती प्रचंड हळवी आहे. सर्वांवर भरभरुन प्रेम करणारी. माझा जन्म सर्वांना प्रेम देण्यासाठी झालाय, त्यामुळे मी चिडणार नाही कुणाच्याही बोलण्याचा त्रास करुन घेणार नाही असं तिने मनाशी पक्क ठरवलं आहे. तिचं समर्पण तिचा सोशिकपणा ही तिची शक्तीस्थानं आहेत. मनाने अतिशय निर्मळ आणि भाबडी असणाऱ्या या अरुंधतीत प्रत्येकजण आपली आई नक्कीच शोधेल. खास बात सांगायची म्हणजे मला आणि अरुंधतीला जोडणारा समान धागा म्हणजे गाण्याची आवड. मला गाण्याची आवड आहेच अरुंधतीलाही गाण्याची आवड आहे. त्यामुळे भूमिका साकारताना मी अरुंधतीत स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करते.

तुमच्या आईविषयी…

माझी आई हा माझ्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग आहे. माझी आई शास्त्रीय संगीत गायिका आहे. पण आपल्या कलेला नेहमीच दुय्यम स्थान देऊन तिने आपलं मातृत्व आणि सर्व जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्या. घरसंसार सांभाळताना तिची आवड मागे पडली याची मला खंत आहे. आईचं समर्पण शब्दात व्यक्त करणं केवळ अशक्य आहे. त्यामुळे घरासाठी, मुलांसाठी आयुष्यभर राबणाऱ्या या माऊलीचं महत्त्व पटवून देणारी ‘आई कुठे काय करते’ ही मालिका म्हणूनच माझ्यासाठी खुप खास आहे.

‘एकदा काय झालं’ चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त संपन्न

संगीतकार व गायक डॉ. सलील कुलकर्णी यांची गाणी कायम सदाबहार असतात. पण गाण्याच्या पलिकडे जाऊन सलील यांनी नुकतंच दिग्दर्शनात पदार्पण केलं ते वेडिंगचा शिनेमा’ या मराठी सिनेमातून. धमाकेदार मनोरंजनाचं पॅकेज असलेला सिनेमा दिल्यानंतर आता डॉ. सलील कुलकर्णी पुन्हा सज्ज झाले आहेत एक नवीन अनुभव देण्यासाठी. ‘एकदा काय झालं’ या सलील कुलकर्णी यांच्या आगामी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाचं पहिलं-वहिलं पोस्टर सोशल मीडियावरुन लॉन्च केलं गेलं.

एकदा काय झालं या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त २६ डिसेंबर रोजी पुणे येथे सलील कुलकर्णी यांच्यासह चित्रपटात महत्वाच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थित पार पडला. यावेळी या चित्रपटातील कलाकार सुमित राघवनउर्मिला कोठारेडॉ. मोहन आगाशेसुहास जोशीपुष्कर श्रोत्रीराजेश भोसलेप्रतीक कोल्हेमुक्ता पुणतांबेकरआकांक्षा आठल्येरितेश ओहोळअर्जुन पुर्णपात्रेअद्वैत वाकचौPhoto-2डेअद्वैत धुळेकर आणि मेरवान काळे उपस्थित होते. २०२०च्या उन्हाळ्यात हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे.

जेव्हा पत्रकारांच्या मातोश्रींचा सन्मान होतो…! 

– राज चिंचणकर

       मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांच्या मातोश्रींच्या सन्मानाचा दुर्मिळ योग ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेच्या निमित्ताने जुळून आला आणि ‘आई’ नावाचा संवेदनशील कोपरा अधिकच हळवा झाला. आईपणाच्या भावविश्वाचा मागोवा घेणारी ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सुरु झाली आहे आणि या मालिकेच्या टीमने असा आगळावेगळा सन्मान करत अनोखा पायंडा पाडला.

Raj1

‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत आईची, अर्थात अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर साकारत आहे. मिलिंद गवळी, अर्चना पाटेकर, दीपाली पानसरे, किशोर महाबोले आदी कलाकारही या मालिकेत भूमिका रंगवत आहेत. या मालिकेच्या शुभारंभाच्या निमित्ताने, या टीमने थेट पत्रकारांच्या मातोश्रींनाच साद घालण्याची संकल्पना मांडली आणि ती प्रत्यक्षातही आणली.

त्याप्रमाणे, पत्रकारांच्या मातोश्रींचा सन्मान खुद्द त्या-त्या पत्रकारांच्या हस्ते करण्यात आला आणि या सोहळ्यात आईपणाचा वेगळा पैलू उलगडला गेला. रोजच्या कामाच्या धावपळीत दुर्लक्ष होत असलेल्या आणि ‘आई कुठे काय करते?’ या संभ्रमात अडकलेल्यांच्या दृष्टीसमोरचा पडदा यावेळी आईच्या ममत्वात पार चिंब होऊन गेला. मालिकेतल्या मधुराणी गोखले-प्रभुलकर, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे या कलाकारांसह, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचे प्रोग्रामिंग हेड सतीश राजवाडे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. या मंडळींनी सांगितलेल्या त्यांच्या ‘आई’बद्दलच्या आठवणींनी, या चमकत्या ताऱ्यांच्या आयुष्यातल्या सर्वसामान्यपणाचे प्रतिबिंबही या सोहळ्यात मुक्तपणे सांडत गेले.

डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘शिवप्रताप’ रुपेरी पडद्यावर…! 

– राज चिंचणकर
       मराठी रंगभूमी आणि छोट्या पडद्यावरून छत्रपती शिवाजी महाराज यांची महती सांगणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे आता ‘शिवप्रताप’ सांगण्यास सज्ज होत आहेत. यासाठी त्यांनी मोठा पडदा जवळ केला असून, ‘शिवप्रताप’ या चित्रपट मालिकेच्या माध्यमातून ते तीन चित्रपटांची निर्मिती करत आहेत. ‘वाघनखं’, ‘वचपा’ आणि ‘गरुडझेप’ अशी या चित्रपटांची शीर्षके आहेत. त्यांच्या ‘जगदंब क्रिएशन्स’तर्फे हे तिन्ही चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
AK
       अलीकडेच त्यांनी या चित्रपटांची जाहीर घोषणा करत त्यांची ही नवीन भूमिका समोर आणली. पण इतके करूनच डॉ. अमोल कोल्हे थांबलेले नाहीत; तर छत्रपती शिवरायांची महती महाराष्ट्राच्या बाहेरील अमराठी भाषिकांपर्यंत पोहोचावी म्हणून ते हे चित्रपट हिंदी भाषेतही निर्माण करणार आहेत.
       या तीन चित्रपटांपैकी ‘वाघनखं’ हा पहिला चित्रपट ६ नोव्हेंबर २०२० रोजी पडद्यावर येणार आहे. कार्तिक केंढे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून लेखन प्रताप गंगावणे यांचे आहे. येत्या जानेवारी महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होणार आहे. डॉ. अमोल कोल्हे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह डॉ. घनश्याम राव व विलास सावंत हे या चित्रपटांचे निर्माते आहेत.

स्वराज्य बांधणीची यशोगाथा सांगण्यासाठी येतेय ‘स्वराज्यजननी जिजामाता’

सरदारांची वर्दळ, युध्दाचे डावपेच, सल्लामसलत, न्यायनिवाड्यात जाणारा दिवस तर युध्दकलांचं प्रशिक्षण अशा वातावरणात पार पडलेलं जिजाचं बालपण. पारतंत्र्यात असलेल्या रयतेची वेदना बालपणीच असह्य झालेल्या जिजांनी  मनोमनी या एकंदर परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय घेतला होता. थोड्या फार फरकाने एका विचाराच्या असणाऱ्या जिजा आणि शहाजींचं लग्न झालं आणि जिजांच्या आयुष्यात  स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली. त्यांचं  कर्तब थोर होतंच त्यात आपलं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या  कटिबध्द  ही होत्या .  त्यांच्या  पोटी जन्माला आलेल्या शिवबाला युध्दकलेत पारंगत करणं असेल किंवा स्त्रियांचा सन्मान, इतकंच नव्हे तर जाती धर्मांमध्ये फरक न करता सगळ्यांना समान वागणूक देण्याचे संस्कार ही शिवबांवर जिजाऊने केले.  शहाजी राजांच्या गैरहजेरीत मातृत्त्वाची जबाबदारी पार  पाडतानाच  जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम ही त्यांनी  चोखपणे  पार  पाडलं. शिवबानं बरोबरच अवघ्या मराठी  मुलखाचे भविष्य घडवणाऱ्या  अशा थोर माऊलीची गाथा सध्या सोनी मराठीच्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.

 

गेल्या काही दिवसांत या मालिकेच्या माध्यमातून समोर आलेलं जिजाऊचं हे कणखर व्यक्तिमत्त्व आता त्याच्या पुढच्या टप्प्यात पाऊल ठेवणार आहे. जिजाऊच्या बालपणापासून ते आताच्या  कणखर धैर्यशाली जिजाऊ यांचा हा अनोखा प्रवास ” स्वराज्यरजननी  जिजामाता ” या मालिकेतून आपल्या समोर उलगडणार आहे . बालपणीच  जिजाऊ च्या   मनी रोवलं गेलेलं स्वराज्याचं बीज मूर्तरूपात पाहण्यासाठी तिची धडपड डॉ. अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मित “स्वराज्यजननी जिजामाता” मालिकेतून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. जिजाशहाजीचं बालपण आता सरलं असून मोठ्या जिजाची भूमिका आता अमृता पवार या मालिकेत साकारत आहे. तर  शहाजींच्या भूमिकेत अभिनेता रोशन मनोहर विचारे दिसणार आहे.

‘बने’ कुटुंबात येणार खास पाहुणा

टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमीचं काही न काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून मांडले जातात . आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात तर हे विषय थोडया कल्पक रीतीने लोकांसमोर घेऊन येण्यासाठी सोनी मराठी वरील ” ह.म.बने. तु.म.बने ” ही मालिका अग्रगण्य आहे . समाजात घडणारे अनेक विषय योग्य प्रकारे हाताळून लोकांना या मालिकेतून सामाजिक संदेश देण्यासाठी ही मालिका नेहमी काही न काही नव्या गोष्टी लोकांसमोर घेऊन येते . लवकरचं या मालिकेत एक खास आणि कमालीचा विषय मांडण्यात येणार असून या मालिकेच्या माध्यमातून खरा खुरा तृतीयपंथी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे . बने कुटुंबिय नेहमीच आपल्याला त्यांच्या कमालीच्या भूमिका मधून भेटीला येत असतात आता असा काहीसा अनोखा विषय या मालिकेत लवकरचं आपल्याला बघायला मिळणार आहे .

IMG-20191119-WA0001

आजवर आपण अनेक चित्रपटात आणि वेबसेरीज मध्ये तृतीयपंथीना बघत आलो आहोत तर आजवर कुठल्या ही मालिकेत किंवा चित्रपटात खऱ्या तृतीयपंथीय माणसाने काम केलं नसून लवकरचं आपल्याला एक खरा खुरा तृतीयपंथी या मालिकेत काम करताना दिसणार आहे . समाजातील एक अनोखा घटक म्हणून तृतीयपंथी लोकांकडे पाहिलं जातं . तर नेहमीच वेगळ्या विषयांना कल्पक रीतीने मांडून त्यांकडे वेगळ्या दृष्टिकोनातून भाष्य करणारी मालिका म्हणजे ” ह.म.बने. तु.म.बने ” .

IMG-20191119-WA0000या मालिकेच्या निमित्ताने एका ” तृतीयपंथीय ” ला मालिकेतून प्रकाशझोतात आणण्याचं काम मालिका करणार आहे . तृतीयपंथी समाजासाठी ही नक्कीच अभिमास्पद अशी बाब ठरणार आहे . मालिकेत तुलिकाचा जुना तृतीयपंथी मित्र तिला अचानक भेटतो आणि या मित्राला तुलिकाच्या घरी जाण्याची उत्सुकता आहे पण तुलिकाच्या या अनोख्या मित्राला तिच्या घरचे कसे भेटणार आणि ते या मित्राचं स्वागत करणार का ? उद्याच्या भागात नक्की पाहता येईल

छत्रपती शिवाजी महाराज ते समर्थ रामदास स्वामी…! 

– राज चिंचणकर 

 
       अभिनेता शंतनू मोघे याने यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज साकारले आहेतच; परंतु आता तो थेट समर्थ रामदास स्वामींच्या भूमिकेत दर्शन देण्यास सज्ज झाला आहे.  II श्री राम समर्थ II या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून तो हे शिवधनुष्य पेलण्यास सिद्ध होत आहे. १ नोव्हेंबरपासून त्याचा हा आगळा अवतार पडद्यावर पाहता येणार आहे. या भूमिकेच्या निमिताने शंतनू मोघे याच्याशी साधलेला संवाद… 
 
Shantanu Mo.
 
समर्थ रामदास स्वामींची भूमिका साकारताना तुझ्या काय भावना आहेत? 
 
ही भूमिका करताना आनंद तर निश्चितच आहे; परंतु त्याचबरोबर अभिमान आणि स्वाभिमानही आहे. समर्थ रामदास स्वामींसारखी एक व्यक्तिरेखा मला साकारायला मिळतेय, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. 
 
छत्रपती शिवाजी महाराज ते समर्थ रामदास स्वामी हा प्रवास कसा होता? 
 
खूपच छान होता हा सगळा प्रवास!  या दोन्ही व्यक्तिमत्त्वांबद्दल म्हणायचे, तर त्यांच्यात एक समान धागा होता आणि तो म्हणजे देश व धर्म!  एक लढवय्या होता; तर एक प्रचारक व प्रसारक होता. त्यांचे विचार सारखेच होते; मात्र त्यांनी अवलंबलेले मार्ग वेगळे होते. धर्मरक्षणाचा विडाच त्यांनी उचलला होता. त्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांची वैचारिक बैठक पक्की होती. समर्थ रामदासांचे साहित्य असू दे, त्यांच्या आरत्या असू दे; या माध्यमातून त्यांनी त्यांचे विचार लोकांसमोर मांडले. असे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांसमोर घेऊन येताना खूप आनंद वाटत आहे.  
 
छत्रपतींची राजेशाही वस्त्रे ते स्वामींची भगवी कफनी, असा फरक असताना ही व्यक्तिमत्त्व तुझ्या अंगात किती भिनली? 
 
नक्कीच भिनली. महाराज स्वराज्याचे छत्रपती होते, पण रयतेचा सच्चा मावळा म्हणूनच त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली. आऊसाहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी छत्रपतीपद स्वीकारले. तो एक प्रवासच वेगळा होता. रामदास स्वामी यांनी तर कुणाच्याही अध्यातमध्यात न जाता, मला माझा प्रसार, प्रचार करायचा आहे; याकडे लक्ष पुरवले. यासाठीच त्यांनी बहुधा हे रूप धारण केले असावे. 
Shantanu M.
ही भूमिका रंगवताना स्वामींचे ‘मनाचे श्लोक’ किती आचरणात आणलेस? 
 
स्वामींचे विचार नक्की काय आहेत, हे समजून घेण्यासाठी ‘मनाचे श्लोक’ वाचत गेलो, त्यांचे मनन करत गेलो. जी व्यक्तिरेखा आपण साकारणार आहोत; तिचे आचारविचार काय आहेत, हे कळले की ती व्यक्तिरेखा नीट उभी करता येते.  
 
रामदास स्वामींच्या भूमिकेनंतर पुढे काय ठरवले आहेस? 
 
खरं तर आतापर्यंत मी कधीच कुठली भूमिका ठरवून केलेली नाही. पण काही चित्रपटांची प्रोजेक्ट्स आता सुरु झाली आहेत आणि त्यात विविध प्रकारच्या भूमिका मी करत आहे. 

‘कॉपी’ करणार शिक्षण पद्धतीवर भाष्य…! 

– राज चिंचणकर
       दर आठवड्याला विविध मराठी चित्रपट प्रदर्शित होत असतात; मात्र या मांदियाळीत एक आशयघन सिनेमा गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. एक वास्तववादी कथानक मांडणा-या या चित्रपटाचे शीर्षक ‘कॉपी’ असे आहे. देश-विदेशांमधील विविध नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये मराठी सिनेमाचा झेंडा या चित्रपटाने याआधीच मानाने फडकवला आहे आणि येत्या ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
Copy 02
       आपल्या मुलांना उच्चशिक्षित करण्यासाठी पालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे; तर मुलांनाही अनेक प्रकारच्या परीक्षांमधून स्वतःला सिद्ध करावे लागत आहे. या सगळ्या पैलूंवर ‘कॉपी’मधून प्रकाश टाकण्यात आला आहे. या चित्रपटाने एशियन फिल्म फेस्टिव्हल, लॉस एंजेलिस फिल्म फेस्टिव्हल, संस्कृती कलादर्पण चित्रपट महोत्सव, ५५ वा महाराष्ट्र राज्य पुरस्कार सोहळा; तसेच इतर नामांकित सिनेमहोत्सवांमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्त्व सिद्ध केले आहे. ‘श्री महालक्ष्मी क्रिएशन्स’च्या बॅनरखाली निर्माते गणेश रामचंद्र पाटील यांनी ‘कॉपी’ची निर्मिती केली आहे. या चित्रपटाची संकल्पनाही गणेश पाटील यांचीच आहे. दयासागर वानखेडे आणि हेमंत धबडे यांनी ‘कॉपी’चे दिग्दर्शन व पटकथालेखन केले आहे.
       या चित्रपटात मिलिंद शिंदे, अंशुमन विचारे आणि जगन्नाथ निवंगुणे यांच्यासह कमलेश सावंत, सुरेश विश्वकर्मा, नीता दोंदे, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, आशुतोष वाडकर, पूनम राणे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे, रवी विरकर, श्रद्धा सावंत आदी कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. संवादलेखन दयासागर वानखेडे यांनी केले असून, राहुल साळवे यांनी गीतलेखन केले आहे. नव्या दमाचे संगीतकार रोहन-रोहन यांच्यासह वसंत कडू यांनी या सिनेमातील गीतांना संगीत दिले आहे.

१ नोव्हेंबरला भाऊबीजेची ओवाळणी…! 

IMG_9690.JPG– राज चिंचणकर 
       दीपावलीच्या सणाने अंतिम चरण गाठला असला, तरी मराठी पडद्यावरची दिवाळी पुढेही सुरु राहणार आहे; कारण १ नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर भाऊबीजेची ओवाळणी केली जाणार आहे. हे कसे काय शक्य आहे, हे अनुभवण्यासाठी मात्र या दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ‘खारी बिस्कीट’ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. लहानग्या भाऊ-बहिणीचे विश्व या चित्रपटात उलगडले गेले असून, त्यांच्या नात्यातल्या गोडव्याची पखरण या चित्रपटात दिसणार आहे.
       अवघ्या पाच वर्षांची गोंडस मुलगी आणि तिचा आठ वर्षांचा भाऊ, यांची कहाणी या चित्रपटात दिसणार आहे. वेदश्री खाडिलकर आणि आदर्श कदम ही लहानगी जोडगोळी या चित्रपटात चमकत आहे.  त्यांच्यासह सोहम जाधव, स्वानंद शेळके, शर्व दाते या  बच्चेमंडळीच्या सोबत नंदिता पाटकर, सुयश झुंझुरके आणि संजय नार्वेकर यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. आता या चित्रपटाला ‘खारी बिस्कीट’ असे शीर्षक का दिले असावे, हे मात्र गुलदस्त्यात आहे. ‘झी स्टुडिओज’ आणि ‘ड्रीमिंग ट्वेन्टी फॉर सेव्हन’ यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑