मराठी चित्रपट परीक्षण  – ‘लालबत्ती’  – खाकी वर्दीतली संवेदनशील माणूसकी…! 

 
* * १/२  (अडीच स्टार)  
 
 
– राज चिंचणकर 
 
       ‘लालबत्ती’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून काही अंदाज नक्कीच बांधता येतात. पण बांधलेल्या अंदाजांची दिशा चुकते, तेव्हा चित्रपटाचे वेगळेपण ठसते. आडाखे अगदी अचूक ठरले, तर त्यात उत्सुकता ती काय राहणार? वास्तविक, ‘लालबत्ती’ या शब्दावरून काही गोष्टी डोळ्यांसमोर येतात. मात्र हा चित्रपट त्याही पलीकडे जाऊन या ‘लालबत्ती’चा अनोखा संदर्भ स्पष्ट करतो.
L1
       पोलीस डिपार्टमेंटशी संबंधित कथानक हा या चित्रपटाचा गाभा आहे. क्यू.आर.टी. अर्थात शीघ्र कृती दलाच्या कमांडोंवर ही कथा बेतली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी एस.बी.पवार यांच्या नेतृत्वाखाली ही टीम कार्यरत आहे. या दलात अशी एक घटना घडते, की त्यावरून एस.बी.पवार यांना पोलिसांमधल्या संवेदनांची जाणीव होते. त्यातच या दलात घुम्यासारख्या वावरणाऱ्या गणेश या कमांडोच्या पार्श्वभूमीची भर पडते आणि एस.बी.पवार काही ठोस निर्णय घेतात. त्याबरहुकूम होणारी कार्यवाही म्हणजे ही ‘लालबत्ती’ आहे.
       करड्या शिस्तीतल्या या खाकी वर्दीच्या आत एक माणूस सुद्धा असतो, याची जाणीव करून देणारी ही कथा व पटकथा अभय दखणे यांनी बांधली आहे. मराठी चित्रपटविश्वात चाकोरीबाहेरची कथा मांडण्याचे काम त्यांनी या निमित्ताने केले आहे आणि त्यादृष्टीने हा चित्रपट वेगळा ठरतो. मात्र ही पटकथा काही ठिकाणी विस्कळीत झाल्यासारखी वाटते. मुळात यातले कमांडो ज्या ‘मिशन’साठी एकत्र येऊन लढायचे ठरवतात; ते उद्दिष्ट तकलादू आहे. हे लक्ष्य अधिक ठोस असते, तर या कमांडोंचे श्रम खऱ्या अर्थाने सार्थकी लागले असते. पोलिसांतल्या संवेदनशीलतेचा तपास अजून खोलवर जाऊन करता येणेही शक्य होते. काही व्यक्तिरेखा आणि प्रसंग ओढूनताणून आणल्यासारखे वाटतात. अरविंद जगताप यांच्या संवादांत मात्र ‘जान’ आहे आणि त्यामुळे चित्रपटाची ही भट्टी बऱ्यापैकी सुसह्य झाली आहे.
L2
       दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी उपलब्ध सामग्रीवर खाकी वर्दीतले हे माणूसपण उभे केले आहे. यातल्या व्यक्तिरेखांना ‘कडक’ साच्यात मांडण्याचे त्यांचे कसब यातून दिसून येते. कृष्णा सोरेन यांचा कॅमेरा यात उत्तम फिरला असून, त्यांचे छायांकन ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. नीलेश गावंड यांचे संकलन आणि अविनाश-विश्वजीत यांचे संगीत ठीक आहे.
       यातल्या कलावंतांनी हा चित्रपट सक्षम खांद्यांवर तोलून धरला आहे. मंगेश देसाई याने त्याच्या ओंजळीत येणारी प्रत्येक भूमिका ही कायम लक्षात राहण्याजोगीच असावी, असा पणच केला असावा. कारण तसे वाटण्याइतका यातला एस.बी.पवार हा पोलीस अधिकारी त्याने कडक रंगवला आहे. या हरहुन्नरी नटाने पोलीस डिपार्टमेंटच्या कडक शिस्तीपासून, संवेदनशीलच्या सीमेपर्यंत त्याच्या अभिनयाची रेंज दाखवून दिली आहे. रमेश वाणी यांनी इन्स्पेक्टर चव्हाण या व्यक्तिरेखेत दमदार रंगकाम करत ही भूमिका लक्षवेधी केली आहे. कमांडो गणेशची भूमिका तेजस या अभिनेत्याने आश्वासकरित्या उभी केली आहे. भार्गवी चिरमुले, मनोज जोशी, विजय निकम, छाया कदम, मीरा जोशी, अनिल गवस आदी कलावंतांची साथ या चित्रपटाला लाभली आहे. चित्रपटाचा शेवटही बरेचकाही सांगून जातो आणि हा ‘दि एन्ड’ सुन्न करणारा आहे.

‘जजमेंट’  – कौटुंबिकतेकडून सामाजिकतेचा प्रवास…!  * *  १/२  (अडीच स्टार) 

 
– राज चिंचणकर 
       मंगेश देसाई या नटाच्या ओंजळीत आतापर्यंत ज्या भूमिका आल्या; त्या भूमिका तो समरसून जगला आहे आणि ‘जजमेंट’ चित्रपटामधली त्याची भूमिकाही या मांदियाळीत चपखल बसणारी आहे. इथे त्याने ज्या पद्धतीने ही व्यक्तिरेखा उभी केली आहे; त्याने या चित्रपटाचा एकूणच आलेख उंचावला आहे. विशेष म्हणजे, त्याची ही व्यक्तिरेखा खलनायकी आणि विक्षिप्त स्वभावाची असली, तरी ती मनात ठसते व चित्रपटभर तिचे अस्तित्त्व दाखवत राहते. वास्तविक, चित्रपटाचा विषय सामाजिकतेला स्पर्श करत गांभीर्याची बैठक घेणारा आहे आणि त्यायोगे, चित्रपटाने समाजाच्या डोळ्यांत अंजन घालण्याचा प्रयत्नही केला आहे.
JUDGEMENT .
       हा चित्रपट कौटुंबिकतेकडून सामाजिकतेकडे वाटचाल करतो आणि पटकथाकार, संवादलेखक व दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी हा विषय मनात रुतेल अशा पद्धतीने मांडला आहे. नीला सत्यनारायणन यांच्या ‘ऋण’ या कथेवर आधारित हा चित्रपट आहे. एका व्यक्तीच्या विक्षिप्तपणामुळे त्याच्या कुटुंबाची होणारी वाताहात, त्याच्या मुलींना त्याच्याबद्दल वाटणारी घृणा, न्याय मिळवण्यासाठी त्यांनी दिलेला लढा हे सर्व या कथानकात येते. चित्रपटाला दिलेली ट्रीटमेंट योग्य आहे; मात्र काही गोष्टी सहज पचनी पडत नाहीत. ‘मुलगी नको, मुलगा हवा’ या सूत्राला धरून एखादी व्यक्ती विक्षिप्तपणाचे इतके मोठे टोक गाठू शकेल, हे पटत नाही. यातल्या कोर्टरूमच्या प्रसंगातले गांभीर्यही कमी झाले आहे. नायिका आणि खलनायक यांच्यातल्या अपेक्षित जुगलबंदीलाही हा चित्रपट मुकला आहे. कथानकाच्या माध्यमातून जे काही सांगायचे आहे, ते पोचवण्यासाठी योग्य मार्ग निवडला गेला असला तरी काहीतरी राहून गेल्याचे जाणवत राहते.
       या चित्रपटातली अग्निवेशची खलनायकी व्यक्तिरेखा मंगेश देसाई याने विशिष्ट ‘बेअरिंग’ घेत भन्नाट उभी केली आहे. ऋतुजाच्या भूमिकेत तेजश्री प्रधानला मुक्त वाव मिळाला आहे. मात्र ही व्यक्तिरेखा लेखनातच अजून सशक्त व्हायला हवी होती, असे वाटते. पण तेजश्रीने तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत योग्य रंग भरण्याचे काम नीट केले आहे. आजोबांच्या भूमिकेत माधव अभ्यंकर यांनी दमदार कामगिरी बजावली आहे. श्वेता पगार हिला यात फार मोठी संधी मिळाली नसली, तरी तिने तिचे अस्तित्व व्यवस्थित दाखवून दिले आहे. शलाका आपटे, प्रतीक देशमुख, सतीश सलागरे, महेंद्र तेरेदेसाई यांच्या भूमिका लक्षात राहतात. चित्रपटाच्या तांत्रिक बाजू ठीक आहेत. थोडक्यात, एक चांगला विषय मांडण्याचा केलेला समाधानकारक प्रयत्न, असे या चित्रपटाबद्दल म्हणता येईल.

Create a website or blog at WordPress.com

Up ↑