अभिनेते श्रीरंग देशमुख आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत

मालिका आणि चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते श्रीरंग देशमुख लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण करीत आहेत.  ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी  या आगामी चित्रपटाचे लेखन,निर्मिर्ती आणि दिग्दर्शन श्रीरंग देशमुख यांनी केले आहे. येत्या १८ जानेवारीला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

एक निर्णय’ स्वतःचा स्वतःसाठी हा चित्रपट सध्याच्या पिढीच्या निर्णय प्रक्रियेवर भाष्य करणारा आहे. आत्ताच्या युगातली स्त्री जेव्हा स्वतःसाठी एखादा निर्णय घेते तेव्हा समाज आणि कुटुंब तो स्वीकारतो का? ध्येय आणि भावना यांच्यात गुंतलेल्या पिढ्यांमधल्या नात्यांवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे.

_PPS4939

‘माणसाने आयुष्यात घेतलेल्या एका निर्णयावर आयुष्याचं घडणं अथवा बिघडणं अवलंबून असतं. तो एक निर्णय माणसाच्या आयुष्यात महत्वाची भूमिका पार पाडत असतो. याच अनुषंगाने एक कथा मी लिहिली, आणि आता ती एक निर्णय’ या चित्रपटाच्या माध्यमातून मी प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. ज्यांना आयुष्यात स्वतःसाठी एखादा महत्वाचा  निर्णय घ्यायचा आहे किंवा ज्यांनी अजून तो घेतला नाही त्या सगळ्यांसाठीच हा चित्रपट प्रेरणादायी ठरेल असा विश्वास श्रीरंग देशमुख यांनी व्यक्त केला.

या चित्रपटात सुबोध भावे, मधुरा वेलणकर-साटम, विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, शरद पोंक्षे, श्रीरंग देशमुख, सीमा देशमुख, मंगल केंकरे, मुग्धा गोडबोले, प्रतिभा दाते,स्वप्नाली पाटील यासारख्या नावाजलेल्या कलाकारांसोबत कुंजिका काळवींट हा नवा चेहरा या चित्रपटात दिसणार आहे.

 एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी हा चित्रपट १८ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे

तृप्ती तोरडमलचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या तृप्ती तोरडमल लवकरच एका चित्रपटातून मराठीसिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ असे या चित्रपटाचे नाव असून, याची निर्मिती बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम करत आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केले आहे. या सिनेमातील ‘सविता’ या महत्वपूर्ण पात्राच्या भूमिकेतून तृप्ती लोकांसमोर येणार आहे. यापूर्वी, एका प्रसिध्द नाटकाद्वारे दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांनी हे पात्र लोकांसमोर सादर केले होते. त्यामुळे, सिनेमाच्या पडद्यावर सविता साकारण्याचे मोठे आव्हान तृप्तीवर आहे. या सिनेमातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तृप्ती सांगते कि, ‘हा सिनेमा करताना, मला माझे बाबा मधुकर तोरडमल यांच्या नावाला आणि रीमाजींनी एकेकाळी गाजवलेल्या या भूमिकेला धक्का लावू द्यायचा नव्हता. त्यामुळे, माझ्या अभिनयातले वेगळेपण मला जपायचे होते. त्यासाठी मला स्वप्ना वाघमारे जोशी आणि जॉन अब्राहम यांचे मोठे पाठबळ मिळाले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मला हे पात्र साकारण सोपं गेलं’.
या सिनेमासाठी तृप्तीने वास्तविक घटनेचा अभ्यास करत, आपल्या अभिनयात प्राण ओतण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. सिनेमाच्या कथानकाची गरज ओळखून तिने तिच्या आवाजावर अनेक प्रयोग केले. त्यासाठी कोणत्याही तांत्रिक साधनाचा वापर न करता, रात्रंदिवस आपल्या आवाजात फेरबदल करण्याचा तिने महिनाभर सराव केला. त्यापैकी एक आवाज तिने तिच्या बाबांना ऐकवला असता त्यांना तो आवडला. खऱ्या आयुष्यातील सविताचे निकटवर्तीय शेखर ताम्हाणे यांनादेखील तो आवाज ऐकवला असता, सविताचा आवाज अगदी असाच होता, अशी पोचपावती त्यांनी दिली. त्यांच्या या सकारात्मक उत्तराने माझ्या मेहनतीचे चीज झाले असल्याचे तृप्ती सांगते.
रंगभूमीची योग्य जाण असलेल्या तृप्तीचा हा पहिलाच सिनेमा असून, तिच्या अभिनय कारकिर्दीला तो चारचाँद लावणारा ठरेल, अशी आशा आहे.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑