चित्रपट परीक्षण – ‘म्होरक्या’ – संवाद माध्यमातून बोलणाऱ्या निःशब्द फ्रेम्स…! 

* * * १/२  (साडेतीन स्टार)  
 
 
 
– राज चिंचणकर 
 
       मराठी चित्रपट आशयघनतेच्या बाबतीत वरच्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे आणि त्यादृष्टीने मनाला भिडतील असे आशय व विचार मराठी चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. चित्रपट हे माध्यम मुख्यत्वेकरून कॅमेर्‍याचे आहे आणि त्याद्वारे कलाकृतीची उंची कमालीची वाढवण्याचे सामर्थ्य या तंत्रज्ञानात आहे. जरी एखादी साधी गोष्ट चित्रपटातून सांगण्यात येत असली, पण तिला उत्तम दृष्टिकोन व तंत्रज्ञानाची जोड मिळाली; तर काय घडू शकते याचे उदाहरण म्हणजे ‘म्होरक्या’ हा चित्रपट आहे.
MH2
       या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम न फ्रेम थेट संवाद साधत बोलत राहते. कलाकारांच्या तोंडी अतिशय कमी संवाद असूनही, या ‘फ्रेमिंग’च्या माध्यमातून चित्रपटाची कथा आणि आशय मनाला भिडतो. महत्त्वाचे म्हणजे, इतकी सफाई असणारा चित्रपट एक सरळमार्गी गोष्ट सांगत जातो. हा चित्रपट पूर्णतः ग्रामीण बाजाचा आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने बांधलेल्या या चित्रपटाला दिग्दर्शकीय दृष्टिकोनाद्वारे मिळालेली ही भेटच म्हणावी लागेल.
MH1
       अशोक उर्फ अश्या या शाळकरी मुलाची ही साधी-सरळ अशी कथा आहे. समाजाच्या तळागाळात वाढलेल्या अशोकचा दिवस, मेंढ्या हाकण्यात व्यतीत होतो. अभ्यासात त्याला अजिबात रस नाही; पण एक दिवस त्याचे मित्र त्याला शाळेची वारी घडवतात आणि तिथे सुरू असलेली मुलांची परेड, अर्थात संचलन अशोकला आकर्षून घेते. त्याला या परेडचे नेतृत्व करावेसे वाटते; मात्र या प्रकारात गावच्या पाटलाचा मुलगा त्याच्या आड येत राहतो. परिणामी, परेड शिकण्याचे अशोकचे प्रयत्न अर्धवटच राहतात. दुसरीकडे, गावात भटकणारा एक वेडसर माणूस आण्ण्या, याचे आकर्षण अशोकला वाटत असते. तो आण्ण्याचा पिच्छा पुरवतो, तेव्हा आण्ण्या हा एकेकाळी युद्धात लढलेला सैनिक आहे हे अशोकला समजते. आता आण्ण्या त्याला परेड शिकवेल, याची अशोकला खात्री वाटू लागते. पण स्क्रिझोफेनियाच्या चक्रात सापडलेला आण्ण्या हा गावातला हेटाळणीचा विषय झालेला असतो. पुढे अशोकच्या या परेड प्रकरणावर दृष्टिक्षेप टाकत ‘म्होरक्या’ हा चित्रपट बरेच काही सांगत जातो.
       लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या अमर देवकर यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे. महत्त्वाचे म्हणजे यातले त्यांचे दिग्दर्शकीय कसब वाखाणण्याजोगे आहे. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममधून हा दिग्दर्शक विनासंवाद बरेच काही बोलत राहतो. अनेकदा प्रतिकात्मक बाज पकडत त्यांनी या फ्रेम्स अधिकच बोलक्या केल्या आहेत. वेडसर झाक असलेली यातली आण्ण्याची भूमिकाही त्यांनी टेचात रंगवली आहे. ज्याच्यावर या चित्रपटाचा फोकस आहे, ती अशोक ही व्यक्तिरेखा रमण देवकर याने अचूक व्यवधान राखत उभी केली आहे. मुळात या चित्रपटातले कलावंत अभिनय करतच नाहीत असे वाटते; इतक्या त्यांच्या भूमिका वास्तवदर्शी झाल्या आहेत. ऐश्वर्या कांबळे (निकिता), रामचंद्र धुमाळ (गोमतर आबा), यशराज कऱ्हाडे (बाळ्या), अनिल कांबळे (शिक्षक) या सर्वांच्या व्यक्तिरेखा लक्षात राहतात. एवढेच नव्हे; तर सुरेखा गव्हाणे आणि इतर कलावंतांच्या छोट्या छोट्या भूमिकाही चित्रपटात भरीव रंगकाम करतात.
       या चित्रपटाचे कॅमेरावर्क, संकलन, कला दिग्दर्शन या बाजू नीट जमून आल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत या चित्रपटाने का झेप घेतली असावी, याचे उत्तर या चित्रपटाच्या सादरीकरणातच आहे आणि या संपूर्ण टीमने चाकोरीबाहेरचा असा एक अनुभव या ‘म्होरक्या’द्वारे दिला आहे.

चित्रपट परीक्षण – ‘वेगळी वाट’  – सकारात्मकतेची कास धरणारा मार्ग…! 

*** (३ स्टार)
सकारात्मकतेची कास धरणारा मार्ग…! 
 
 
 
– राज चिंचणकर 
       मराठी पडद्यावर काही चित्रपट आपली स्वतःची अशी वेगळी वाट निवडताना दिसतात. ‘वेगळी वाट’ असेच शीर्षक असलेल्या या चित्रपटानेही स्वतःचा एक अनोखा मार्ग निवडत साध्या, सोप्या, सरळ भाषेत एक प्रामाणिक कथा संवेदनशीलतेने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
       हा चित्रपट साध्या-सरळ वाटेवरून चालतो आणि त्यामुळेच तो त्याचे अस्तित्व कायम करतो.  ही गोष्ट एका वडील (राम) आणि त्यांची शाळकरी मुलगी (सोनू) यांची आहे. या दोघांचे भावबंध किती घट्ट आहेत, याचे टोकदार दर्शन हा चित्रपट घडवत जातो. चित्रपट ग्रामीण बाजाचा आहे. यात शेतकऱ्याची व्यथा तर मांडली आहेच; परंतु त्यासोबत पूरक व्यवसायाची सकारात्मक वाट निवडत त्या समस्येवर उत्तरही शोधले आहे. कर्जबाजारी शेतकरी, त्यांची अडवणूक करणारे सावकार ही काही नवीन बाब नव्हे; परंतु या पार्श्वभूमीवर ही कथा एक वेगळीच वाट निवडत चित्रपटाला ठोस शेवटाकडे घेऊन जाते.
VW1
       गावातल्या कोणत्याही घरात घडू शकेल अशी साधी कथा यात गुंफण्यात आली असली, तरी त्यावर संयत अभिनयाने चढवलेला कळस हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता किंवा आपले म्हणणे मुद्दाम ठासून सांगण्याचा हव्यास न बाळगता चित्रपट सरळ मार्गाने चालत राहतो आणि ही ‘वेगळी वाट’ सर्वांची होऊन जाते. यातला गरीब शेतकरी अशा एका वळणावर येऊन ठेपतो, की त्याला ठोस निर्णय घेणे अशक्य बनते. मात्र एका क्षणी तो एक निर्णय घेतोच; ज्याचे कारण चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेममध्ये उलगडते आणि ही ‘वेगळी वाट’ चित्रपटाचे शीर्षक सार्थ करते. फक्त यातले सोनूचे सर, सोनूच्या बाबतीत जे काही ठरवतात; ते शिक्षकी पेशा असलेल्या व्यक्तीकडून ठरवले जावे हे सहज पचनी पडत नाही. मात्र ही कथेची गरज असावी; अन्यथा चित्रपटाच्या सारांशाला धक्का पोहोचला असता, हे स्पष्ट आहे.
VW2
       चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अच्युत नारायण यांनी केले आहे आणि यातल्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचे छान प्रकटीकरण यात केले आहे. वडिलांच्या भूमिकेत असलेले शरद जाधव यांनी संपूर्ण चित्रपटभर त्यांची पकड कायम ठेवली आहे. संयत अभिनयाचे उत्तम उदाहरण त्यांनी यात ठासून घडवले आहे. अनया फाटक हिने सोनू रंगवताना, अल्लडपणा ते प्रगल्भतेचा प्रवास टेचात केला आहे. नीता दोंदे हिची यातली आई लक्षवेधी आहे. योगेश सोमण व गीतांजली कुलकर्णी या दोघांची योग्य साथ प्रमुख कलावंतांना मिळाली आहे. तंत्रज्ञानाच्या पातळीवर मात्र चित्रपट दोन पावले मागे चालतो. त्यादृष्टीने थोडे प्रयत्न करता आले असते; तर चित्रपटाचे ‘दिसणे’ अधिक ठसले असते. मात्र, एकूणच सकारात्मकतेची कास धरणारा हा चित्रपट आश्वासक वाटेवरून चालणारा आहे.

मराठी चित्रपट परीक्षण  – ‘लालबत्ती’  – खाकी वर्दीतली संवेदनशील माणूसकी…! 

 
* * १/२  (अडीच स्टार)  
 
 
– राज चिंचणकर 
 
       ‘लालबत्ती’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून काही अंदाज नक्कीच बांधता येतात. पण बांधलेल्या अंदाजांची दिशा चुकते, तेव्हा चित्रपटाचे वेगळेपण ठसते. आडाखे अगदी अचूक ठरले, तर त्यात उत्सुकता ती काय राहणार? वास्तविक, ‘लालबत्ती’ या शब्दावरून काही गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र हा चित्रपट त्याही पलीकडे जाऊन या ‘लालबत्ती’चा अनोखा संदर्भ स्पष्ट करतो.
L1
       पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित कथानक हा या चित्रपटाचा गाभा आहे. क्यू.आर.टी. अर्थात शीघ्र कृती दलाच्या कमांडोंवर ही कथा बेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी एस.बी.पवार यांच्या नेतृत्वाखाली ही टीम कार्यरत आहे. या दलात अशी एक घटना घडते, की त्यावरून एस.बी.पवार यांना पोलिसांमधल्या संवेदनांची जाणीव होते. त्यातच या दलात घुम्यासारख्या वावरणाऱ्या गणेश या कमांडोच्या पार्श्वभूमीची भर पडते आणि एस.बी.पवार काही ठोस निर्णय घेतात. त्याबरहुकूम होणारी कार्यवाही म्हणजे ही ‘लालबत्ती’ आहे.
       करड्या शिस्तीतल्या या खाकी वर्दीच्या आत एक माणूस सुद्धा असतो, याची जाणीव करून देणारी ही कथा व पटकथा अभय दखणे यांनी बांधली आहे. मराठी चित्रपटविश्वात चाकोरीबाहेरची कथा मांडण्याचे काम त्यांनी या निमित्ताने केले आहे आणि त्यादृष्टीने हा चित्रपट वेगळा ठरतो. मात्र ही पटकथा काही ठिकाणी विस्कळीत झाल्यासारखी वाटते. मुळात यातले कमांडो ज्या ‘मिशन’साठी एकत्र येऊन लढायचे ठरवतात; ते उद्दिष्ट तकलादू आहे. हे लक्ष्य अधिक ठोस असते, तर या कमांडोंचे श्रम खऱ्या अर्थाने सार्थकी लागले असते. पोलिसांतल्या संवेदनशीलतेचा तपास अजून खोलवर जाऊन करता येणेही शक्य होते. काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात. अरविंद जगताप यांच्या संवादांत मात्र ‘जान’ आहे आणि त्यामुळे चित्रपटाची ही भट्टी बऱ्यापैकी सुसह्य झाली आहे.
L2
       दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी उपलब्ध सामग्रीवर खाकी वर्दीतले हे माणूसपण उभे केले आहे. यातल्या व्यक्तिरेखांना ‘कडक’ साच्यात मांडण्याचे त्यांचे कसब यातून दिसून येते. कृष्णा सोरेन यांचा कॅमेरा यात उत्तम फिरला असून, त्यांचे छायांकन ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. नीलेश गावंड यांचे संकलन आणि अविनाश-विश्वजीत यांचे संगीत ठीक आहे.
       यातल्या कलावंतांनी हा चित्रपट सक्षम खांद्यांवर तोलून धरला आहे. मंगेश देसाई याने त्याच्या ओंजळीत येणारी प्रत्येक भूमिका ही कायम लक्षात राहण्याजोगीच असावी, असा पणच केला असावा. कारण तसे वाटण्याइतका यातला एस.बी.पवार हा पोलीस अधिकारी त्याने कडक रंगवला आहे. या हरहुन्नरी नटाने पोलीस डिपार्टमेंटच्या कडक शिस्तीपासून, संवेदनशीलच्या सीमेपर्यंत त्याच्या अभिनयाची रेंज दाखवून दिली आहे. रमेश वाणी यांनी इन्स्पेक्टर चव्हाण या व्यक्तिरेखेत दमदार रंगकाम करत ही भूमिका लक्षवेधी केली आहे. कमांडो गणेशची भूमिका तेजस या अभिनेत्याने आश्वासकरित्या उभी केली आहे. भार्गवी चिरमुले, मनोज जोशी, विजय निकम, छाया कदम, मीरा जोशी, अनिल गवस आदी कलावंतांची साथ या चित्रपटाला लाभली आहे. चित्रपटाचा शेवटही बरेचकाही सांगून जातो आणि हा ‘दि एन्ड’ सुन्न करणारा आहे.

चित्रपट –  “आनंदी गोपाळ” एक प्रभावी यशोगाथा

    सुमारे सव्वाशे वर्षापूर्वी इंग्रजी शिक्षणाचा प्रसार / प्रचार सुरु झाला होता. त्या काळात १८ व्या शतकात काहीतरी वेगळे करणाच्या वृत्तीची माणसे त्या वेळी होती. अशा ह्या काळात गोपाळ विनायक जोशी हे शिक्षणाच्या ध्येयाने पछाडलेले होते त्यांनी आनंदी नावाच्या पत्नीला इंग्रजी भाषा शिकण्यासाठी प्रवृत्त केले. इतकेच नाही तर त्यांनी तिच्याकडून वैद्यकीय अभ्यास पूर्ण करण्यासाठी ते तिला अमेरिकेला पाठवले आणि आनंदीबाई  गोपाळराव  जोशी यांनी सुद्धा आपल्या हिमतीवर, जिद्दीने तो अभ्यास पूर्ण केला. गोपाळराव यांच्या सोबतीने आनंदीबाई फक्त शिकल्याच नाहीत तर भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान  त्यांनी मिळवला. त्यांच्या दोघांच्या नाते संबंधावर असलेला सहयोगाचा प्रवास आनंदी गोपाळ मध्ये सादर केला आहे.

Film Anandi Gopal

      आनंदी गोपाळ हा एक चरित्रपट आहे. दोघांच्या जीवनाचा प्रवास या मध्ये प्रभावीपणे मांडला आहे. हा प्रवास दाखवताना त्यांचे नाते संबंध कसे होते, समाजाचा विरोध असून सुद्धा नेटाने आणि हिमतीने त्यांनी आपले योजलेले कार्य पूर्ण केले. गोपाळराव यांचा स्वभाव हा हेकेखोर, विक्षिप्त, हट्टी, रागीट असा असल्याने आनंदीबाई यांना खूप सोसावे लागले. त्या काळात मुलीनी शिकावे हे समाजाने मान्य केले नव्हते. गोपाळराव हे टपाल खात्यात नोकरी करायचे इंग्रजी भाषेशी त्यांचा संबंध आला. इंग्रजीचे ज्ञान आपल्याकडील लोकांनी शिकायला हवे अशी त्यांची तळमळ होती. आपल्या बायकोनी शिकावे असे त्यांना वाटत होते. पहिल्या बायकोला त्यांनी शिकविण्याचा प्रयत्न केला पण तिचे आयुष्य कमी होते. गोपाळराव यांनी दुसरे लग्न करताना बायकोने शिकायला पाहिजे हि अट घातली होती आनंदीबाई ला तिच्या वडिलांनी शिकवलं होते आणि आता नवरा सुद्धा शिकवणार होता. त्यांच्या प्रयत्नाने आनंदीबाईला शिक्षणाची गोडी लागली आणि त्या डॉक्टर झाल्या.

Film Anandi Gopal.2

      दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी त्या काळाचे चित्रण खूप छान केले आहे. तो काळ दाखविण्यासाठी केलेली मेहनत जाणवते. आनंदीबाईच्या आजूबाजूची माणसे, तिच्या मैत्रिणी हे सारे त्यांनी प्रभावीपणे दाखवले आहे. त्याकाळी कोणते खेळ खेळले जात असतील त्यांचे यतार्थ चित्रण त्यांनी केल आहे. अभ्यास हा सुद्धा खेळ असायचा, त्यातूनच तिला गोडी निर्माण झाली त्यातूनच आनंदीबाई ची प्रगती दाखवली आहे. अभ्यासा बरोबर तिच्या मनांत आणि गोपाळराव यांच्या मनांत काय घडत होते इत्यादी भावनिक प्रसंग आणि त्यांचा मानसिक जडण-घड्नेचा प्रवास प्रामुख्याने दाखवला आहे. आनंदीबाई – गोपाळराव यांच्या आयुच्यात जे जे टप्पे येत गेले त्याचा बारकाईने विचार करून ते सादर केले आहे.

      आनंदीबाई ची भूमिका भाग्यश्री मिलिंद हिने प्रभावीपणे सादर केली आहे. त्यांची अभ्यासाविषयी असलेली ओढ आणि खेळण्याचे वय या मधील फरक छान व्यक्त केला आहे. गोपाळरावची भूमिका ललित प्रभाकर यांनी समर्थपणे सादर केली आहे. गोपाळराव चा विक्षिप्तपणा, तिरसटपणा, रागीट वृत्ती हे दाखवताना त्यांचे शिक्षणा विषयी असलेलं प्रेम त्यांनी उत्तमपणे साकारले आहे. समाज विरोधात असतानाचे प्रसंग आणि त्यावेळची मानसिक स्थिती त्यांनी छान व्यक्त केली आहे. चित्रपटाची गतिमानता करण श्रीकांत शर्मा यांनी लिहिलेल्या पटकथेने साध्य केली असून सहज सुलभ संवाद लेखन इरावती कर्णिक यांनी केल आहे. चित्रपटाचे संगीत हे ऋषिकेश दातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी यांनी दिलेलं असून ती एक जमेची बाजू आहे.

 झी स्टुडीओज , फ्रेश लाईम फिल्म्स, नमः पिक्चर्स सादर करीत आहेत, नमः पिक्चर्स, फ्रेश लाईम फिल्म्स प्रोडक्शनने ह्या सिनेमाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन समीर विध्वांस यांनी केल असून पटकथा करण श्रीकांत शर्मा, संवाद इरावती कर्णिक, छायाचित्रण आकाश अग्रवाल यांचे आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना संगीत ऋषिकेश दातार, सौरभ भालेराव, जसराज जोशी यांनी दिले आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेत ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद हे आहेत. सोबत अंकिता गोस्वामी, गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण, जयंत सावरकर, अथर्व फडणीस, असे कलाकार आहेत.

एकंदरीत चित्रपट हा मनोवेधक झाला आहे.

दीनानाथ घारपुरे

चित्रपट परीक्षण : ‘भाई’ व्यक्ती कि वल्ली { उत्तरार्ध } – मनोहारी दर्शन….

दीनानाथ घारपुरे

   पुरुषोत्तम लक्ष्मण  देशपांडे, सर्वच रसिकांचे लाडके व्यक्तिमत्व, आपल्या लेखनामधून, अभिनयातून, संगीतामधून, पेतीवाद्नातून, नाटकातून, चित्रपटातून, भाषणामधून, रसिकजनांना फक्त त्यांनी आनंदाचा वर्षाव केला, त्यांनी लिहिलेल्या आणि सादर केलेल्या नाट्यकृती, चित्रकृती मधून मनोरंजन केले, त्यांच्या आयुष्यात सुद्धा कौटुंबिक, सामाजिक इत्यादी स्तरावर चढ-उताराचे प्रसंग आले पण त्यांनी त्याकडे सुद्धा सकारात्मक वृतीने पाहिले, भाई व्यक्ती कि वल्ली पूर्वार्ध आणि उत्तरार्ध मिळून त्यांच्या आयुष्यातील मनोहारी घटनांचे दर्शन सादर केले आहे.

IMG-20190207-WA0184

     पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या जीवनामधील अनमोल क्षणांची एकत्रित बांधणी करून भाई व्यक्ती कि वल्ली मध्ये ती सादर केली आहे. त्यामध्ये त्यांनी केलेली दूरदर्शन मधील नोकरी, आनंदवन मध्ये बाबा आमटे यांच्या कडील सहभाग, मुक्तांगण, बहुरूपी तर्फे बटाट्याच्या चाळीची निर्मित, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी केलेलं त्यांचे कौतुक, त्याच बरोबर त्यांनी निर्माण केलेल्या ट्रस्ट च्या माध्यमातून अनेक संस्थाना केलेली मदत, अश्या प्रसंगा बरोबरच त्यांना मिळालेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार, आणि आणीबाणी च्या काळात त्यांनी व्यक्त  केलेली मते, शिवाय फुलराणी, सुंदर मी होणार नाटकाच्या तालमीचे प्रसंग इत्यादीवर हा सिनेमा प्रकाश टाकतो.

      सुनीताबाई नी त्यांना पूर्णपणे साथ दिली, वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा ह्यांची जमलेली मैफल हि आनंद देऊन जाते, आनंदवन मध्ये त्यांनी सादर केलेलं “ नाच रे मोरा “ हे गीत सुद्धा मन प्रसन्न करते. तसेच सुनीताबाई आणि पु ल देशपांडे यांच्या मधील कौटुंबिक प्रसंग मनाला चटका लाऊन जातात.

   भाई व्यक्ती कि वल्ली उत्तरार्ध ची प्रस्तुती वायकॉम १८ मोशन पिक्चर्स ने केली असून महेश मांजरेकर मुव्हीज ची निर्मिती आहे. निर्माते महेश मांजरेकर, अविनाश अहाले, वैभव पंडित, महेश पटेल, वीरेंद्र उपाध्ये हे आहेत. दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे लाभले आहे. पटकथा गणेश मतकरी, संवाद रत्नाकर मतकरी, संगीत अजित परब, छायाचित्रण करण रावत, रंगभूषा विक्रम गायकवाड यांचे असून या मध्ये सागर देशमुख, इरावती हर्षे, विजय केंकरे, शुभांगी दामले, अश्या अनेक नामवंत कलाकारांचा सहभाग लाभला आहे.

भाई व्यक्ती कि वल्ली { उत्तरार्ध } हा सिनेमा मनाला अधिक भावतो, या चित्रपटातील सर्वच कलाकारांची कामे सुरेख, उत्तम झाली आहेत. एक सुरेख मनोहारी दर्शन ह्या सिनेमातून अनुभवायला मिळेल.

परीक्षण –   “भाई व्यक्ती कि वल्ली”[पूर्वार्ध ]  – प्रेमळ आठवणींची शिदोरी …

  दीनानाथ घारपुरे –

 

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे अर्थात भाई त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू रसिकांना माहित आहेत, विनोदी कथा लेखन, नाटक, सिनेमा, प्रवासवर्णन, एकपात्री प्रयोग, गीत, संगीत अभिनय ह्या सर्वच गुणांनी त्यांनी रसिकांना फक्त आनंद दिला. आजच्या घडीला सुद्धा ते आपल्या मनांत घर करून आहेत. सर्वच रसिकांच्या हृदयात त्यांनी मानाचे स्थान मिळवले आहे. आजसुद्धा पु. ल. देशपांडे यांच्या कथांचे, प्रवासवर्णन चे वाचन करून रसिक आनंदित होतो. पु. ल. देशपांडे ह्यांच्या व्यक्तिमत्वाचा आढावा, “ भाई, व्यक्ती कि वल्ली { पूर्वार्ध ], ह्या चित्रपटात सादर केला आहे. पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मागोवा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागात निर्मिती होणार आहे.

film bhai vyakti ki valli photo.1

  पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्याचा आवाका इतका मोठा आहे कि पूर्वार्धात, सुरवातीला त्यांचे बालपण, पेटीवादन, वडिलांनी दिलेले प्रोत्साहन, शालेय जीवन, चाळीतल्या मुलांनी केलेले नाटुकले, पासून पुण्यातील वास्तव्य, फर्ग्युसन कॉलेज मधील त्यांचा काळ, त्यांचे सुंदर दिवाडकर बरोबर झालेले पहिले लग्न, आणि नंतर सुनिता ठाकूर यांच्या बरोबर झालेली ओळख,आणि नंतर लग्न, त्याच बरोबर पु. ल. देशपांडे यांना भेटलेल्या अनेक व्यक्ती. त्यामध्ये राम गबाले, ग. दि. माडगुळकर, भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, नाथा कामत, डॉ. जब्बार पटेल, कुमार गंधर्व, रावसाहेब, अंतू बर्वे, अशा अनेक मित्रांच्या बरोबर केलेली कामे ह्याचा मागोवा छान घेतला आहे. पु. ल. देशपांडे यांना मित्रांच्या संगतीत रमायला आवडायचे. रंगभूमी आणि संगीतावरील त्यांचे प्रेम अशा अनेक पैंलूचे दर्शन आल्हादायक आहे. त्याचवेळी त्यांच्या घरातील कौटुंबिक सुख-दुःखाचे  संयमाने दाखवलेले प्रसंग मनाला चटका लावून जातात.

film bhai vyakti ki valli photo

      यामध्ये पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिरेखा सागर देशमुख यांनी छान रंगवली असून त्यातील बारीक सारीक बारकावे, त्यांच्या लकबी उत्तमपणे साकारलेल्या आहेत. सुनीताबाई ची भूमिका इरावती हर्षे यांनी त्या व्यक्तिरेखेच्या विविध छटांसह सादर केली आहे. या शिवाय सचिन खेडेकर, सुनील बर्वे, विद्याधर जोशी, शुभांगी दामले, अजय पुरकर, स्वानंद किरकिरे, पद्मनाभ बिंड, सतीश आळेकर, इत्यादी सर्वच कलाकारांनी आपल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला उत्तमपणे सादर केल आहे. चित्रपटाच्या शेवटची बहारदार मैफल खास आठवणीतील साठवण आहे. एक सुंदर सिनेमा पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळेल.

भाई व्यक्ती कि वल्ली [ पूर्वार्ध ], ची निर्मिती महेश मांजरेकर मुव्हीज ने केली असून प्रस्तुती वायकोम १८ मोशन पिक्चर्स ने केली आहे. दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे असून छायांकन करण बी रावत, संगीत अजित परब, यांचे आहे. पटकथा गणेश मतकरी संवाद रत्नाकर मतकरी यांनी लिहिले आहेत, यामध्ये सागर देशमुख, इरावती हर्षे, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, ऋषिकेश जोशी, शुभांगी दामले, जयंत देशपांडे, सतीश आळतेकर, स्वानंद किरकिरे, अजय पुरकर, पद्मनाभ बिंड, प्रतिभा भगत, संदीप ठाकूर, असे एकूण सत्तर कलाकारांचा सहभाग आहे. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची मोलाची कामगिरी कोणीच विसरू शकणार नाही.

 

Create a website or blog at WordPress.com

Up ↑