– राज चिंचणकर
मराठी रंगभूमीवर सातत्याने येणाऱ्या नाटकांतून कायम लक्षात राहू शकतील अशी नाटके मोजकी असतात. १९८५ मध्ये रंगभूमीवर आलेले ‘सविता दामोदर परांजपे’ हे नाटक त्यातल्या आगळ्या विषयामुळे रसिकांच्या मनात कायमस्वरूपी ठसा उमटवून गेले. याच नाटकाचे आता माध्यमांतर होत असून, हे नाटक ३१ ऑगस्ट रोजी मोठया पडद्यावर येत आहे.

शेखर ताम्हाणे यांच्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाने त्यावेळी रंगभूमीवर राज्य केले होते. राजन ताम्हाणे आणि रीमा यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात होत्या. संहिता, अभिनय, दिग्दर्शन व पार्श्वसंगीताच्या माध्यमातून रसिकांच्या मनाचा थरकाप उडवण्याचे काम या नाटकाने केले होते. हा सगळा अनुभव आजच्या पिढीला थेट मोठ्या पडद्यावर घेता येणार आहे.
विशेष म्हणजे, यासाठी कुणी मराठी व्यक्ती नव्हे; तर बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम पुढे सरसावला असून, त्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांनी केले असून सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, राकेश बापट आदी कलावंतांच्या यात भूमिका आहेत.
या नाटकाचे मूळ लेखक शेखर ताम्हाणे या माध्यमांतराविषयी म्हणतात, एखादा विषय मुळातून कळणे महत्त्वाचे असते. माझ्या या नाटकाच्या विषयावर एखादा चित्रपट होईल, इतकी त्याची खोली नक्कीच आहे. पण हा विषय मुळातून कळणे फार महत्त्वाचे आहे. असा विषय एखाद्या कलाकृतीत हाताळणे, ही तारेवरची कसरत असते. स्वप्ना वाघमारे-जोशी यांना मात्र हा विषय अचूक समजला आहे आणि तो त्यांनी या चित्रपटात व्यवस्थित मांडला असेल याची खात्री आहे.