चित्रपट परीक्षण – ‘म्होरक्या’ – संवाद माध्यमातून बोलणाऱ्या निःशब्द फ्रेम्स…! 

* * * १/२  (साडेतीन स्टार)  
 
 
 
– राज चिंचणकर 
 
       मराठी चित्रपट आशयघनतेच्या बाबतीत वरच्या स्तरावर जाऊन पोहोचला आहे आणि त्यादृष्टीने मनाला भिडतील असे आशय व विचार मराठी चित्रपटांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. चित्रपट हे माध्यम मुख्यत्वेकरून कॅमेर्‍याचे आहे आणि त्याद्वारे कलाकृतीची उंची कमालीची वाढवण्याचे सामर्थ्य या तंत्रज्ञानात आहे. जरी एखादी साधी गोष्ट चित्रपटातून सांगण्यात येत असली, पण तिला उत्तम दृष्टिकोन व तंत्रज्ञानाची जोड मिळाली; तर काय घडू शकते याचे उदाहरण म्हणजे ‘म्होरक्या’ हा चित्रपट आहे.
MH2
       या चित्रपटाची प्रत्येक फ्रेम न फ्रेम थेट संवाद साधत बोलत राहते. कलाकारांच्या तोंडी अतिशय कमी संवाद असूनही, या ‘फ्रेमिंग’च्या माध्यमातून चित्रपटाची कथा आणि आशय मनाला भिडतो. महत्त्वाचे म्हणजे, इतकी सफाई असणारा चित्रपट एक सरळमार्गी गोष्ट सांगत जातो. हा चित्रपट पूर्णतः ग्रामीण बाजाचा आहे, हेही लक्षात घेणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने बांधलेल्या या चित्रपटाला दिग्दर्शकीय दृष्टिकोनाद्वारे मिळालेली ही भेटच म्हणावी लागेल.
MH1
       अशोक उर्फ अश्या या शाळकरी मुलाची ही साधी-सरळ अशी कथा आहे. समाजाच्या तळागाळात वाढलेल्या अशोकचा दिवस, मेंढ्या हाकण्यात व्यतीत होतो. अभ्यासात त्याला अजिबात रस नाही; पण एक दिवस त्याचे मित्र त्याला शाळेची वारी घडवतात आणि तिथे सुरू असलेली मुलांची परेड, अर्थात संचलन अशोकला आकर्षून घेते. त्याला या परेडचे नेतृत्व करावेसे वाटते; मात्र या प्रकारात गावच्या पाटलाचा मुलगा त्याच्या आड येत राहतो. परिणामी, परेड शिकण्याचे अशोकचे प्रयत्न अर्धवटच राहतात. दुसरीकडे, गावात भटकणारा एक वेडसर माणूस आण्ण्या, याचे आकर्षण अशोकला वाटत असते. तो आण्ण्याचा पिच्छा पुरवतो, तेव्हा आण्ण्या हा एकेकाळी युद्धात लढलेला सैनिक आहे हे अशोकला समजते. आता आण्ण्या त्याला परेड शिकवेल, याची अशोकला खात्री वाटू लागते. पण स्क्रिझोफेनियाच्या चक्रात सापडलेला आण्ण्या हा गावातला हेटाळणीचा विषय झालेला असतो. पुढे अशोकच्या या परेड प्रकरणावर दृष्टिक्षेप टाकत ‘म्होरक्या’ हा चित्रपट बरेच काही सांगत जातो.
       लेखक, दिग्दर्शक व अभिनेता म्हणून जबाबदारी पार पडणाऱ्या अमर देवकर यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा चित्रपट बनवला आहे. महत्त्वाचे म्हणजे यातले त्यांचे दिग्दर्शकीय कसब वाखाणण्याजोगे आहे. चित्रपटाच्या प्रत्येक फ्रेममधून हा दिग्दर्शक विनासंवाद बरेच काही बोलत राहतो. अनेकदा प्रतिकात्मक बाज पकडत त्यांनी या फ्रेम्स अधिकच बोलक्या केल्या आहेत. वेडसर झाक असलेली यातली आण्ण्याची भूमिकाही त्यांनी टेचात रंगवली आहे. ज्याच्यावर या चित्रपटाचा फोकस आहे, ती अशोक ही व्यक्तिरेखा रमण देवकर याने अचूक व्यवधान राखत उभी केली आहे. मुळात या चित्रपटातले कलावंत अभिनय करतच नाहीत असे वाटते; इतक्या त्यांच्या भूमिका वास्तवदर्शी झाल्या आहेत. ऐश्वर्या कांबळे (निकिता), रामचंद्र धुमाळ (गोमतर आबा), यशराज कऱ्हाडे (बाळ्या), अनिल कांबळे (शिक्षक) या सर्वांच्या व्यक्तिरेखा लक्षात राहतात. एवढेच नव्हे; तर सुरेखा गव्हाणे आणि इतर कलावंतांच्या छोट्या छोट्या भूमिकाही चित्रपटात भरीव रंगकाम करतात.
       या चित्रपटाचे कॅमेरावर्क, संकलन, कला दिग्दर्शन या बाजू नीट जमून आल्या आहेत. राष्ट्रीय पुरस्कारांपर्यंत या चित्रपटाने का झेप घेतली असावी, याचे उत्तर या चित्रपटाच्या सादरीकरणातच आहे आणि या संपूर्ण टीमने चाकोरीबाहेरचा असा एक अनुभव या ‘म्होरक्या’द्वारे दिला आहे.

चित्रपट परीक्षण – ‘वेगळी वाट’  – सकारात्मकतेची कास धरणारा मार्ग…! 

*** (३ स्टार)
सकारात्मकतेची कास धरणारा मार्ग…! 
 
 
 
– राज चिंचणकर 
       मराठी पडद्यावर काही चित्रपट आपली स्वतःची अशी वेगळी वाट निवडताना दिसतात. ‘वेगळी वाट’ असेच शीर्षक असलेल्या या चित्रपटानेही स्वतःचा एक अनोखा मार्ग निवडत साध्या, सोप्या, सरळ भाषेत एक प्रामाणिक कथा संवेदनशीलतेने सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
       हा चित्रपट साध्या-सरळ वाटेवरून चालतो आणि त्यामुळेच तो त्याचे अस्तित्व कायम करतो.  ही गोष्ट एका वडील (राम) आणि त्यांची शाळकरी मुलगी (सोनू) यांची आहे. या दोघांचे भावबंध किती घट्ट आहेत, याचे टोकदार दर्शन हा चित्रपट घडवत जातो. चित्रपट ग्रामीण बाजाचा आहे. यात शेतकऱ्याची व्यथा तर मांडली आहेच; परंतु त्यासोबत पूरक व्यवसायाची सकारात्मक वाट निवडत त्या समस्येवर उत्तरही शोधले आहे. कर्जबाजारी शेतकरी, त्यांची अडवणूक करणारे सावकार ही काही नवीन बाब नव्हे; परंतु या पार्श्वभूमीवर ही कथा एक वेगळीच वाट निवडत चित्रपटाला ठोस शेवटाकडे घेऊन जाते.
VW1
       गावातल्या कोणत्याही घरात घडू शकेल अशी साधी कथा यात गुंफण्यात आली असली, तरी त्यावर संयत अभिनयाने चढवलेला कळस हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य ठरले आहे. कुठेही आक्रस्ताळेपणा न करता किंवा आपले म्हणणे मुद्दाम ठासून सांगण्याचा हव्यास न बाळगता चित्रपट सरळ मार्गाने चालत राहतो आणि ही ‘वेगळी वाट’ सर्वांची होऊन जाते. यातला गरीब शेतकरी अशा एका वळणावर येऊन ठेपतो, की त्याला ठोस निर्णय घेणे अशक्य बनते. मात्र एका क्षणी तो एक निर्णय घेतोच; ज्याचे कारण चित्रपटाच्या शेवटच्या फ्रेममध्ये उलगडते आणि ही ‘वेगळी वाट’ चित्रपटाचे शीर्षक सार्थ करते. फक्त यातले सोनूचे सर, सोनूच्या बाबतीत जे काही ठरवतात; ते शिक्षकी पेशा असलेल्या व्यक्तीकडून ठरवले जावे हे सहज पचनी पडत नाही. मात्र ही कथेची गरज असावी; अन्यथा चित्रपटाच्या सारांशाला धक्का पोहोचला असता, हे स्पष्ट आहे.
VW2
       चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन अच्युत नारायण यांनी केले आहे आणि यातल्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाचे छान प्रकटीकरण यात केले आहे. वडिलांच्या भूमिकेत असलेले शरद जाधव यांनी संपूर्ण चित्रपटभर त्यांची पकड कायम ठेवली आहे. संयत अभिनयाचे उत्तम उदाहरण त्यांनी यात ठासून घडवले आहे. अनया फाटक हिने सोनू रंगवताना, अल्लडपणा ते प्रगल्भतेचा प्रवास टेचात केला आहे. नीता दोंदे हिची यातली आई लक्षवेधी आहे. योगेश सोमण व गीतांजली कुलकर्णी या दोघांची योग्य साथ प्रमुख कलावंतांना मिळाली आहे. तंत्रज्ञानाच्या पातळीवर मात्र चित्रपट दोन पावले मागे चालतो. त्यादृष्टीने थोडे प्रयत्न करता आले असते; तर चित्रपटाचे ‘दिसणे’ अधिक ठसले असते. मात्र, एकूणच सकारात्मकतेची कास धरणारा हा चित्रपट आश्वासक वाटेवरून चालणारा आहे.

भाऊ कदम म्हणतात,  “गावच्या मातीतली कला जगायला आवडते…” 

 
– राज चिंचणकर 
 
       विनोदाच्या विविध अंगांना स्पर्श करत स्वतःची खास ओळख कायम केलेले अभिनेते भालचंद्र (भाऊ) कदम यांचा ‘व्हीआयपी गाढव’ हा नवीन चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. ‘कल्पराज क्रिएशन्स’ प्रस्तुत, संजय पाटील दिग्दर्शित या चित्रपटात भाऊ कदम हटके भूमिकेत दिसणार आहेत. १३ सप्टेंबर रोजी पदड्यावर येत असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने भाऊ कदम यांच्याशी साधलेला विशेष संवाद…
V2
दादा कोंडके पॅटर्नचा चित्रपट तुम्ही करत आहात आणि यातल्या तुमच्या व्यक्तिरेखेचे नावही ‘गंगाराम’ असे आहे; हा योगायोग आहे का?
– गंगाराम म्हटले की दादा कोंडके आठवतातच. पण यातली माझी भूमिका दादा कोंडके यांची नाही. हा चित्रपट बघून, विशेषतः यातले माझे गाणे बघितल्यावर तुम्हाला दादा कोंडके यांची आठवण मात्र नक्की होईल. गावरान, ठसकेबाज असे हे कथानक आहे. यात व्हीआयपी कल्चर आहे. आता व्हीआयपी कल्चर म्हणजे काय, असा प्रश्न मलाही पडला होता. यात काम करून मी तो प्रश्न सोडवला. तुम्हाला मात्र चित्रपट पाहून तो सोडवायचा आहे.

विनोदी भूमिकाच करायची असे ठरवले होते का?
– हो. कारण माझी ओळख विनोदी कलाकार म्ह्णूनच आहे. चित्रपटात भाऊ आले की धमाल असणार, अशी लोकांची खात्री असतेच. त्यामुळे मी हा चित्रपट स्वीकारला. विनोदाने ठासून भरलेला आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा चित्रपट आहे. सर्वजण हा चित्रपट नक्कीच एन्जॉय करतील.
V1
तुम्ही आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. पण यात ग्रामीण बाजाची भूमिका रंगवताना विशेष काही केले का?
– गावरान पद्धतीच्या कथेवर माझे मनापासून प्रेम आहे. अशा कथा मला खूप आवडतात. मला गावच्या मातीतली कला जगायला आवडते. त्यामुळे अशा कथेची मी वाट पाहातच होतो. गावरान बाज हा माझ्या आवडीचा विषय आहे. यातली भाषाही छान आहे आणि ती अगदी घरातली वाटते.

या चित्रपटाचे शूटिंग करताना तुम्ही अनेक रात्री झोपला नाहीत. काय किस्सा आहे हा?
– माझ्या हातात उपलब्ध असणारे दिवस सांभाळत आणि या दिवसांची कसरत करत मला हे शूटिंग करायचे होते. टीव्ही आणि माझे सुरु असलेले नाटक, यातून मार्ग काढत मी हे शूटिंग केले आहे. रात्री उशिरापर्यंत मी यासाठी काम केले. कमी दिवसांत जास्त काम करायचे होते. त्यामुळे रात्रीसुद्धा मी या चित्रपटाचे शूटिंग करत होतो.

नाटक जास्त आवडते की चित्रपट?
– खरं सांगायचं तर, नाटक प्रथम आवडते; मग चित्रपट!  नाटकामुळे रियाझ होतो. नाटकामुळे आपण ‘तयार’ होतो. त्यामुळे नाटक खरंच ग्रेट आहे.

साड्या, ग्लिसरीन आणि बरेच काही…!

– राज चिंचणकर
       अलका कुबल-आठल्ये म्हणजे ‘माहेरची साडी’; हे समीकरण गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या मनात घट्ट रुजले आहे. त्याचबरोबर, त्यांचा चित्रपट म्हणजे डोळ्यांना रुमाल लावायला लागणार, असे चित्रही सर्वसाधारणपणे दिसून येते. पण आता त्यांचा येऊ घातलेला ‘वेडिंगचा शिनेमा’ हा चित्रपट मात्र या दोन्ही गोष्टींचे संदर्भ रसिकांना नव्याने पडताळून पाहायला लावणार आहे.
AK
       मराठी रुपेरी पडद्यावर अलका कुबल यांची थोड्याबहुत फरकाने असलेली ‘रडूबाई’ अशी इमेज पार बदलून टाकणारा हा चित्रपट आता त्यांच्या ओंजळीत आला आहे. या चित्रपटात भूमिका साकारताना, प्रथमच मला डोळ्यांत ‘ग्लिसरीन’ घालावे लागले नाही, असे त्या स्पष्ट करतात; तेव्हाच त्यांची ही भूमिका ‘हटके’ असणार यावर शिक्कामोर्तब होते. थोडक्यात, अलका कुबल यांचा चित्रपट असला, तरी तमाम रसिकांनी आपापले रुमाल घरी ठेवून चित्रपट पाहायला जायला हरकत नाही. डोळे ओलावण्याच्या प्रक्रियेपासून मराठी रसिकांची मुक्तता करणारा चित्रपट अखेर त्यांच्या वाट्याला आला, हेही नसे थोडके!
       दुसरे म्हणजे, ‘माहेरची साडी’ या चित्रपटातल्या साड्यांचा संदर्भही अलका कुबल यांच्या बाबतीत ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाच्या निमित्ताने बदलत आहे. यात त्यांना चित्रपटभर विविध प्रकारच्या साड्या नेसायला मिळाल्या आहेत. हसरा चेहरा आणि भरजरी साड्या, अशा थाटात महाराष्ट्राच्या या लाडक्या अभिनेत्रीला पाहणे, हा सुखावह धक्का ठरणार आहे. या चित्रपटाने ही भन्नाट किमया केली असून, येत्या १२ एप्रिल रोजी अलका कुबल यांचे आगळेवेगळे दर्शन ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटाच्या निमित्ताने पडद्यावर घडणार आहे.

मराठी चित्रपट निघाला ‘लॉस एंजेलिस’ला…! 

 

– राज चिंचणकर 
       सध्याचा मराठी चित्रपट आशयघनतेच्या बाबतीत वेगाने दौडत असतानाच, त्याने आता थेट ‘लॉस एंजेलिस’पर्यंत भरारी घेतली आहे आणि याला निमित्त ठरला आहे तो ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा चित्रपट!  या चित्रपटाचे हे शीर्षक मराठी रसिकांना नक्कीच ओळखीचे वाटेल. कारण अभिनेते प्रशांत दामले यांनी या ओळीला दिलेला ऱ्हिदम सर्वांच्याच परिचयाचा आहे. एका सत्य घटनेवर आधारित असलेल्या या चित्रपटाची गोष्टही त्याचपद्धतीची असल्याने, या चित्रपटाचे शीर्षक हेच ठेवले गेले आहे.
Samruddhi P.
       आतापर्यंत चाकोरीबाहेरचे चित्रपट देणाऱ्या समृद्धी पोरे, हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. या चित्रपटाची गोष्ट घडते तीच मुळी परदेशात आणि त्यासाठी आम्ही चित्रीकरणासाठी ‘लॉस एंजेलिस’ची निवड केली असल्याचे समृद्धी पोरे सांगतात. अभिनेता अंकुश चौधरी याची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे आणि विविध जाहिरातींतून चमकलेली झीनल कामदार या चित्रपटाची नायिका असेल. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण लॉस एंजेलिस येथे सुरु होत आहे. या निमित्ताने मराठी चित्रपट रसिकांना, मोठ्या पडद्यावरून का होईना; पण थेट लॉस एंजेलिसची सफर करण्याचा योग येणार आहे.

‘छत्रपती शासन’ चित्रपट सैन्यदलाला समर्पित…! 

– राज चिंचणकर

 
       भारतीय हवाई दलाने आतंकवादी तळावर जी कारवाई केली, त्याने प्रत्येक भारतीयाची मान उंचावली आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही आमचा ‘छत्रपती शासन’ हा चित्रपट भारतीय सैन्यदलाला समर्पित करत आहोत, अशी घोषणा या चित्रपटाचे दिग्दर्शक खुशाल म्हेत्रे यांनी या चित्रपटाच्या संगीत अनावरणाचे औचित्य साधून केली. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या रक्तात आणि हृदयात आहेत; मात्र ते आपल्या मेंदूत कधी पोहोचणार, असा सवाल करत छत्रपती शिवरायांच्या विचारांची पूजा होणे आज गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. या चित्रपटातून उपलब्ध होणाऱ्या निधीतील दहा टक्के निधी आम्ही सैन्यदलाकडे सुपूर्द करणार आहोत, असे या टीमच्या वतीने सांगण्यात आले.
Director Khushal Mhetre
       संतोष जुवेकर, किशोर कदम, अभिजित चव्हाण, प्रशांत मोहिते, अनिल नगरकर, सायली काळे, प्रथमेश जोशी, श्रेयसचंद्र गायकवाड, विष्णू केदार, पराग शाह, अभय मिश्रा, धनश्री यादव, किरण कोरे, राहुल बेलापूरकर, सायली पराडकर, रामचंद्र धुमाळ, मिलिंद जाधव, जयदीप शिंदे आदी कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. १५ मार्च रोजी हा चित्रपट पडद्यावर येणार आहे.

मराठी चित्रपट परीक्षण  – ‘डोक्याला शॉट’ – केवळ दोन घटका करमणूक…! 

*  *  १/२  (अडीच स्टार) 
 
 
– राज चिंचणकर 
 
       अगदीच छोट्या संकल्पनेचा विस्तार करून त्यावर पूर्ण लांबीचा एखादा चित्रपट निर्माण होऊ शकतो; हे सिद्ध करण्याचे काम ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाने केले आहे. या चित्रपटाचे शीर्षकच बरेच काही सांगून जाणारे आहे आणि त्यावरून हा चित्रपट काय असेल, हा अंदाज अजिबात न चुकवता ही गोष्ट घडत गेली आहे.
       अभिजीत, चंदू, भज्जी आणि गणेश या चार मित्रांमधल्या अभिजीतचे लग्न दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि सुब्बू या दाक्षिणात्य मुलीशी ठरलेल्या त्याच्या लग्नाची तयारी दोन्ही बाजूंकडून जोरात सुरु आहे. पण लग्नाच्या दोन दिवस आधी हे चौघे मित्र क्रिकेट खेळत असताना, अभिजीतच्या डोक्याला मार बसतो आणि त्याची मोठी किंमत त्याला चुकवावी लागते. ही घटना म्हणजे या चित्रपटाचा पाया आहे आणि तसे पाहायला गेल्यास ही घटना गंभीर आहे. मात्र वरूण नार्वेकर व शिवकुमार पार्थसारथी, या अनुक्रमे पटकथा-संवाद लेखक आणि दिग्दर्शक जोडीने त्याला कॉमेडीचा तडका देत ती रंजक करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण, यात येणारी वारंवारता टाळता येणे सहजशक्य होते. पुनरावृत्तीचा मारा वाढला की कंटाळा यायला लागतो, याचे व्यवधान राखणे गरजेचे होते.
DS1
       या चित्रपटाचा आस्वाद घेताना, डोके थोडे बाजूला काढून ठेवणे क्रमप्राप्त आहे. निखळ आणि निव्वळ करमणूक एवढाच हेतू या चित्रपटाचा आहे; हे लक्षात घेतल्यावर इतर बाबींकडे कानाडोळा करावा लागतो. किंबहुना, चित्रपटाच्या टीमचेच तसे सांगणे असल्याचे या चित्रपटाला दिलेल्या ट्रीटमेंटवरून स्पष्ट होत जाते. कलाकारांनी मात्र हा चित्रपट उचलून धरला आहे आणि त्याची वाट सुसह्यतेकडे वळवली आहे. चित्रपटाची तांत्रिक अंगे ठीक आहेत.
       डोक्याला मार लागल्यावर एखाद्याच्या बाबतीत जे काही घडेल, ते कथेच्या मागणीप्रमाणे सादर करण्याचा प्रयत्न सुव्रत जोशी याने अभिजीतच्या भूमिकेत केला आहे. ओंकार गोवर्धन याने चंदूच्या भूमिकेत छान रंग भरले आहेत. रोहित हळदीकर याचा भज्जी लक्षात राहतो. एक डोळा मिचकावण्याची लकब पकडत गणेश पंडित याने उभा केलेला यातला गणेश धमाल आहे. प्राजक्ता माळी हिला सुब्बूच्या भूमिकेत फार काही करण्यास वावच मिळालेला नाही. समीर चौघुले याचा डॉक्टर मात्र खास आहे. एकूणच, केवळ दोन घटका करमणूक हा बाज स्वीकारलेल्या या चित्रपटाकडे त्याच दृष्टीने पाहणे तेवढे हाती उरते.
———————————————————————————-

‘प्रकाश’मान वाटेवरचा ‘रॉकी’…! 

– राज चिंचणकर
       ‘रॉकी’ या शीर्षकाचा मराठी चित्रपट येतोय हे एव्हाना जाहीर झाले आहे. पण हा ‘रॉकी’ नक्की आहे तरी कोण, याची उत्सुकता रसिकांना लागून राहिली होती. संदीप साळवे हा अभिनेता यात ‘रॉकी’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. खऱ्याखुऱ्या ‘प्रकाश’वाटेवरून चालत हा रॉकी, मोठया पडद्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. संदीप सांगतो, मी पूर्वी थिएटरमध्ये बॅटरी घेऊन लोकांना सीट्स दाखवायचो. हे माझे काम होते. काळ बदलला आणि वाटचाल करत करत मी आता चित्रपटात हिरोची भूमिका साकारतोय. ज्या थिएटर्समध्ये मी काम करायचो; त्याच थिएटर्समध्ये माझा चित्रपट लागणार आहे, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
1
       अदनान शेख यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. संदीप साळवे व अक्षया हिंदळकर अशी जोडी यात प्रमुख भूमिकेत आहे. त्यांच्यासह राहुल देव, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, अशोक शिंदे, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, दीप्ती भागवत आदी कलाकार या चित्रपट चमकत आहेत. ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
—————————————————————————–

पुनर्जन्माचा थरारक ‘भेद’…! 

– राज चिंचणकर
       मराठी चित्रपटसृष्टीत बराच काळ ‘पुनर्जन्म’ वगैरे झाला नव्हता. म्हणजे, या विषयाशी संबंधित काही चित्रपट आधी येऊन गेले असले, तरी पुनर्जन्म आदी प्रकारांनी मधल्या काळात बऱ्यापैकी ब्रेक घेतला होता. ही पोकळी भरून काढण्यासाठी ‘भेद’ हा मराठी चित्रपट पुढे सरसावला आहे. १५ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे.
BHed 1
       दिग्दर्शक प्रमोद शिरभाते यांच्या या चित्रपटात प्रेम, पुनर्जन्म, थरार, दोन पिढ्यांचे संबंध असा सगळा मसाला अस्सल गावरान मातीच्या सुगंधासह पेरण्यात आल्याचे समजते. अजित गाडे, श्लेषा मिश्रा, अभिषेक चौहान, राजेश बक्षी अशी स्टारकास्ट या ‘भेद’मध्ये आहे. चित्रपटात एकूण सहा गाण्यांचा तडका आहे. विशेष म्हणजे, बॉलीवूड अभिनेत्री पूनम पांडे या गाण्याचे निमित्ताने मराठीत पाऊल टाकत असल्याचीही खबर आहे. आता हा सगळा करिष्मा चित्रपटाला किती पाठबळ देतो, हे पाहण्यासाठी १५ फेब्रुवारीपर्यंत थांबणे भाग आहे.
————————————————————————————

शेतकऱ्यांच्या समस्येला वाचा फोडणारा ‘आसूड’…! 

– राज चिंचणकर

    शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्या व्यथा कमी होताना दिसत नाहीत. अमाप कष्ट करूनही नशिबी येणारी हतबलता त्यांचे अवघे जीवन ग्रासते. मोठ्या पडद्याच्या माध्यमातून यावर प्रकाश टाकला, तर यावर काही उपाययोजना करता येतील असे निलेश जळमकर यांना वाटले आणि त्यांनी ‘आसूड’ हा चित्रपट लिहिला. ८ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. 

       या चित्रपटाविषयी बोलताना निलेश जळमकर भरभरून त्यांचे मत मांडतात. मी मुळातच शेतकरी कुटुंबातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यथा मला माहित आहेत. शेतकऱ्यांना चांगले दिवस का येत नाहीत,असा प्रश्न मला कायम पडत आला आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडावी असे मला वाटले. कथा लिहितानाच माझ्या डोळ्यांसमोर यातल्या भूमिका कुणी करायचे ते पक्के ठरले होते आणि मला ते कलाकार मिळत गेले. त्यामुळे हे कथानक अधिक भक्कम झाले आहे. हा ग्रामीण चित्रपट नाही; तर शहरी लोकांनी मुद्दाम पाहावा असा चित्रपट आहे. मी एक कलावंत आहे आणि हे माध्यम हाती धरून मी हा विषय मांडला आहे, अशी भूमिका ते मांडतात.   

 

AASUD - FINAL 4

    ८ फेब्रुवारी रोजी पडद्यावर येत असलेल्या या चित्रपटाची कथा, पटकथा व दिग्दर्शन निलेश जळमकर यांनी केले आहे. या चित्रपटात आघाडीचे अनेक कलावंत भूमिका रंगवत आहेत. विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत आदी कलाकार या चित्रपटा दिसणार आहेत. अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत हे दोन नवे चेहरे या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. 

Create a website or blog at WordPress.com

Up ↑